६ तास फेसबुक बंद पडल्यामुळे जुकरबर्गच्या संपत्तीत ५२ हजार कोटींची घट

    05-Oct-2021
Total Views |
facebook _1  H



मुंबई -
जगभरात सोमवारी रात्री नऊच्या सुमारास फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या सेवा अचानक बंद पडल्या. यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सर्व्हर डाऊन झालेली सेवा सुमारे सहा तासांनी पूर्ववत करण्यात आली. मात्र, हे काही तास मार्क झुकरबर्गसाठी जड ठरले आणि त्यांचे खूप मोठे नुकसान झाले. फेसबुकचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झुकेरबर्ग यांची संपत्ती सात अब्ज डॉलर (सुमारे ५२,१९० कोटी रुपये) कमी झाली आहे. यामुळे तो अब्जाधीशांच्या यादीत एक पायरी खाली घसरला आहे.
 
 
 
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार झुकेरबर्ग जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये आता बिल गेट्स यांच्या खाली ५ व्या क्रमांकावर आहे. आकडेवारी दर्शवते की, सप्टेंबरपासून त्याची संपत्ती सुमारे १९ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. अमेरिकन शेअर बाजारात फेसबुकचे शेअर्सही घसरले. शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून हा स्टॉक १५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आता झुकेरबर्गची संपत्ती १२२ अब्ज डॉलरवर आली आहे. काही दिवसांपूर्वी तो श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होता. पण आता तो पुन्हा बिल गेट्सच्या मागे आहे. १२४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गेट्स आता या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत.
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही वापरकर्त्यांची या दोषाबद्दल माफी मागितली आहे. फेसबुकने एक निवेदन देखील जारी केले आहे की, ते जगभरातील लोकांना आणि व्यवसायांना झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त करते. मात्र, या तांत्रिक त्रुटीचे कारण काय आहे हे फेसबुकने सांगितले नाही. त्याचवेळी, व्हॉट्सअॅपने वापरकर्त्याला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमा मागणारे निवेदनही जारी केले आहे. असे म्हटले गेले की व्हॉट्सअॅपच्या सेवा हळूहळू सामान्य होत आहेत आणि तांत्रिक अडचणी दूर केल्या जात आहेत.