नवी दिल्ली : उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतरणासंदर्भात आणखी एक कारवाई केली आहे. भारताचे सर्वात मोठे धर्मांतरण सिंडिकेट चालवण्याचा आरोप असलेल्या मौलाना कलीम सिद्दीकीचा सहकारी सरफराज अली जाफरीला अटक करण्यात आली आहे. २०१६ पासून तो मौलाना कलीम सिद्दीकी सोबत काम करत होता. त्याला अमरोहा जिल्ह्यातून अटक करण्यात आली. गेल्या महिन्यात पश्चिम उत्तर प्रदेशच्या सर्वात मोठ्या मौलवींपैकी एक मौलाना कलीम सिद्दीकीला एटीएसने अटक केली.
मौलाना सिद्दीकीच्या चौकशीदरम्यान सरफराज अली जाफरीबद्दल माहिती मिळाली होती, अशी माहिती एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी उघड केली. त्यांनी सांगितले की, "जाफरी मौलाना कलीम सिद्दीकीच्या ग्लोबल पीस सेंटरमध्ये काम करत होता. तो रिव्हर्ट, रिहॅब आणि दावा व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्यही होता. याद्वारे त्याच्या टोळीतील लोकांनी धार्मिक विद्वेष तसेच लोकांना आमिष दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रेरित करत होती."
एटीएसच्या मते, धर्मांतर रॅकेटमध्ये सहभागी जाफरी हा जामिया नगरचा निवासी आहे. त्याने कलीम सिद्दीकीच्या ग्लोबल पीस सेंटरचे कामकाज पाहिले. या व्यतिरिक्त समाजसेवेच्या वेषात त्यांनी नवी दिल्लीमध्ये 'ह्युमॅनिटी फॉर ऑल' संघटना चालवली. यामध्ये लोकांचे धर्मांतर केले जात होते. एक अहवालानुसार, हे लोक धर्मांतरण करणाऱ्या लोकांना नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत. यासाठी जाफरी मौलाना सिद्दीकीकडून निधी घेत असे. त्याच्या मोबाईलच्या रेकॉर्डमधून समोर आले की, त्याला परदेशातून बेकायदेशीरपणे निधी मिळायचा.