मुंबईकरांच्या ‘पार्किंग’कळा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2021   
Total Views |

Mumbai Parking_1 &nb


 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या वाढली, रस्त्यांवरील वाहनांची संख्याही लक्षणीय वाढली. परंतु, त्या तुलनेत पार्किंग व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुंबईत ‘जिथे जागा मिळेल तिथे पार्किंग’ हेच सूत्र आजही कायम दिसते. तेव्हा, मुंबईकरांच्या या ‘पार्किंग’कळा आणि त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी पालिकेने केलेली पार्किंगची व्यवस्था अद्याप पुरेशी नसून त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढायची वेळ आता आली आहे.
 
 
वाहनतळ-समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रथमच तज्ज्ञ मंडळींचा आणि सुजाण नागरिकांचा चमू ‘तज्ज्ञ समिती’ म्हणून नेमला आहे. कोरोना टाळेबंदीमुळे काम बंद झालेल्या २०१९च्या या समितीत १५ सदस्य आहेत. आता ही समिती परत कार्यरत होऊन या विषयावरील चर्चेकरिता जमली होती. या चर्चेत एक नवी संस्था ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरण’ म्हणून उदयाला आली. या समितीच्या मुख्यपदी ‘आयएएस’ अधिकारी रामनाथ झा यांची नेमणूक करण्यात आली असून या समितीकडून वाहनतळ समस्येतून निर्माण झालेली मुंबईतील वाहतूककोंडी कशी दूर करता येतील, यासंबंधी सर्वंकष धोरण आखले जाईल. २०१९ मध्ये तत्कालीन मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मधील (TISS) काही तज्ज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या रस्ते विभागातील कार्यकारी अभियंते राजेंद्र गांधी यांच्याबरोबर बैठक घेतली होती. त्यानुसार मुंबईत एकूण नोंदणीकृत ३४ लाख वाहनांकरिता ३० लाख पार्किंग जागा असायला हव्यात. (११ लाख चारचाकी वाहने व १९ लाख दुचाकी वाहने)
 
 
पार्किंग धोरणावरून उच्च न्यायालयाकडून ठाकरे सरकारची कानउघडणी
 
 
या सुनावणीदरम्यान मुंबई शहराच्या एकूणच बकालपणावरून न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. “मुंबईत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला ४० टक्के भाग पार्किंगने व्यापलेला असतो. त्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरुन, पदपथांवरुन मार्ग काढणेही कठीण होऊन बसते. मागील काही महिन्यांत कोट्यवधी रुपये खर्चून ‘कूपरेज’ मैदान व परिसरातील रस्त्याचे पूर्ण काँक्रिटीकरण झाले, हा खर्च कशासाठी? वाहनांच्या पार्किंगसाठी का? आज मुंबईची ही अवस्था झाली आहे. नवी मुंबई हे नवं शहर आहे. त्याची अवस्था मुंबईसारखी करू नका,“ अशा शब्दांत न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते.
 
पहिल्या ‘रोबोटिक’ वाहनतळाचे लोकार्पण
 
 
महालक्ष्मी येथील भुलाभाई देसाई रोडला पहिले ‘रोबोटिक’ वाहनतळ गुरुवार, दि. २४ जूनला सुरू झाले. या २१ मजली वाहनतळात २४० वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर एका भव्य प्लेटवर गाडी उभी राहते. याची नोंद स्वागत कक्षात संगणकीय रितीने घेतली जाते. पोलादी प्लेट स्वयंचलितरित्या गाडीसह वाहनतळामध्ये शिरते. यानंतर तब्बल २१ मजली लिफ्टमध्ये गाडी स्वयंचलित रितीने सरकविली जाते. ज्या मजल्यावर गाडीच्या पार्किंगकरिता जागा आहे, तेथे ती पार्क केली जाते. पार्किंगमधून बाहेर काढण्यासाठीसुद्धा ‘रोबोटिक’ स्वयंचलित रितीने ती बाहेर पडते.
 
 
...अन् वाहनतळाने गाडीच गिळली!
 
 
घाटकोपरच्या एका सोसायटीमध्ये अर्धी विहीर बुजवून तेथे वाहनतळ बनविले व गाड्या पार्क केल्या. पहिल्या पावसात जून महिन्यात तेथे पाणी तुंबून एक गाडी त्या विहिरीत घुसली. पोलिसांच्या साहाय्याने ती बाहेर काढायला लागली होती, हे आपल्याला आठवत असेलच.
 
