एका अर्थाने राज्यव्यवस्था चालविण्याची जबाबदारीच अधिकार्यांवर असते. म्हणून ते खर्या अर्थाने ईश्वरीय व्यवस्थेला चालविणारे प्रतिनिधी आहेत. आदर्श राज्यव्यवस्थेकरिता आदर्श अधिकार्यांबाबतचे तत्त्वचिंतन सर्वात अगोदर वेदांनी प्रतिपादिले. यावरून वैदिक ऋषींची ज्ञानदृष्टी किती सूक्ष्म व व्यापक स्वरूपाची आहे, हे आपणांस निदर्शनास येते.
अस्वप्नजस्तरणय: सुशेवा:
अतन्द्रासोऽवृका अश्रमिष्ठा:।
ते पायव: सध्र्यञ्चो निषद्य,
अग्ने तव न: पान्त्वमूर॥
अन्वयार्थ
(अमूढ) हे नेहमी जागृत असलेल्या व मूढ नसलेल्या (अग्ने) सर्वांग्रणी रार्जा! (तव) तुझ्या राज्यातील अधिकारी हे (अस्वप्नज:) स्वप्नावस्थेत न रमणारे, न झोपणारे, (तरणय:) प्रजेला संकटातून तारणारे (सु शेवा:) उत्तम प्रकारचे सुख देणारे, (अतन्द्रास:) आळस न करणारे, (अवृका:) हिंसक वृत्ती न बाळगणारे, (अश्रमिष्ठा:) न थकता कार्यतत्पर असणारे, (पायव:) सर्वांचे पालनपोषण करणारे असावेत. (ते) तसेच ते सर्व अधिकारी (सध्र्यञ्च:) एकमेकांच्या सोबतीने सामंजस्य प्रस्थापित करीत (निषद्य) आपापल्या पदांवर आरूढ होऊन(न:) आम्हां सर्व जनतेचे (पान्तु) रक्षण करीत राहोत.
विवेचन
देशाची व्यवस्था कोणतीही असो, राजेशाही की लोकशाही, त्या व्यवस्थेत काम करणार्या अधिकारीवर्गावरच त्या देशाचे यशापयश अवलंबून असते. राजा कितीही उत्कृष्ट व प्रजाहितदक्ष असला, तरी त्याच्या राज्यातील कार्यरत अधिकारीवर्ग हा सुयोग्य नसेल, तर राजाबरोबरच त्या देशाचीही अपकीर्ती सर्वत्र पसरणार! सांप्रत युगात बहुतांश देशात लोकशाही व्यवस्था प्रचलित आहे. त्यातल्या त्यात भारतातील लोकशाही तर व्यापक स्वरूपाची आहे. येथील कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या घटकांत सर्वात मोलाची भूमिका बजावणारा मूलभूत घटक म्हणजे प्रशासकीय अधिकारीवर्ग होय. अधिकारी हा आपल्या गुणवत्तेबरोबरच इतरही गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलाच पाहिजे. कारण, बुद्धिमान, कर्तव्यदक्ष व राष्ट्रहितकारी अधिकार्यांमुळेच शासनातर्फे राबविण्यात येणार्या विविध योजनांची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितरित्या होण्यास मदत मिळते.
विशेष म्हणजे, त्या त्या देशांचा अथवा राज्यांचा प्रशासकीय अधिकारी हाच तर सरकार आणि नागरिक यांच्यात दुवा साधणारा महत्त्वाचा योजक असतो. सत्तास्थाने बदलत असतात, पण अधिकारी मात्र तेच राहतात. म्हणूनच तर त्यांचे जीवन व कार्य नेहमी लोकशाहीने घालून दिलेल्या तत्त्वांशी एकनिष्ठ व अपरिवर्तनीय असावे. एका अर्थाने राज्यव्यवस्था चालविण्याची जबाबदारीच अधिकार्यांवर असते. म्हणून ते खर्या अर्थाने ईश्वरीय व्यवस्थेला चालविणारे प्रतिनिधी आहेत. आदर्श राज्यव्यवस्थेकरिता आदर्श अधिकार्यांबाबतचे तत्त्वचिंतन सर्वात अगोदर वेदांनी प्रतिपादिले. यावरून वैदिक ऋषींची ज्ञानदृष्टी किती सूक्ष्म व व्यापक स्वरूपाची आहे, हे आपणांस निदर्शनास येते. सदरील मंत्रात वर्णिलेल्या प्रशासकीय अधिकार्यांच्या गुणवैशिष्ट्यांचे प्रतिबिंब अगदी पूर्वापार सर्वच राज्यव्यवस्थांवर पडल्याचे दिसते. या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली झाली तर सर्व देश कोलमडणार, यात मुळीच शंका नाही. म्हणून वेदवर्णित प्रशासकीय मूल्यांची अंमलबजावणी करणे, सर्वांसाठी हितकारक आहे. केवळ वर्तमानासाठीच नाही, तर भविष्यासाठीही ते अतिशय समर्पक व उपकारक ठरणारे आहे.
