मुस्लीमबहुल इंडोनेशियातील सुकमावातींचे स्वगृही परतणे म्हणजे जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट साध्य करणे; जणू समस्त हिंदू धर्माने अधर्माविरुद्ध घेतलेली गरुडझेपच. म्हणून भारतीय चश्म्यातून पाहता तसेच हिंदू धर्मीयांचे भारतातील संख्याबळ (आणि त्यायोगे प्राप्त होणारे जागतिक वलय) लक्षात घेता सदर घटना एकूण हिंदू जगताच्या दृष्टीने मोठीच आहे.
मंगळवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी, आपल्या ७० व्या वाढदिवशी इंडोनेशियाच्या एके काळच्या ‘फर्स्ट फॅमिली’च्या सदस्य सुकमावती सुकर्णपुत्री यांनी इस्लामचा त्याग करून पूर्वजांच्या हिंदू धर्मात पुन:प्रवेश केला. समाज-माध्यमांचा सुकाळ असल्यामुळे सदर बातमीने भारतीय हिंदू समाजात बरीच रोमांचक खळबळ निर्माण केली. ते नजरेआड करूनसुद्धा ही घटना अनेक अंगांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय-स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच अर्थपूर्ण आणि महत्त्वाची मानावी लागेल. तिचे महत्त्व जाणून घेण्यासाठी इंडोनेशियाच्या धार्मिक आणि राजकीय पार्श्वभूमीवर नजर टाकणे आवश्यक आहे, तसेच सुकमावतींचा वैयक्तिक आणि कौटुंबिक परिचय थोडक्यात करून घेणे भाग आहे.
स्वतंत्र भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात जरी आजतागायत शिकवले गेले नसले, तरी जगातील इतिहासकारांनी इंडोनेशियाच्या प्राचीन काळापासूनच्या जडणघडणीमधील भारतीय (हिंदू-बौद्ध) संस्कृतीचे अतुलनीय योगदान १९ व्या आणि २० व्या शतकातच सुसंगतरीत्या शब्दबद्ध करून ठेवले आहे. स्थानिक परिस्थितीमध्ये इंडोनेशियाच्या दोन प्रमुख बेटांमधील- जावा आणि सुमात्रा-राजकीय वर्चस्व-स्पर्धा परंपरेने अनेक शतके ( ६ वे ते १३ वे शतक) चालू होती. त्यात योगायोग असा की, जावातील सत्ताधारी राजवंश परंपरेने बहुतांश हिंदू तर सुमात्रातील बौद्ध होते. अखेरीस १३ व्या शतकात जावास्थित बलाढ्य माजापाहित राज्याने बाजी मारली आणि आजच्या नकाशात दिसणारा इंडोनेशिया पूर्णत: स्वत:च्या अंकित केला. मध्यंतरीच्या काळात सुमात्रामध्ये १३ व्या शतकापासूनच इस्लाम रुजत चालला होता. त्याचा प्रसार यथावकाश जावामध्येही होत गेला आणि १६ व्या शतकापर्यंत संपूर्ण जावा बेट इस्लाममय झाले. त्याची राजकीय परिणती माजापाहित राज्याचा शेवट होण्यात आणि त्या राज्याच्या ज्या धुरिणांनी शेवटपर्यंत इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला त्यांचे अपरिहार्य पलायन शेजारच्या बाली बेटावरच्या हिंदू राज्यात होण्यात झाली. ही समग्र पार्श्वभूमी माहीत करून घेणे आजच्या इंडोनेशियातील घडामोडी समजून घेण्यासाठी, त्यांच्यातील अतूट परस्पर-संबंधामुळे, अत्यंत आवश्यक ठरते.
