चाय बागानिया अर्थात सदनी समाज

    30-Oct-2021
Total Views |

aasam tea_1  H

मागच्या लेखात कबूल केल्याप्रमाणे आजची गोष्ट आसामची. गेली दोन-पावणेदोनशे वर्षे आसाममध्ये राहूनही परक्या समजल्या जाणार्‍या ‘चायबागान जनजातीची.’ त्यांचा इतिहास, सद्य:परिस्थिती याविषयी थोडे जाणून घेण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगते.
आसामच्या ‘सदानी’ जनजातीत महिलांबरोबर बैठक ठरली होती. झाडून सगळ्या चहामळ्यांमध्ये अंगमेहनत करणार्‍या! बर्‍याच विषयांवर बोलणं झालं. त्यांचे प्रश्न, अडचणी काय, असे विचारल्यावर म्हणाल्या, “चहामळ्यांमध्ये कधीतरी बिबट्या शिरतो, हल्ले करतो. माकडांचाही त्रास होतो. ते आमचे डबे पळवून नेतात.” अशा अडचणींचा मी आयुष्यात कधी विचार केला नव्हता. मग दारुचा विषय निघाला. तेथील प्रमुख ‘एकल विद्यालयाची’ शिक्षिका आहे. ‘विश्व हिंदू परिषदे’तर्फे शेकडो एकल विद्यालये चालवली जातात. ती म्हणाली, “संघटनेच्या या कामाचे सर्वस्पर्शी, दूरगामी परिणाम आहेत. तंटामुक्त, दारुमुक्त अशी अनेक गावे, कुटुंबे दिसू लागली आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी असे बदल होतील, असे स्वप्नातही आले नव्हते.” मग विषय निघाला स्त्रीआरोग्य, बाळंतपण, मासिक पाळीचा! सामान्य शारीरिक स्वच्छतेविषयी बर्‍यापैकी जागरूकता जाणवली. घरेही नीटनेटकी, टापटीप वाटली. अर्थात, मी मोठ्या शहराजवळच्या वस्तीत गेले होते.(२५-३० किमींवर) पण ‘डिलिव्हरी’साठी डॉक्टरकडे जातो, असे म्हणाल्या. ‘रिमोट एरिया’त अजूनही सुईणीच बाळंतपणे करतात, असेही त्यांनीच सांगितले. पाळीचा विषय निघाल्यावर सगळ्या चुरुचुरु बोलायला लागल्या. आम्ही सगळे नियम किती कडक पाळतो, घरच्यांनी जेवण दिले नाही, तर जेवतही नाही, पण किचनमध्ये जात नाही, असे सांगू लागल्या.





त्यांना म्हटले, “तुमच्या धार्मिक भावनांविषयी मला आदर आहे. पण जेव्हा स्त्रीला पोषक आहाराची, मायेच्या शब्दांची, प्रेमळ स्पर्शाची सर्वात जास्त गरज असते तेव्हा जर आपण स्वतःला आणि आपल्या मायलेकींना यापासून वंचित ठेवले, तर ते खरंच योग्य असेल का? काल्पनिक भीती, अशास्त्रीय कल्पना मनात धरून, नव्या पिढीच्या शाळा, खेळ, अभ्यास या प्रगतीत यामुळे अडचणी निर्माण होत नाहीत का?”




मग मी माझा एक अनुभव सांगितला. तो असा - “माझ्या नात्यात एका आज्जीने जेव्हा माझ्या या गोष्टी अस्वीकार करण्यावर कुरकूर केली, तेव्हा मी तिच्या गळ्यात पडून तिला समजावलं होतं की, समाज, राहणीमान, महिलांचा पोषाख या गोष्टी फार वेगाने बदलत आहेत. केवळ ‘पॅड्स’च नाही, तर मुली-महिला हल्ली ‘टॅन्पोन्स’, ‘व्ही-कप’ही सर्रास वापरू लागल्या आहेत. स्वच्छतेच्या जुन्या कल्पना आता वापरता येण्यासारख्या नाहीत. धार्मिक विषयांत जे पूर्वापार चालत आले ते आम्ही स्वीकारु. पण आमचे सामान्य आयुष्य आम्ही आमच्या पद्धतीने जगणार आहोत. तिला पाळीच्या चक्राची थोडी शास्त्रीय माहिती पण सांगितली. मग माझा गालगुच्चा ओढत आज्जी म्हणाली, “बरं गं बायो!” माझी गोष्ट सांगता सांगता या निमित्ताने शास्त्रीय माहितीही सांगून झाली. माझं हे सगळं बोलणं ऐकल्यावर आमच्या ‘सदानी’ तायाही जरा गप्प झाल्या. मग एक हलकेच म्हणाली, “असा विचार अजून केला नव्हता, पण आम्ही नक्की विचार करू.”



