तैवान आणि सैरभैर चीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Oct-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
 
चीनने नेहमीच तैवानवर अवैधपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आताही चीनची सैनिकी विमानं तैवानच्या हद्दीत अनधिकृतपणे येतात. चीनने हल्ला केलाच, तर अमेरिकेच्या मदतीने आणि इतर मित्रराष्ट्रांच्या मदतीने आम्ही चीनसोबत युद्ध करू, असे तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांनी म्हटले आहे. तसेही सध्या मोठ्या संख्येने अमेरिकन सैन्य तैवानमध्ये उपस्थित आहेच. हे अमेरिकन सैनिक तैवानच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आले आहे, असेही वेन म्हणाल्या. मात्र, या प्रशिक्षणामुळे चीनचा अगदी तिळपापड झाला आहे. कारण, चीनचे म्हणणे आहे की, तैवान हे मुळी स्वतंत्र राष्ट्र नाहीच, तर तो एक चीनचा भूभाग आहे.
 
 
जागतिक पटलावर चीन शक्तिशाली झाला आणि संयुक्त राष्ट्र संघाचे त्याला सदस्यत्व मिळाले. तेव्हा चीनने जाहीर केले की, तैवान हा चीनचाच भूभाग आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तैवानला कोणताही स्वतंत्र दर्जा देऊ नये. त्यामुळे यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्येही आपण पाहिले होते की, तैवानच्या खेळाडूंनी पदक जिंकले. मात्र, त्यांच्या सन्मानार्थ चीनचे राष्ट्रगीत वाजले आणि चीनचा ध्वजसन्मान झाला. या सगळ्या घटना लिहिण्याचे कारण की, १९७१ साली चीनने संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्यत्व मिळवले तेव्हा चीन आणि अमेरिकेचे व्यापार आणि आर्थिक स्तरावर संबंध चांगले होते. प्रचंड लोकसंख्या असलेली चिनी बाजारपेठ आपल्याला आयती मिळते म्हणून अमेरिका त्यावेळी नव्याने शक्तिशाली झालेल्या चीनचा मित्र म्हणूनच वावरत होता. पण, त्यावेळीही अमेरिका जगभरात दादाच्या भूमिकेत होताच म्हणा! या काळात चीनने तैवानचा हक्क नाकारला म्हणून अमेरिकेने आणि इतर कुणाही राष्ट्राने हू का चू केले नाही. तैवान अक्षरशः एकटे पडले. पण, जगाने साथ दिली नाही म्हणून तैवानने हार मानली नाही.
 
 
स्वतंत्र राष्ट्र आहोत आणि राहणारच, हा बाणा तैवानने कायम ठेवला. राक्षसी ड्रॅगनसारख्या चीनसमोर चिमुकला तैवान कुठपर्यंत भारी भरणार? त्यातच तैवानमध्ये चीनमधील ‘होक्को’वंशीय लोक बहुसंख्य. चिनीवंशीय लोक तैवानमध्ये बहुसंख्य असल्याने या देशाला स्वतंत्र बाण्यासाठी आंतरिक शक्ती मिळणारच नाही, हे बहुसंख्य चिनीवंशीय चीनलाच समर्थन करतील, असा चीनचा विश्वास होता. पण, तसे काही झाले नाही. हे बहुसंख्य चिनीवंशीयही चीनविरोधात स्वतंत्र तैवानची भाषा बोलू लागले. चिनी आक्रमकतेला विरोध करू लागले. त्यामुळे चीनचा मानसिक पराभवच झाला.
 
 
तसेही तैवानचा इतिहास पहिला तर तैवानला इ. स. पूर्व ३००० वर्षांपूर्वीची एक स्वतंत्र संस्कृती आणि इतिहास आहे. १६व्या शतकाच्या मध्यावर स्पेनने तैवानच्या काही भूभागावर विजय मिळवला. मात्र, डचांनी हमला करून तिथे सत्ता हस्तगत केली. पुढे चीनचे तैवानवर शासन आले. प्रथम विश्वयुद्धात चीनला जपानने पराभूत केल्यानंतर चीनने तैवान जपानला दिले. पुढे दुसऱ्या महायुद्धात जपान चीनकडून हरला. मग जपानने तैवान चीनला परत दिले. मात्र, या सगळ्या देवाणघेवाणीत तैवानचे अंतर्गत तैवानराष्ट्रप्रेम अबाधित होते. पुढे १९४९ मध्ये चीनवर माओत्सो तुंगने सत्ता काबीज केली. त्याला घाबरून तिथला विरोधी पक्ष आणि लोक तैवानमध्ये घुसली. त्यावेळी तैवानने विरोध केला.
 
तैवानच्या सोबत अमेरिका आली. मग अमेरिकेने तैवानसोबत सुरक्षिततेसंदर्भात नियमावलीही केली. स्वतंत्र तैवानसाठी तैवानी जनता रस्त्यावर उतरली. जनतेने वर्षोनुवर्षै संघटित लढा दिला. चीनने लादलेल्या निवडणुकीमध्ये २००० साली स्वतंत्र तैवान समर्थकांचा विजय झाला. निवडणुकीच्या माध्यमातून स्वतंत्र तैवान समर्थक सत्तेत आले. त्यानंतर तर तैवानमध्ये राष्ट्रभक्तीचा जोश कायमच राहिला. चीनसारख्या अतिक्रमणवादी महाकाय देशाला प्रत्येक स्तरावर प्रतिबंधित करण्यासाठी तैवान सिद्ध झाला. त्यातही तैवानच्या राष्ट्रपती वेन यांनी तर चीनविरोधात आघाडीच उघडली. एका देशात दोन राज्यपद्धती चालणारच नाही, असे चीनला सुनावले, तर चीनने म्हटले की, “चीनबद्दलचा हा फुटीरतावाद चीन खपवून घेणार नाही. तैवानचे चीनमध्ये एकत्रीकरण झालेलेच आहे. तैवान स्वतंत्र नाही तर चीनचा हिस्सा आहे.” या सगळ्या परिक्षेपात सध्या अमेरिकेने स्वतंत्र तैवानला खुले समर्थन दिले आहे. यामध्ये आशिया खंडात चीनची शक्ती थोपविण्याचा अमेरिकेचा मनसुबा आहे. काही का असेना, त्यामुळे चीन सैरभैर झाला आहे, हे नक्कीच!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@