तत्पूर्वी देशाचा राजा किंवा नेता हा देखील तितकाच विलक्षण, कर्मनिष्ठ, दूरदृष्टी बाळगणारा व कर्तव्यतत्पर असावयास हवा. म्हणूनच राजाकरिता या मंत्रात ‘अग्ने’ व ‘अमूर’ (अमूढ) ही दोन संबोधने आली आहेत. या संबोधनावरूनच राजाने किंवा नेत्याने अतिशय दक्ष असावयास हवे, हा संदेश मिळतो. अग्नी हा जसा तेजस्वी प्रकाशमान असतो, तसेच राजानेदेखील तेजोमय बनावे. सर्व प्रकारचा ज्ञानप्रकाश अंगिकारावास हवा! नंतर तो ज्ञानाचा प्रकाश समग्र प्रजेला प्रदान करावयास हवा. तसेच ज्याप्रमाणे अग्नी हा सर्वांना जाळून भस्मीभूत करतो, तद्वतच राजानेदेखील आपल्या देशातील अज्ञान, अविद्या, अभाव व अन्याय या पाप-तापांनाजाळून टाकावे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे अग्नी हा नेहमी ऊर्ध्वगामी असतो, तसेच राजानेदेखील नेहमी इतर सर्व देशांमध्ये आपल्या देशाची व स्वतःची उंची वाढवावी. विविध क्षेत्रांत सर्वोच्च प्रगतीचे शिखर गाठावे. राजा अथवा नेता याचे दुसरे संबोधन म्हणजे अमूर किंवा अमूढ! राजाने कधीही मूढावस्थेत राहता कामा नये. कोणत्याही प्रकारचा भ्रम बाळगायला नको. त्याची बुद्धी तेजस्वी व नि:संशय असावी. असा राष्ट्राचा प्रमुख नेता हाच त्या देशातील प्रशासकीय व्यवस्थेवर आणि तिथे कार्यरत अधिकार्यांवर नियंत्रण ठेवू शकतो. परिणामी, देशाची सर्वोन्नती साधण्याचा मदत मिळू शकते.
वर्तमान युगात विशेषकरून भारतात केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) किंवा राज्य लोकसेवा आयोगा (एमपीएससी) ने निर्धारित केलेल्या पाठ्यक्रमानुसार वेळोवेळी परीक्षा आयोजित केल्या जातात. त्यात विशेष गुणवत्ता प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांची विविध प्रशासकीय पदांवर नियुक्ती केली जाते. त्यात मूल्याधिष्ठित सद्गुणांच्या निकषांना कितपत स्थान आहे, हा चिंतनाचा विषय आहे. उच्च पदांवर अधिकारीवर्ग निवडताना नैतिक सुव्यवहार, मानवता, सद्गुण, सच्चारित्र्य आदी बाबींचा अंतर्भाव असणे फार महत्त्वाची ठरते. यासाठीच तर प्रशासकीय अधिकार्यांकरिता जी आदर्श गुणवैशिष्ट्ये प्रस्तुत वेदमंत्रात वर्णिली आहेत, त्यांचा परामर्श घेणे फारच उपयुक्त ठरते.
१) अस्वप्नजा: अधिकारी वर्ग हा सतत कार्यतत्पर हवा. केवळ स्वप्ने न पाहता, त्या स्वप्नांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा अधिकारी म्हणजे प्रशासनाचे आभूषण होय. झोपेत वेळ न घालवता नेहमी जागरूक राहून आपल्या कार्यात व्यस्त असणारा अधिकारी खर्या अर्थाने शासनाच्या योजना राबविण्यात यशस्वी ठरतो.
२) तरणय: सामान्य नागरिक विविध समस्यांनी ग्रासलेले असतात. जनता दुःखसागरात बुडू लागते, तेव्हा अशा नागरिकांसाठी नौका बनून त्यांना वाचविणारे अधिकारी तत्पर असले पाहिजेत. अडीअडचणीत व संकटात सापडलेली जनता वाट पाहत असते की, आम्हास कोण तारू शकेल? कोण वाचवेल? अशा विपत्काळात एकमेव आधार असतो, तो अधिकार्यांचा! म्हणूनच तरणय: हे त्यांच्याकरिता आलेले सार्थक विशेषण.
३) सु शेवा: जनतेला गरज असते ती उत्तम प्रकारचे सुख देणार्या प्रशासनाची! मोठ्या आपुलकीने, प्रेमाने व तितक्याच निष्ठेने जनता जनार्दनाची सेवा करणारे अधिकारी वर्ग हे नेहमी लोकप्रिय ठरतात. विविध योजना राबवताना आंतरिक सद्भावनेतून प्रेम, दया, करुणा बाळगणारे अधिकारी हे जनतेला निश्चितच सुख व समाधान देऊ शकतात. यासाठीच सु शेवा: हा अधिकार्यांचा मौलिक सद्गुण!