मग फोटोबिटो काढले, मुलांना गोष्टी सांगितल्या आणि परतलो.




आपण जो चहा पितो, तो पिकवणार्‍या मळ्यांमध्ये काम करणारे हे लोक. या चहाच्या मळ्यांनी आणि या लोकांनी सार्‍या पूर्वोत्तरभारताला कायमस्वरूपी उत्पन्नाचा एक प्रचंड मोठा स्रोत निर्माण करून दिला आहे. आज ईशान्य भारतातील सर्वाधिक उत्पन्न प्राप्ती चहा उद्योगातूनच होते. ‘कुली’, ‘बंगाली’, ‘बगानिया’, ‘साउताल’, ‘संथाल’, ‘झारखंडी’, ‘उडिया’, ‘आदिवासी’ अशा वेगवेगळ्या नावांनी या समाजाला ओळखले जाते. परंतु, भारतभरातील परंपरा लक्षात घेऊन आपण त्यांच्या ’भाषेवरून’ त्यांची ’सदानी समाज’ अशी सन्माननीय ओळख करून घेऊ.




इतिहास



दोन-अडीचशे वर्षांपूर्वी, तिबेटचा चहा लोकांना आवडू लागला तशी, व्यापारी वृत्तीच्या इंग्रजांची नजर चहासाठी योग्य जमीन शोधू लागली. तशी जमीन आसाममध्ये आहे हे लक्षात येताच तिबेटी मजूर शोधून त्यांनी तिथे चहाबागांची लागवड सुरू केली. पण येथील ‘अ-सम’ आणि दलदल जंगलयुक्त जमिनीला, ‘मलेरिया’, ‘सिकलसेल’, ‘टीबी’सारख्या भयंकर रोगांना भिऊन, तिबेटी मजूर पळून गेले. नंतर ब्रिटिशांनी त्यावेळचा बर्मा म्हणजे आजचा म्यानमार येथून मेहनती मजूर बोलावले. त्यांचाही येथे टिकाव लागला नाही. त्याच सुमारास भारतातून त्रिनिदाद-टोबॅगो, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, फिजी वगैरे देशात मोठ्या प्रमाणावर मजुरांना कुली म्हणून फसवून नेले जात होते. तेथे मात्र त्यांना गुलामाप्रमाणे वागविले जायचे. आसामातही ब्रिटिशांनी हाच प्रयोग करायचे ठरविले आणि त्यानुसार भिन्न भिन्न प्रांतांतून गरीब लोकांना फसवून, धाकदपटशा दाखवून अथवा प्रलोभने देऊन मोठ्या संख्येत येथे आणले गेले.




याची सुरुवात इ. स. १८४०  ते १८५०  या दशकात झाली. आधीच्या अनुभवातून शहाणे होऊन हे कुली पळून जाऊ नयेत, याची व्यवस्था केली गेली. रस्त्यात लागणार्‍या नद्यांच्या घाटांवर ‘चेकपोस्ट’ लावल्या गेल्या. कोणी पळून जाताना पकडला गेला तर सर्वांसमोर कठोर शिक्षा दिली जाऊ लागली. दोन वेगवेगळ्या राज्यांतील स्त्री-पुरुषांना एकत्र राहणे बंधनकारक केले. आसामातील स्थानिक समाजाबरोबर हे लोक समरस झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते, हे ध्यानात ठेवून या मजुरांना प्रयत्नपूर्वक इतरांपासून दूर ठेवले गेले. हे चटकन ओळखू यावेत म्हणून यांच्यावर गुडघ्याखाली काही वस्त्र घालण्यास आणि पायात पादत्राणे घालण्यास बंदी घातली. (आजदेखील इथल्या काही वस्त्यात असे मजूर बघायला मिळतात.)
एवढे उपाय करूनही मजुरांचे पलायन थांबत नव्हते. दिवसभर काम करून संध्याकाळी उपलब्ध असलेले भोजन पटकन आटोपून पडत असलेल्या अंधाराचा फायदा घेत नेफा (आजचा अरुणाचल), भूतान, सिक्कीममार्गे पळण्याचे तुरळक प्रयोग चालूच होते. हे प्रकार वाढल्यास पलायनाचा नवीन मार्ग तयार होईल, हे लक्षात घेऊन मालकांनी आपले शेवटचे अस्त्र वापरले. दिवसभर कठोर मेहनत करून परतलेल्या मजुरांसाठी भोजन तयार नसायचे. उपलब्ध असायची भरपूर दारू. थकल्या भागल्या जीवांना मग त्याचाच आधार वाटायचा. नशा चढल्यावर कसेबसे चार घास खाऊन मंडळी आडवी व्हायची. आता पळायची कोणाला शुद्ध! हळूहळू दारूचे व्यसन पद्धतशीररित्या भिनवले गेले. त्यासाठी फूट पाडून काही लोकांना लालूच दाखवून हाताशी धरले. दारूशी संबंधित प्रथा प्रचलित केल्या गेल्या. त्या व्यवसायात काहींना गुंतवले. आता मात्र मालकांना हवा तसा गुलाम समाज तयार झाला.