 
दाटीवाटीची मुंबई
 
 
मुंबईतील सुमारे ३४ लाख वाहनांमुळे (२०१९ च्या आकडेवारीप्रमाणे) दोन हजार किमींच्या रस्त्यांवर फार गर्दी झाली आहे. हे सध्याचे रस्ते वाहनांच्या दाटीवाटीने भरून गेले आहेत. कारण, वाहनतळातील क्षमतेपेक्षा जास्त तर वाहनांची संख्या आहे. म्हणूनच अनेक गाड्या रस्त्यांवर व पदपथांवर उभ्या कराव्या लागतात. रस्त्यावरील अशा अवैध पार्किंगचे अनेक तोटे आहेत. मुख्य म्हणजे, यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होते आणि धावत्या गाड्यांचा वेगही मंदावतो. तज्ज्ञांच्या मते, वाहनांचा वेग मंदावल्यामुळे पेट्रोल वा जे इंधन वाहनांकरिता वापरले जाते, ते जास्त फुकट जाते. हवेतील वातावरणात हरितगृह विषारी गॅस तयार होऊन वायुप्रदूषण वाढते. अनेकजण सार्वजनिक बसनी वा खासगी गाड्यांनी प्रवास करतात. त्यामुळे चाकरमान्यांचा, विद्यार्थ्यांचा वा व्यावसायिकांचा मोलाचा वेळ फुकट जातो. त्यांच्या आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो.
 
 
अत्यंत रहदारीच्या एखाद्या रस्त्यात अपघाताची एखादी ठिणगी पडलेली असेल वा कुठे रस्तादुरुस्ती, नालेसफाई, पाणी खात्याचे, कुठल्यातरी मलजलवाहिनी वा पर्जन्यजलवाहिनी वा वीजवाहिनी सेवेचे काम सुरू असेल, तर त्यामुळे होणारे वाहतूककोंडीचे चित्र बघायला नको. कमीत कमी तीन-चार तासांची खोटी होते. पावसाळ्यात तर हटकून पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीची समस्या हमखास निर्माण होते. मुंबईत रस्ते, पदपथ, गल्ली असे कुठेही अवैध पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी व पदपथांवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना चालायलाही साधी जागा मिळत नाही, ही अत्यंत नामुष्कीची गोष्ट. खासकरुन महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना अशावेळी पदपथांवरुन-रस्त्यांवरुन चालताना धोका निर्माण होतो. त्यामुळे वाहतूककोंडीचा त्रास कमी करायलाच हवा. रस्त्यांचा योग्य विनियोग करायचा असेल, तर या वाहतूककोंडीतून मार्ग काढायला हवा. थोडक्यात, पार्किंगच्या समस्या सोडवायला हव्यात. मुंबईत जुन्या पद्धतीप्रमाणे विकासक निवासी इमारतींमध्ये वाहन पार्किंगकरिता पुरेशा जागा राखून ठेवत नसत. त्यामुळे घराजवळच्या रस्त्यांवरच रहिवाशी वाहने पार्क करायला लागले.
 
या पार्किंग समस्येच्या उपाययोजनेकरिता आता पालिकेने विभागनिहाय गाड्या आणि पार्किंगची सोय यांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने विभागातील पार्किंग व त्यांची स्थिती यांचा अभ्यास करण्याचे ठरविले आहे. हे काम पालिकेच्या ‘मुंबई वाहनतळ प्राधिकरणा’तर्फे करण्यात येणार आहे. पालिकेने ‘विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४’ मधील विशेष तरतुदींचे ‘नियम ५१’ अन्वये मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पार्किंगचे सर्व प्रश्न सोडविण्यास हातभार लागणार आहे. गाड्या पार्क करण्याच्या सर्व अडचणी दूर करणे व रस्त्यावरील वाहनतळांची कार्यक्षमता सुधारणे, यासाठी हे प्राधिकरण निकराचा प्रयत्न करणार आहे. विभागनिहाय वाहने व जागा यांची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे.
 
 
सध्या मुंबईत ३० बहुमजली ‘पार्किंग लॉट’ आणि १४ सौजन्यसुविधा असलेले ‘पार्किंग लॉट’ उपलब्ध आहेत. मात्र, हे पार्किंग आणि गाड्यांचे गुणोत्तर अद्याप कमी असल्याने पार्किंगची समस्या काही सुटलेली नाही. पार्किंगची समस्या सोडविण्याकरिता मुंबईत सर्व शासकीय विभागांची एकमेव केंद्रीय धोरण संस्था सज्ज असायला हवी. त्यात पोलीस असो, रस्ता परिवहन असो, मेट्रोची संस्था असो सर्वांच्या विचारविनिमयाने धोरण आखले गेले पाहिजे. या विविध संस्थेचा एक प्रतिनिधी या नवीन ‘पार्किंग ऑथोरिटी’ समितीचा सदस्य म्हणून हवा. पार्किंग धोरणात फक्त पार्किंग कसे असावे, याविषयीच धोरण स्पष्ट असण्याशिवाय त्यात कोणी रस्त्यावरचे धोरण योग्यरीत्या अंगीकारले नाही म्हणून दंड वा शिक्षा ठोठावण्याचे धोरणही असायला हवे. सद्यस्थितीत पोलीस खात्याला ही दंड करण्याची तरतूद आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी २०२१-२२च्या अर्थसंकल्पीय सभेत भाषण देताना सांगितले होते की, ही दंडाची रक्कम पार्किंगमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरली जाईल. मुंबईतील सर्व २४ प्रभागांकरिता प्रत्येक प्रभागात वाहतूक व्यवस्थापन आराखडा केलेला असणार व त्यात रस्त्यावरच्या व रस्त्याबाहेरच्या पार्किंगकरिता जास्तीत जास्त सोईचे ‘जीआयएस’ मॅपिंग करणार.
 
 
पार्किंगच्या जागा कुठे असणार, जुन्या पद्धतीच्या घरांजवळ नाममात्र शुल्कासहित. रेल्वे स्थानकाजवळ, मेट्रोस्थानकाजवळ, मॉलमध्ये, हॉस्पिटलमध्ये वा मोठ्या व्यवसायानजिक इत्यादी गोष्टी ‘एमपीए’ समिती प्रत्येक प्रभागाकरिता ठरवेल. परंतु, काही ‘पार्किंग लॉट्स’ मुंबईत तयार आहेत ते खालीलप्रमाणे त्या ‘लॉट्स’चाही फायदा उठविता येईल. मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवर एकूण ९१ ‘पार्किंग लॉट्स’ तयार केले आहेत, त्यातील ५० ‘लॉट्स’ पालिका व्यवस्थापनात आहेत आणि उर्वरित ४१ ‘लॉट्स’ कंत्राटदारांकडे होते ते आता प्रभागांच्या ताब्यात गेले आहेत. हे ‘लॉट्स’ कुठे आहेत ते बघण्याकरिता पालिकेने एक फिल्म तयार केली आहे. एक अ‍ॅपदेखील तयार केले आहे. त्यातून पार्किंगसाठी किती जागा रिकाम्या आहेत व इतर तरतुदींची माहिती होईल. 
 
 
 
मध्य रेल्वेने छशिमटजवळ अधिकृत ‘पार्किंग लॉट्स’ तयार केले आहेत.‘स्मार्ट पार्किंग’ वांद्रे-कुर्ला संकुलात पार्किंग तयार होत आहे. ‘मेट्रो-३’च्या कफ परेड स्थानकाजवळ १९२ ‘पार्किंग लॉट्स’ तयार होणार आहेत. ठाणे व नवी मुंबईत ‘पार्किंग लॉट्स’ - ‘मेगा पार्किंग लॉट्स’ ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर तयार होणार आहेत. असेच नवी मुंबई महानगरपालिका लवकरच पार्किंग धोरण ठरवून नवी मुंबईत ‘पार्किंग लॉट्स’ तयार करणार आहे. मुंबईत व इतर शहरात लवकरच पार्किंगकरिता धोरण राबविले जाऊन वाहन चालकांकरिता ‘पार्किंग लॉट्स’ वाजवी शुल्कामध्ये उपलब्ध होतील, अशी आशा करूया. लॉकडाऊनची स्थिती आता संपल्यात जमा असल्याने पार्किंगची समस्या अधिक उग्र रूपही धारण करु शकते. तेव्हा, मुंबई महानगरपालिकेने पार्किंगची समस्या ही लवकरात लवकर सोडवावी व मुंबईकरांना वाहतूककोंडीच्या समस्येतून मुक्त करावे, हीच अपेक्षा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@