वनवासींचा ‘हेल्पिंग हॅण्ड’ समीर चव्हाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Oct-2021   
Total Views |

Samir _1  H x W




वनवासी बांधव हे २१व्या शतकातसुद्धा सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. ही गोष्ट डोंबिवलीतील समीर चव्हाण यांना अस्वस्थ करून गेली. त्यानंतर वनवासींच्या सर्वांगीण विकासाचा सामाजिक वसा त्यांनी घेतला. त्यांच्या या सामाजिक कार्याविषयी जाणून घेऊया...
 
 
समीर चव्हाण यांचा जन्म डोंबिवलीतील दहा बाय दहाच्या घरात झाला. आयुष्यात पुढे जाण्याचे ध्येय ठेवून त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. दहावीत त्यांना उत्तम गुण मिळाले. त्यानंतर त्यांनी हुशार विद्यार्थी निवडतात त्या शिरस्त्याप्रमाणे इंजिनियरिंगची निवड केली. पण त्यांचा प्रवास सर्वसामान्यांसारखा सोपा नव्हता. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणी येत होत्या पण शिक्षणही थांबविता येत नव्हते.
 
 
पैशाची कमतरता जाणवू नये, याकरिता त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. एकीकडे शिक्षण सुरू असतानाच दुसरीकडे नाईट ड्युटी करीत त्यांचा जीवनप्रवास सुरू होता. त्यांनी डिप्लोमा केमिकल, डिप्लोमा पेट्रोकेमिकल, बीएससी, एमबीए फायनान्स, एमबीए ऑपरेशन, डिप्लोमा बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, डिप्लोमा इंडस्ट्रियल मॅनजेमेंट, डिप्लोमा फायर सेफ्टी आणि सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. याव्यतिरिक्तही त्यांनी अनेक अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. सरकारी नोकरी मिळविणे म्हणजे आयुष्यात सर्व काही मिळाले, असाच आपल्याकडे एक समज आहे. समीर यांनी आपल्या हिमतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षा पार करून वयाच्या तिसाव्या वर्षी ते ‘भारत पेट्रोलियम’ या सरकारी सेवेत रुजू झाले. घरची परिस्थिती बदलत असल्याने समीर यांचे आई-वडीलदेखील खूश होते.
 
 
‘एमबीए’ करीत असताना ‘एक्स्ट्रा अ‍ॅक्टिव्हिटी’ म्हणून समीर एका वृद्धाश्रमात गेले होते. तिथूनच त्यांच्यात सामाजिक सेवेचे बीज रुजले. एका आजोबांनी त्यांना ‘मधुबाला’ची कॅसेट मागविली होती. ती कॅसेट देण्याचे वचनही समीर यांनी आजोबांना दिले होते. धकाधकीच्या जीवनात वेळेअभावी समीर यांना ती त्या ठिकाणी जाऊन देता येणे शक्य झाले नाही. समीर वृद्धाश्रमात गेले, तेव्हा आजोबा हयात नव्हते. समीरने कॅसेट पोहोचविण्यास खूपच उशीर केला होता. ते आजोबा शेवटच्या क्षणापर्यंत समीर कॅसेट घेऊन येईल, या विश्वासावर जगत होते, हे समजले. आजोबांना तो आनंदही आपण देऊ शकलो नाही, ही खंत त्यांच्या मनाला लागून राहिली. वेळेचे महत्त्व समीर यांना त्यादिवशी समजले. वेळ मिळत नसतो, तो काढावा लागतो, हे समीर यांच्या लक्षात आले. या घटनेने समीर यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.
 
 
कोणतेही कार्य करताना ते एकट्याने करणे शक्य नसते. त्यामुळे समीर यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र केले अन् येथेच ‘हेल्पिंग हॅण्ड’ या संस्थेचा जन्म झाला. सामाजिक जाणीव प्रबळ असेल, तर सर्व शक्य होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डोंबिवलीतील ‘हेल्पिंग हॅण्ड’ ही संस्था आहे. २०१४पासून ‘हेल्पिंग हॅण्ड’ या संस्थेने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. पण, समाजासाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्यानंतर खर्‍या अर्थाने ‘हेल्पिंग हॅण्ड’च्या कामाला सुरुवात झाली ती शहापूर तालुक्यातून. त्यासाठी आटगाव स्थानकापासून २० किलोमीटरवर असलेल्या गरेलपाड्याची जागा, गरेलपाड्यात वनवासींना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होती.
 
 
मग त्यापुढे आरोग्य आणि शिक्षण या गोष्टींना दुय्यम स्थान होते. या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार समीर यांनी मनाशी पक्का केला होता. १५ फेब्रुवारी, २०१५ला त्यांनी ‘हेल्पिंग हॅण्ड’ या संस्थेची नोंदणी केली. गरेलपाड्यातील समस्यांचे मूळ शोधण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. पाड्यात अस्वच्छता, वैद्यकीय सेवेचा अभाव आणि कुटुंबाचे आकारमान मोठे म्हणजेच प्रत्येक घरी सात ते आठ मुले. त्यातच बालमृत्यूचे प्रमाणही दिसून येत होते. कुपोषित बालके, महिला आणि बालमृत्यू, शिक्षणाची दुरवस्था, पावसाळ्यानंतर पाण्यासाठीही वणवण करावी लागत होती. या सगळ्याचा समीर यांनी अभ्यास केला. वनवासी पाड्यातील लोकांचा ‘हेल्पिंग हॅण्ड’ संस्थेवर विश्वास नव्हता.
 
 
पण, या परिस्थितीतही समीर यांनी त्या प्रसंगांना तोंड दिले. त्यांनी ‘आरोग्य आपल्या दारी’ या उपक्रमातून दोन वर्षांत २० आरोग्य शिबिरे परिसरात घेतली. या शिबिरातून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचीही तपासणी करण्यात आली. गरेलपाड्यासह आजूबाजूच्या परिसरातील सुमारे पाच हजार नागरिकांची तपासणी करून एक लाख रुपयांपर्यंतची औषधे वाटण्यात आली. कुपोषणावर पर्याय म्हणून त्यांनी सर्वसमावेशक आहार पाड्यातील प्रत्येक घरी देण्यास सुरुवात केली. परिणामी, कुपोषित बालके आढळून येणे बंद झाले. कुटुंबनियोजन व त्यासाठीचे समुपदेशनाचे कामही संस्थेने केले. त्यानंतर मुलांचे शिक्षण हीदेखील एक समस्या होती. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ‘रोटरी क्लब डोंबिवली मिडटाऊन’च्या माध्यमातून दीड लाख रुपये खर्च करून बंधारा बांधला.
 
 
महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडणे, असे अनेक उपक्रम राबविले. गरेलपाडा हे गाव नकाशातही सापडणार नाही. पण, त्याचा आज कायापालट झाला आहे. हा समीर यांचा प्रवास एका लेखात सामावू शकेल एवढा नाही. या गावातील नानाविध प्रश्न त्यांनी सोडविले आहेत. ‘हेल्पिंग हॅण्ड’ या ग्रुपचे रूपांतर आता ‘हेल्पिंग हॅण्ड वेल्फेअर सोसायटी’ या संस्थेत झाले आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन उपयोग नाही, तर त्यांना उच्चशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, तरच त्यांचा विकास होईल, असे समीर चव्हाण यांचे मत आहे. त्यांनी दहा वनवासी मुलांचे त्यांनी पालकत्व स्वीकारले आहे. अशा या अवलियाला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.







@@AUTHORINFO_V1@@