स्थूल इतिहासानुसार, जावा आणि सुमात्रा हे देशांतर्गत तुल्यबळ प्रतिस्पर्धी जरी भासले तरी परंपरेने जावा प्रांत सांस्कृतिकदृष्ट्या सदैव श्रेष्ठ गणला गेला आणि राजकीयदृष्ट्याही बलवान राहिला. त्याच्या सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचे श्रेय त्याच्या (इतर प्रांतांच्या तुलनेत) भारताशी जुळलेल्या शतकानुशतकांच्या घट्ट सांस्कृतिक नात्याला जाते, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. एका प्रतिष्ठित कुटुंबात जन्माला येऊन, इंडोनेशियावर ३०० वर्षे वासाहतिक सत्ता गाजवणार्या डच राजवटीविरुद्ध स्थानिक जनतेचा स्वातंत्र्यलढा उभारणारे, त्यायोगे १९४९ साली स्वातंत्र्य मिळवून देशाचे पहिले सर्वेसर्वा अध्यक्ष होण्याचा मान मिळवणारे आणि जनतेच्या हृदयात आरूढ असल्यामुळे त्या पदावर सलग १८ वर्षे राहणारे सुकार्नो (सुकर्ण) हे याच जावाचे. सदर सुकर्ण महाशयांच्या द्वितीय पत्नी फातमावती यांच्यापासून त्यांना लाभलेले तृतीय कन्यारत्न म्हणजे सुकमावती, ज्या आपल्या नावापुढे सुकर्णपुत्री असा उल्लेख आवर्जून करतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे सुमात्रा, जावा या क्रमाने (बाली वगळता) संपूर्ण इंडोनेशिया १७ व्या शतकापर्यंत इस्लाममय झाला असला, तरी त्याच्या इस्लामीकरणात (भारतात किंवा जगात इतर अनेक ठिकाणी झालेल्या इस्लामीकरणाच्या तुलनेत) एकूण कमी संघर्ष किंवा रक्तपात झाला (ज्याची मीमांसा या लेखात जागेअभावी शक्य नाही). त्या भिन्न परिस्थितीत आपल्याला परिचित असलेल्या इस्लामच्या तुलनेत कमी कडवट इस्लाम इंडोनेशियात, विशेषत: जावामध्ये, त्या काळी रुजला, जो पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इंडोनेशियन इस्लाम’ या शब्दांनी गौरवला गेला. या पार्श्वभूमीमुळे सुकर्ण यांच्या मुस्लीम वडिलांनी महाभारतातील त्यांच्या आवडीच्या पात्राचे (कर्णाचे) नाव अभिमानाने स्वत:च्या मुलाला ठेवणे शक्य होते. तीच वृत्ती पुढे सहज सुकर्ण यांच्याकडून जोपासली गेल्यामुळे तेही त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात बड्या परदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी रामायण आणि महाभारतातील प्रसंगांवर आधारित नृत्यादी कार्यक्रम त्यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी आयोजित करत. किंबहुना माजापाहित (हिंदू) राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमी कामगिरीचा आणि आग्नेय आशियातील त्याच्या सदर प्रतिमेचा सुकर्ण यांना एवढा अभिमान वाटत असे की, त्या राज्याचा तत्कालीन नकाशा त्यांच्या अध्यक्षीय कार्यालयात कायम टांगलेला असे. त्यांनी स्वत:च्या मुलांची नावेही गुरू, मेघावती, सुकमावती अशी हिंदू पद्धतीनेच ठेवली (त्यापैकी मेघावती हे नाव स्वातंत्र्यलढा चालू असताना त्यांच्या दोन सहकार्यांची धाडसी हवाई सुटका करणार्या तत्कालीन भारतीय वैमानिक आणि पुढे यशस्वी राजकारणी झालेल्या बिजू पटनाईक यांच्या सूचनेला मान देऊन ठेवले होते).
