मुंबई - केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. या कारवाईमध्ये भाजपचे कार्यकर्ते असलेल्या मनीष भानुशाली आणि किरण गोसावी हे सामील कसे ? असा प्रश्न उपस्थित करुन शंका व्यक्त केली. मलिकांच्या आरोपानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे.
मलिक काय म्हणाले ?
एका व्हिडीओमध्ये एक अधिकारी आर्यन खानला एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनर त्याच व्यक्तीचा आर्यन सोबत सेल्फी व्हायरल झाला. त्यानंतर एएनआयने दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून एक बातमी दाखवली की हा एनसीबीचा अधिकारी नाही. त्यामुळे ही व्यक्ती कोण हा प्रश्न निर्माण होत आहे. हा एनसीबीचा अधिकारी नाही तर आर्यन खानला तो कार्यालयात कसा घेऊन गेला? याचे उत्तर एनसीबीला द्यावे लागेल. एएनआयच्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाणारी व्यक्ती खोटी आहे. पहिल्या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव केपी गोसावी आहे तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव मनिष भानुषाली आहे. मनिष भानुषाली हा भाजपाचा उपाध्यक्ष आहे. मनिष भानुषालीचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत आहेत. एनसीबीला सांगावे लागेल की त्यांचे आणि एनसीबीचे काय संबंध आहेत?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
एनसीबीवर आरोप...
“जेव्हा हे प्रकरण सुरु होते तेव्हा एनसीबीने काही फोटो क्राईम रिपोर्टसना दिले आणि त्यानंतर ते टिव्हीवर दाखवण्यात आले. एनसीबीने बातम्या पेरल्या. हे फोटो दिल्लीच्या एनसीबीद्वारे जारी करण्यात आले आहेत. छापा टाकल्यानंतर पंचनामा केला जातो. जप्त केलेली वस्तू सील करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावी. तपासणीसाठी पाठवायचे असल्यास जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर ते सील करुन पाठवण्यात यावेत असे नियम आहेत. हे व्हिडीओ झोनल कार्यालयाचे आहेत हे स्पष्ट होत आहे. हे प्रकरण प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलं आहे. एनसीबीने झोनल संचालकांसोबत गोसावीचे काय संबध आहेत याचा खुलासा करायला हवा. जर एनसीबी हे अधिकारी त्यांचे नाहीत असे म्हणत असतील तर ते कसे काय दोघांना घेऊन जात होते? एनसीबीला अधिकार आहेत का बाहेरच्या लोकांना घेऊन धाड टाकता येते जर असेल तर त्यांनी खुलासा करावा, असे मलिक म्हणाले.
भानुशाली म्हणाले....
मनीष भानुशालींनी मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले आहे, की मला क्रूझ वर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीबद्दल माहिती मिळाली होती. त्यामुळे देशहित म्हणून ही माहिती मी एनसीबीच्या कार्यालयात जाऊन दिली. त्यामुळे मी एनसीबीच्या आॅपरेशनमध्ये सहभागी झालो होतो. राहिला प्रश्न भाजपशी संबंधाचा, तर मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र, त्यापूर्वी मी देशभक्त आहे. मला १ आॅक्टोबरला या ड्रग्ज पार्टीशी माहिती मिळाल्यानंतर मी २ आॅक्टोबरला याची माहिती एनसीबी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना दिल्याचे भानुशाली सांगितले. कारवाई झाल्यानंतर मी साक्षीदार म्हणून आरोपींसोबत जवाब नोंदवण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेलो होतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिली.
आमच्यावरील आरोप बिनबुडाचे.
आम्ही केलेली कारवाई ही नियमानुसार आहे. आमच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. किरण गोसावी आणि मनीष भानुशाली यांनी आम्हाला कारवाईमध्ये मदत केल्याचे, भानुशाली यांनी सांगितले. आर्यन खान आणि इतरांना आम्ही ड्रग्जसह ताब्यात घेतल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले.