देगलूर-बिलोली मतदारसंघ कुणाचा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

deglur_1  H x W


नांदेड:
जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी शनिवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी,दि. ०2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून हा मतदारसंघ नेमका कुणाचा आहे, हे स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने ही जागा रिक्त होऊन आता पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड हा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परंतु, ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक चुरशीची झाली असून यात कोणाला विजय मिळतो हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे. अंतापूरकरांच्या निधनाने रिक्त झालेली ही जागा पुन्हा एकदा मिळविण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे.


त्याचबरोबर राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेसुद्धा ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी संपूर्ण ताकद प्रचारात लावल्याचे दिसून येते. तत्पूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप परत एकदा चमत्कार घडवून आणणार की काँग्रेस आपली जागा कायम राखणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीनेदेखील इथे डॉ. उत्तम इंगोलेंना आपली उमेदवारी देत निवडणुकीत रंग भरला आहे. डॉ. इंगोलेंच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या देगलूर-बिलोलीत दोन मोठ्या सभा झाल्या. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळणार्‍या मतांवर भाजप आणि काँग्रेसच्या जय-परायजयाचं गणित अवलंबून असणार आहे.
काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरांच्या प्रचाराची संपूर्ण भिस्त माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर अवलंबून होती. अशोकराव चव्हाणांच्या सोबतीला प्रचारासाठी राज्य सरकारातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, नसीम खान, माणिकराव ठाकरे, अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, इमरान प्रतापगढी यांच्यासह मविआचे अनेक आमदार आणि वरिष्ठ नेते मंडळी प्रचारात होती.
सुभाष साबणे यांच्यासाठी भाजपच्यावतीने अनेक प्रमुख नेते आणि केंद्रीय नेते या प्रचारात उतरलेले दिसले. त्यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भगवंत खुब्बा आणि केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले, आ. गोपीचंद पडळकर, आ. नितेश राणे यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचारात होते. ही पोटनिवडणूक असली, तरी दोन्ही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे.
काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर हे राजकारणात नवखे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर जितेश यांना मतदारांची सहानुभूती आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून काँग्रेस करत असलेली कामे यामुळे ते विजयी होतील, असा अंदाज महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बांधताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय पातळीवरून ग्रामीण भागातील जनतेसाठी सुरू केलेल्या पीक विमा, शेतकर्‍यांना दिलेली ‘कृषी साहाय्यता निधी’, ‘उज्ज्वला गॅस योजना’, महामार्ग विकास यांसारख्या विविध उपक्रमांमुळे जनतेत नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपला मानणारा मोठा वर्गही आहे. तसेच माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात केलेल्या विकासकामांच्या बळावर भाजप मतदारांना सामोरा जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची पद्धत आणि स्वच्छ प्रतिमा ही अनेक शिक्षित, तरुण मतदारांना आकर्षित करते आहे.
तसेच देगलूर नगरपालिकेतील एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीत राजकीय समन्वयाचा मोठा अभाव असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची नाराज मंडळी गुप्तपणे भाजपला साथ देतील, असाही अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीनेही बौद्ध उमेदवार देत मोठ्या संख्येने असलेल्या या जातीच्या मतदारांना आपल्याकडे ओढत ही निवडणूक तिरंगी केली आहे. त्यामुळे सुरुवातीला दुरंगी वाटणारी निवडणूक ही लढत आता अटीतटीची होणार असून अंतिमतः विजय कोणाचा होईल, याबद्दल मतदारसंघात चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे. तसेच अशोक चव्हाणांचे मेहुणे माजी खासदार भास्कर पाटील खतगावकर ऐन निवडणुकीत भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. भास्कर खतगावकरांची ही घरवापसी काँग्रेसला फायद्यापेक्षा अडचणीचीच ठरेल, अशी चर्चा देगलूर बिलोलीत आहे.
मतदारसंघाचा इतिहास
भाजपचे उमेदवार सुभाष साबणे हे आधी शिवसेनेत होते. महाविकास आघाडीत सामील असलेल्या शिवसेनेकडून येथून लढण्यासाठी तिकीट मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मूळचे मुखेडचे असलेले साबणे हे यापूर्वी मुखेड आणि देगलूर विधासभा मतदारसंघात तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. १९९९ ते २००९ या काळात ते मुखेड-देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मात्र, त्यानंतर परिसीमन आयोगाने केलेल्या फेरबदलानंतर देगलूर-बिलोली हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देगलूर-बिलोली हा एक मतदारसंघ झाला. या मतदारसंघातून त्यांनी २००९, २०१४ आणि २०१९ अशी तीन वेळा निवडणूक लढवली. यात २०१४ ला त्यांचा विजय झाला होता, तर २००९ आणि २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकरांनी साबणे यांना पराभूत करत विजय मिळविला होता.



मतदारसंघातील प्रमुख समस्या
देगलूर-बिलोली हा मतदारसंघ सीमावर्ती विधानसभा क्षेत्र म्हणून ओळखला जातो. नांदेड जिल्ह्यातील ही दोन्ही तालुके तेलंगण आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असून व्यापार आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. येथील मतदारसंख्या सुमारे २ लाख, ९० हजार, ३९७ एवढी आहे. या संपूर्ण मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही. खानापूर ‘एमआयडीसी’ केवळ नावालाच आढळते. अजूनही मोठे उद्योग व्यवसाय या ठिकाणी नाहीत. दोन्ही तालुक्यात अंतर्गत रस्त्यांची मोठी समस्या आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने वाहून गेलेले रस्ते-पूल अद्याप ‘जैसे-थे’ आहेत. शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, रस्ते, सिंचन, आणि कृषी यासारख्या क्षेत्रात अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.


मतदारसंघातील जातीय बलाबल


मराठा : ६८, ३६६ : २४ टक्के
बौद्ध : ३९ , ५६० : १४ टक्के
आर्यवैश्य (कोमटी) : ३८, ९४४: १३ टक्के
लिंगायत : ३६, ७०९: १३ टक्के
मुस्लिम : ३४, ४११: १२ टक्के
मन्नेरवारलू : २०, ७०९: ७ टक्के
मारवाडी-गुजराती : १५,४५५: ५ टक्के
चांभार : १२, ३३३: ४ टक्के
जैन : १२, ३३०: ४ टक्के
हटकर-धनगर : ११, ४९० : ४ टक्के
एकूण मतदारसंख्या : २,९०,३९७


मतदारसंघात येणार्‍या गावांची संख्या


देगलूर : १०५
बिलोली : ८४
@@AUTHORINFO_V1@@