विविधभाषी मजूर आपसात मिसळून गेले. एक बोलचालीची भाषा तयार झाली. हीच ती ‘सदानी भाषा.’ यात अनेक भाषांचे शब्द मिसळलेत. मराठीतील सर्वमान्य आहे हा शब्द इथे त्याच अर्थाने वापरला जातो. (‘तियान बेसी जहाल आहे’ म्हणजे ‘भाजी जास्त तिखट आहे’). अगदी ‘चावला’, ‘पोळला’सारखे शब्द आम्ही ‘चाबला’, ‘पोडला’ म्हणून वापरतो. आंब्याला आंबाच म्हणतो, आम नाही. चहाला चहाच म्हणतो, चाय नाही.या समाजात अनेक आडनावं आहेत. सध्या आसाम सरकारने मान्यता दिलेल्या आडनावांत मुंडा-उरांग-खडीया-साहू-शाह-कलांदी-तांती-कर्मकार-नायक-खैरवार-मोदी-तेलंगा-बावरी-सिंग-बडाईक-कुर्मी वगैरे ९२ नावे आहेत. यावरून अंदाज लावल्यास या समाजातील लोक तेलंगण, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, बिहार व बंगाल या राज्यांमधून आले असावेत, असे वाटते. आता आसाम हेच या समाजाचे मूळ स्थान आणि सदानी ही भाषा. करमपूजा-बिहु-होळी-दिवाळी-कालिपूजा-शिवरात्री-रामनवमी-राखीबंधन वगैरे सण साजरे करणारी स्वाभाविकपणे आलेली भारतीय संस्कृती हीच या समाजाची मुख्य संस्कृती आहे.




बाहेरच्या समाजापासून यांना पूर्णपणे अलग ठेवण्यासाठी त्यांचे घड्याळसुद्धा निराळे, एक तास पुढे ठेवले गेले. ज्यावेळी अन्यत्र सकाळचे ५ वाजत तेव्हा चायबगानमध्ये ६ वाजल्याचा ‘सायरन’ होई. सकाळी ७ वाजता म्हणजे आमच्या वेळेनुसार ८ वाजता कामावर हजर व्हावे लागे. येथील लवकर होणार्‍या सूर्यास्तामुळे दुपारी ३ वाजता म्हणजे आमच्या ४  वाजता सुट्टी होत असे. अजूनही अनेक चहाच्या मळ्यात आमचे बांधव याच वेळा समजतात. चहा मळ्यांचे एक वेगळेच जीवन, एक वेगळीच दुनिया असते. बाहेरच्या लांब विजारी (फुलपॅण्ट) वा पायघोळ धोतर नेसलेल्या लोकांशी संपर्क आलाच, तर भीतीने या लोकांच्या तोंडून शब्द फुटत नसे.


 
 
दबलेला, मनाने खचलेला समाज आपला आत्मविश्वास, आपली विचारशक्ती गमावून बसतो. असा समाज स्वतःला दुबळा व इतरांना शक्तिशाली मानू लागतो. दैवावर विसंबून परिस्थितीशी तडजोड करतो आणि त्या परिस्थितीच्या समर्थनार्थ पळवाटा शोधू लागतो. भारतीय समाजातसुद्धा एकेकाळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मुघल राज्यात हिंदवी स्वराज्याची कल्पना करून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी जिजामाता आणि शिवराय जन्माला यावे लागले.