ही सर्व पार्श्वभूमी न्याहाळता सुकमावतींनी हिंदू धर्मात पुन:प्रवेश करून फार मोठी क्रांती वगैरे काही घडवली नाही, असा समज प्रथमदर्शनी होऊ शकतो. परंतु, सद्यस्थिती खर्या अर्थाने समजून घेण्यासाठी सदर समजाचा दोन पातळीवर प्रतिवाद करावा लागतो. त्यापैकी एक आहे, भारतीयांच्या अनुभवविश्वाशी संबंधित-पाकिस्तान देऊन टाकल्यानंतरच्या उर्वरित भारतातसुद्धा इस्लामी कट्टरतेला सातत्याने सहन करत पिचत गेलेल्या, मात्र अलीकडच्या मोदी-शासनाच्या काळात थोडीफार उभारी लाभलेल्या हिंदू मनाच्या दृष्टीने, विशेषत: ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात यशस्वी ठरू न शकलेल्या ‘घरवापसी’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, मुस्लीमबहुल इंडोनेशियातील सुकमावातींचे स्वगृही परतणे म्हणजे जवळजवळ अशक्य कोटीतील गोष्ट साध्य करणे; जणू समस्त हिंदू धर्माने अधर्माविरुद्ध घेतलेली गरुडझेपच. म्हणून भारतीय चश्म्यातून पाहता तसेच हिंदू धर्मीयांचे भारतातील संख्याबळ (आणि त्यायोगे प्राप्त होणारे जागतिक वलय) लक्षात घेता सदर घटना एकूण हिंदू जगताच्या दृष्टीने मोठीच आहे.
दुसरा संदर्भ आहे तो गेल्या काही दशकांमध्ये इंडोनेशियात सातत्याने वाढीला लागलेल्या इस्लामी कट्टरतेचा. आक्रमकता ही इस्लामची मूळ ओळख ‘इंडोनेशियन इस्लाम’च्या आवरणाखाली बराच काळ दबलेली असली तरी जागृत होती, संधी मिळताच फणा काढणे तिने सोडले नव्हते. त्याची जाणीव २००२ साली बालीमध्ये झालेल्या ‘जिहादी बॉम्बस्फोटां’मुळे आणि त्यात गेलेल्या २०० हून अधिक (त्यात परदेशी नागरिकांची संख्या सर्वाधिक) बळींमुळे जगालाही झाली होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आक्रमकतेला केवळ बचावाच्या बळावर प्रदीर्घ काळ झुंजवणे आणि त्यावर मात करण्यात यशस्वी होणे हे निसर्गनियमाच्या विरुद्ध आणि म्हणूनच (जगाच्या पाठीवर कुठेही) अशक्यप्राय आहे. मुस्लीमबहुल इंडोनेशियामध्ये कट्टरतेच्या निमित्ताने का होईना, पर्यायाने इस्लामविरोधी भूमिका, तीसुद्धा सातत्याने (तसे करण्यास भाग पडल्यामुळे) घेत राहणे राज्यकर्त्यांना राजकीयदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. आजतागायत ते तसे करू शकले हा त्यांच्या कौतुकाचा भाग, मात्र भविष्यातही ते तसेच बिनघोर करू शकतील आणि त्याचबरोबर स्वत:ची सत्ताही टिकवू शकतील, असे समजणे धारिष्ट्याचे होईल. इंडोनेशियाच्या राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या धार्मिकदृष्ट्या उदारमतवादी ‘पंचशील’ तत्त्वे मोडीत काढावीत आणि देशाला शेजारील मलेशियाप्रमाणे इस्लामी राष्ट्र घोषित करावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या इस्लामी संघटना कार्यरत आहेत. म्यानमारच्या रोहिंग्यांच्या समर्थनार्थ राजधानी जकार्तामध्ये फडकणारे झेंडे ‘इंडोनेशियन इस्लाम’ची जागा जागतिक ‘उम्मा’ घेत आहे, हे कसे दर्शवत होते ते पाच वर्षांपूर्वी प्रस्तुत लेखकाने पाहिले होते. सारांशात सांगायचे तर वाढत्या इस्लामी कट्टरतेला पूर्णत: बांधून ठेवणे यापुढे हळूहळू अशक्य होणे आणि त्याचा राज्यशकटाच्या अधिकृत व्यवस्थेत किंवा उपांगांत शिरकाव होणे हे भविष्यातील इंडोनेशियाचे चित्र असू शकते. (त्यावर भारत, एक जबाबदार शेजारी म्हणून काही उपाययोजना करू शकतो का, हा स्वतंत्र विषय आहे).
