समाजमाध्यमांचा वरचश्मा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2021   
Total Views |

social media_1  
समाजाच्या विकासप्रक्रियेमध्ये बदल हा महत्त्वाचा आणि तितकाच शाश्वत घटक. समाजाचा विकास होताना कोणत्याही समाजरचनेमध्ये कालानुरुप योग्य असे बदल घडतात. याप्रमाणे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात समाजमाध्यमांचा उदयही समाजरचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून गेला. समाजमाध्यमांच्या उदयामुळे जगभरातील कोणत्याही देशातील नागरिक एकमेकांशी ‘कनेक्ट’ झाले. त्याप्रमाणे माहितीचे लोकशाहीकरणही झाले आणि हाच बदल या काळातील मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडींसाठी महत्त्वपूर्ण ठरताना दिसतो. भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजरचनेमध्ये आणि मोठ्या प्रमाणात असणाऱ्या लोकसंख्येच्या देशात आज समाजमाध्यमे ही प्रत्येकाची जणू मूलभूत गरज. यामध्ये पाश्चात्त्य कंपन्यांचा वरचश्मा राहिलेला असून, भारत ही समाजमाध्यमांतून सेवा देणाऱ्यांसाठी एक मोठी बाजारपेठ ठरली आहे. म्हणून सध्या सर्वात जास्त समाजमाध्यमे वापरणाऱ्यांमध्ये भारताचा प्रथम क्रमांक लागतो. म्हणून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आदी अ‍ॅप्स सात तासांसाठी नुकतीच जगभरात ठप्प झाली आणि या सेवा देणाऱ्या कंपन्यांना जवळपास ४२ हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागले, असे फेसबुक या कंपनीचा मालक मार्क झुकरबर्गने सांगितले. यामध्ये सर्व्हर बंद झाल्याचा व कोणी सोशल मीडियावरील डेटा हॅक करण्यासाठी बंद झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे वैयक्तिक मते, विचार मांडणाऱ्या भारतीयांच्या माहितीच्या सुरक्षेबाबतही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याबरोबरच मानसिक आरोग्याच्या संतुलनामध्ये आता ‘सोशल मीडिया डिटॉक्स’ ही संकल्पना पुढे येताना अद्याप किमान सात तास सेवा बंद झाल्याने मनोरंजन, व्यवसाय, गुंतवणुकीच्या आर्थिक चक्रावर झालेला मोठा परिणाम विचार करणारा आहे. समाजमाध्यमांनी आज मुख्य प्रवाहात व्यवहारासाठीही स्थान मिळविले असताना, ही सेवा खंडित होऊन सामान्य जनतेकडे त्याचे फारसे पर्याय उपलब्ध नसणे, ही भविष्यातील धोक्याची घंटाही म्हणता येईल. कारण, सध्या समाजमाध्यम फक्त मनोरंजनाचे साधन नसून ते आर्थिक उलाढालीचेही केंद्र आहे. मार्क झुकरबर्गची जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून एका क्रमांकाने झालेली घसरण हे समाजमाध्यमांच्या आर्थिक ताकदीबाबत विचार करण्यास भाग पाडणारे आहे.
 

अनुभवातून ‘आत्मनिर्भरते’कडे?

 
गेल्या दशकात फेसबुकने समाजमाध्यमांच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणली. पारंपरिक माध्यमांच्या व्यासपीठावरही मग फेसबुक आल्याने माध्यमे, संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आदींना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. त्याबरोबरच संवाद माध्यमांनाही फेसबुकमुळे आपले रुपडे बदलावे लागले. सुरुवातीच्या काळात ईमेल असेल अथवा ऑर्कुट आदी माध्यमे ज्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान होते, त्यांच्यापर्यंत सीमित होती. परंतु, फेसबुकने ‘डिजिटल क्रांती’ घडविल्यामुळे ते अल्पावधीत जगभरातील आर्थिक कंपन्यांमध्ये एक दखलपात्र नाव ठरले. त्यानंतर दाखल झालेली व्हॉट्सअप, इन्स्टाग्रामसारखी समाजमाध्यमेही फेसबुकने खरेदी करून आपली समाजमाध्यमांवरील मक्तेदारी अधिक घट्ट केली. आज फेसबुकद्वारे सर्व पातळीवर एकमेकांशी जोडल्या गेलेल्या या डिजिटल समाजाला त्याचे व्यसन जडले. परिणामी, इतर समाजमाध्यमांचे अस्तित्व असूनही त्यांना फेसबुकइतका जागतिक प्रभाव निर्माण करता आला नाही. व्यावसायिकदृष्टीने विचार करता, फेसबुकसारखा ब्रॅण्ड निश्चितच यशस्वी झाला. परंतु, आपल्याच देशात कोट्यवधींच्या संख्येने समाजमाध्यमांचे सर्वाधिक वापरकर्ते, त्यातून व्यावसायिक नफ्याच्या विपुल संधी, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य अन् ज्ञान असूनही फेसबुकच्या तोडीस तोड भारतीय धाटणीचे समाजमाध्यम नावारुपास आले नाही. त्यामुळे फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांची सेवा जेव्हा जगभरात काही काळासाठी ठप्प झाली, तेव्हा त्या तोडीच्या ‘कनेक्टिव्हिटी’ असणाऱ्या समाजमाध्यमांची पोकळी भारतीयांनाही जाणवली असेलच. त्याचबरोबर आपली वैयक्तिक माहितीही आपण बाहेरील देशांच्या कंपन्यांना देऊन बसलेलो आहोत, याची पूर्ण कल्पना असूनही आपल्याकडे या समाजमाध्यमांचा सक्षम पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी भारतात ‘कू’सारख्या अ‍ॅपला पसंती देणे गरजेचे आहे. याचबरोबर भारतातील सर्जनशीलतेच्या पाश्चात्त्यीकरणावर खर्च न करता स्वदेशी आणि तितकाच दर्जेदार पर्याय समोर यायला हवा. त्यामुळे समाजमाध्यमांच्या क्षेत्रातही आपण ‘आत्मनिर्भर’ झालो, तर भारतासाठी, भारतीयांसाठी ती निश्चितच अभिमानास्पद आणि फायदेशीर बाब ठरावी, यात तीळमात्र शंका नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@