आजची स्थिती



स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश मालकांनी काही जमिनी निष्ठावान गुलामांच्या नावे करून दिल्या. परंतु, या नेतृत्वहीन सदानी समाजाकडे बघायला कोणाला फुरसत मिळणार? यांची चहा मळ्यातली कामे संपली होती. सुधारणांशी संपर्क नसल्याने या समाजात फक्त दोनच गोष्ट झपाट्याने वाढत होत्या, त्या म्हणजे लोकसंख्या आणि रोगराई. आता या लोकांबद्दल आकर्षण वाटावे/प्रेम वाटावे, असे काहीच उरले नव्हते. उपलब्ध होता तो मोठ्या संख्येतील गुलाम समाज, ज्यातील काही जण नावापुरते जमीनदार होते. बाह्य समाजातील लोकांच्या नजरेपुढे दिसू लागल्या, त्या केवळ या जमिनी आणि सहजपणे उपलब्ध होऊ शकणारा प्रचंड मोठा मजूर समाज. साहजिकच हा समाज केवळ मोठ्या प्रमाणात एका शोषकाकडून दुसर्‍याकडे हस्तांतरित झाला.





आज पूर्वोत्तर भारतात ‘सदानी’ समाज लोकसंख्येत दुसर्‍या क्रमांकावर आहे. अरुणाचल, नागालँड, मिझोरामसारख्या राज्यांच्या लोकसंख्येच्या काही पट यांची लोकसंख्या आहे. पण हा समाज अर्ध-मानवी जीवन जगतो आहे. विविध कारणांमुळे अकालमृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे. सर्वसाधारण आयुष्यमानही ५० वर्षांच्या आसपास असावे. चार-सहा महिन्यांपूर्वी आसामात शिरलेल्या बांगलादेशीला स्वीकारणार्‍या समाजात ’सदनीं’ना पावणेदोनशे वर्षांनंतरही बाहेरचे म्हणणार्‍यांची संख्या भरपूर आहे. या समाजात सुशिक्षितता, गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षणाची प्रचंड वानवा आहे. साक्षरतेचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळेच या समाजावर होणार्‍या अन्याय अत्याचारांचे वर्णन अंगावर काटा उभा करणारे आहे. ‘व्होट बँक’ असल्याने राजकीय आणि मजदूर नेतृत्व यांच्यातील व्यसनाधीनतेचा फायदा घेत थोड्याशा भिकेवर यांना झुलवीत राहिले आहेत. त्यातल्या त्यात सांगण्यासारखी सुखद बातमी म्हणजे गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने यांचे न दिल्या गेलेल्या मजुरीचे पैसे त्यांना देऊ केले. त्यांच्या मजुरीची न्यूनतम रक्कमही आता वाढवली आहे. या भागांत रस्ते बांधणी, शाळा, आरोग्यकेंद्रांचे निर्माण अशी कामेही मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत.





आता आधुनिक उपकरणांमुळे बरीचशी माहिती येथील युवकांना मिळू लागली आहे. विदेशात गेलेले ’कुली’ जर स्थानीय समाजाबरोबर पुढे येऊ शकतात, तर आम्ही का नाही? असा प्रश्न त्यांना पडतोय. आपल्या एवढ्या मोठ्या संख्येतील समाजासाठी ‘चांगले शिक्षण देणारी नवोदय विद्यालया सारखी एक तरी संस्था’ असावी, सार्‍या आसामातून निवड करून त्यात विद्यार्थ्यांना त्यात प्रवेश मिळावा, त्यातून आपल्या समाजाचे योग्य मार्गदर्शन करणारे नेतृत्व उभे राहावे, आपल्या संख्याबळाच्या आधारावर पूर्वोत्तर भारतातील विविध समस्यांना उत्तर देता यावे, या क्षेत्राच्या विकासात आपणही अन्य समाजांच्या बरोबर खांद्याला खांदा भिडवून सहभागी व्हावे, अशा आकांक्षा नवीन पिढीतील युवकांच्या मनांत जागृत होत आहेत.

- अमिता आपटे