सदर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा सुकमावतींनी मार्च २०१८ मध्ये एका जाहीर समारंभात ‘इबू इंडोनेशिया’ (‘भारतमाता’च्या धर्तीवर, ‘माता इंडोनेशिया’) या स्वत:च्या कवितेचे वाचन केले (ज्यात मातृभूमीला ‘आयात’ इस्लामपेक्षा वरचे स्थान दिले होते) त्याचा इस्लामी संघटनांतर्फे निषेध करण्यात येऊन त्यांच्या विरोधात ‘धर्मनिंदेचे’ हुकमी हत्यार उपसण्यात आले. एकूण कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमीच्या वलयामुळे (ज्यात वडील सुकर्ण यांच्या कीर्तीसोबत मोठी बहीण मेघावतीच्या २००१ ते २००४ मधील अध्यक्षपदाची कारकीर्द इ.) त्या सदर संकटाचा यशस्वी मुकाबला करू शकल्या. अशा संबंधित अनुभवांतून मिळालेल्या शिकवणीचा उपयोग त्यांनी परवाच्या ‘स्वगृही’ परतण्याचा निर्णय जाहीर करताना केला, त्या निर्णयाच्या समर्थनार्थ ज्या मुद्द्यांची जंत्री त्यांनी सादर केली-स्वत:च्या हिंदू आजीकडून (सुकर्ण यांची आई) प्रेरणा मिळणे, स्वत:चे माता-पिता (ज्यांनी इस्लामची शिकवण देणे अभिप्रेत आहे) सध्या हयात नसणे, सर्व भावंडांची परवानगी असणे, तसेच पती हयात नसल्यामुळे स्वत:च्या मुलांची परवानगी असणे इ. - ती मोठी उद्बोधक आहे. आजच्या इंडोनेशियामध्ये (सुदैवाने अजूनही) असे धर्मांतर होऊ शकत असले, तरी ते सोपे मात्र अजिबात नाही हेच सुकमावतींनी अनुसरलेल्या अतिसावध पवित्र्यावरून निदर्शनास येते आणि त्यावरूनच सुकमावतींच्या जागी जर एक सर्वसाधारण व्यक्ती असती, तर तिला ते किती कठीण गेले असते याचाही अंदाज बांधता येतो.
सुकमावतींना स्वत:चीसुद्धा स्वतंत्र राजकीय ओळख आहे. इंडोनेशियाचे द्वितीय अध्यक्ष सुहार्तो यांच्या पतनानंतर (१९९८ ), त्यांनी 'Partai Nasional Indonesia' (PNI)’ या राजकीय पक्षाचे पुनरुज्जीवन करून १९९९ ची सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यानंतर २००२ मध्ये त्या पक्षाच्या नावात बदल करून २००४ ची सार्वत्रिक निवडणूक लढवली. २००९ च्या निवडणुकीतील अपयशानंतर त्यांची राजकीय कारकिर्द झाकोळलेली राहिली. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या बाली बेटावरील फेर्या खूप प्रमाणात वाढल्या होत्या. त्यांचा परवाचा ‘स्वगृही’ परतण्याचा कार्यक्रमही बालीतील 'Soekamo Centre' या संस्थेच्या प्रांगणात स्थानिक राजकीय नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडला. या दोहोंची संगती लावून इंडोनेशियामध्ये काहींनी सदर प्रकाराची, सुकमावतींचा स्वत:चे बालीमध्ये राजकीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न अशी संभावना केली आहे. त्यात अजिबातच तथ्य नाही, असे जरी म्हणता येत नसले तरी त्या गोष्टीचे वजन सुकमावतींच्या सदर निर्णयाच्या सांस्कृतिक आयामाच्या आणि त्याच्या इंडोनेशियन समाजात पडू शकणार्या मूलगामी पडसादांच्या तुलनेत कमीच भरेल.
एकंदर पाहता, स्थानिक किरकोळ राजकीय समीकरणांना आणि तत्संबंधी चर्चांना वजा करून सुकमावतींचा सदर निर्णय आणि त्याबरहुकूम झालेली त्यांची कृती हे एक नि:संशय धाडसी, अर्थवाही पाऊल आहे, ज्यात भारत-इंडोनेशिया परस्पर संबंधांमध्ये दूरगामी परिणाम घडवू शकण्याच्या क्षमतेचे बीज आहे आणि म्हणूनच ते भारताच्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह आहे.
- पुलिंद सामंत