४)अतन्द्रा: अधिकारी हा नेहमीच कार्यदक्ष असला पाहिजे. कोणत्या प्रकारचा आळस किंवा लापरवाही असता नये. प्रत्येक योजनेची अंमलबजावणी करतांना ती तितक्याच बुद्धिमत्तेने व तत्परतेने करावयास हवी. थोडाही प्रमाद नको ती विलंब! सर्व बाबतीत सदैव क्रियाशीलता बाळगत कर्मवीर असणे, हा सुयोग्य अधिकार्याचा गुणधर्म असतो.
५) अवृका: ‘वृक’ शब्दाचा अर्थ लांडगा असा होतो. हा प्राणी नेहमी इतर प्राण्यांवर तुटून पडतो. दुसर्यांचे मांस ओरबाडून खातो. अधिकार्यांमध्ये लांडग्याची वृत्ती असता नये. जनतेची कामे करताना त्यांच्याकडून कधीही लाच घेता नये. थोडक्यात सांगावयाचे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार नको. आज-काल विविध कार्यालयात अधिकारी मोठ्या प्रमाणात लाच घेऊन जनतेची कामे करीत असल्याचे चित्र दृष्टीस पडते. यासाठीच अधिकारी वर्गाने भ्रष्टाचाररहित व प्रामाणिक आचरण करणे गरजेचे!
६)अश्रमिष्ठा: श्रम शब्दाचा रुढार्थ कष्ट किंवा परिश्रम होतो, तर दुसरा अर्थ आराम असा होतो. याप्रसंगी ऐश किंवा आराम हा अर्थ इथे अपेक्षित आहे. ‘न श्रमिष्ठा इति अश्रमिष्ठा.’ अधिकार्यांना कधीही आराम नसतो. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या संत वचनाप्रमाणे ते जनतेच्या कार्यात नेहमीच तत्पर असतात. स्वतःच्या सुख-दुःखांची पर्वा करता जनतेवर कोसळलेली नैसर्गिक संकटे दूर करण्यासाठी ते नेहमी धावून जातात. म्हणूनच ‘अश्रमिष्ठा:’ हा त्यांचा गुण त्यांचे महात्म्य वाढविणारा आहे.
७)पायव: सरकारच्या विविध योजना राबवून जनतेला सुखी कसे ठेवता येईल, हा प्रश्न नेहमीच अधिकार्यांसमोर असतो. खरेतर सर्व योजनांच्या पाठीमागचा उद्देशही नागरिकांच्या पालनपोषणाचाच! अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करीत जनतेचे सर्व दृष्टीने पालन-पोषण कसे होईल, याबाबत चांगले अधिकारी नेहमीच सतर्क असतात. यासाठी ते विविध पातळींवर प्रयत्नशीलदेखील असतात. ‘पा रक्षणे’ या धातूपासून बनलेल्या ’पायु’ शब्दाचा ‘पायव:’ हा बहुवचनी शब्द सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकारी वर्गाने घ्यावयाची काळजी सूचित करतो.
८) सध्र्यञ्च: निषद्य पान्तु!- विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्य करीत असताना अधिकार्यांमध्ये सुसूत्रता हवी. एक दुसर्यांमध्ये सुसंवाद हवा. परस्पर सहकार्याची भावना असली पाहिजे, तरच विविध शासकीय योजनांची उत्तम प्रकारे अंमलबजावणी होऊ शकते. याउलट विसंगती असेल, तर कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. होणार्या दिरंगाईमुळे जनतेलाही त्रास सहन करावा लागतो. सामंजस्य व सुसंवादाची भावना केवळ एखाद्या अधिकार्यांमध्येच असून चालणार नाही, तर ती सर्वांमध्येच असली पाहिजे. असे हे सर्व अधिकारी मग ते कोणत्याही विभागातील असो! आपापल्या पदांवर बसून एकजुटीने, एकदिलाने आणि एक-दुसर्याशी सुसंवाद साधत कार्यतत्पर राहिले, तर निश्चितच सर्वांचे रक्षण होईल.
वरील वेदप्रतिपादित गुणवैशिष्ट्यांचा जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशांत कार्यरत प्रशासकीय अधिकार्यांनी मनोभावे अंगीकार केला, तर त्या-त्या राष्ट्रांचे सर्वांगीण उत्थान झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यामुळे शासन, प्रशासन आणि जनता या सर्वांचेच सर्वदृष्ट्या रक्षण व संवर्धन होण्यास यत्किंचितही विलंब होणार नाही.
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य