
मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शनिवारी २ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईत एका क्रुझ शिपवर छापेमारी केली. या क्रूझवर रेव्हपार्टी सुरू होती. यात तीन महिलांसह एकूण १३ जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अटक झालेल्यांपैकी एक जण बॉलीवुड सुपरस्टार किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही आहे. एनसीबीने त्यालाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे.
बॉलीवुडचा बादशाह मानला जाणारा शाहरुख खान सध्या दिल्लीत पठाणच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पठाण हा सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असून त्यात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या सिनेतारकांचाही सामावेश आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट शाहरुखचे फॅन आतुरतेने पाहत आहेत. विशेष म्हणजे आर्यना खानही या सिनेमात विशेष लक्ष देत आहे.
या सिनेमाच्या अॅक्शन सिक्वेंससाठी आपले इनपुट्स देत आहे. पठाण हा सिनेमा नवतरुणांमध्ये प्रसिद्ध व्हावा, अशी खुद्ध शाहरुख खानची इच्छा आहे. त्यासाठी आर्यन खानची मदत घेतली जात आहे. आर्यन खान हा हॉलीवुड सिनेमा आणि पॉप म्युझिकचा चाहता आहे. त्याच्याकडून पठाण या सिनेमासाठी मदत घेतली जात आहे. शाहरुख खान कित्येकदा सांगत असतो की त्याचा मुलगा आर्यन हा अभिनयाऐवजी फिल्ममेकींगमध्ये जास्त रस घेतो. कॅमेऱ्याच्या मागून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यावर त्याचा भर असतो, असेही खान म्हणाला होता. वडिलांसारखं 'लाईमलाईट'मध्ये राहायला त्याला बिलकूल आवडत नाही.
आर्यन खानला इतर स्टारकिड्स प्रमाणे स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवणे आवडत नाही. मीडियाला प्रतिक्रीया देण्याच्या गोष्टी तो टाळतो. २०१९मध्ये आलेल्या ‘द लायन किंग’च्या हिंदी भाषांतराला आर्यनने सिंबाचा आवाज दिला आहे. मुफासाला शाहरुखने हिंदीत डब केला होता.
आर्यनचा जन्म १३ नोव्हेंबर १९९७ रोजी दिल्लीत झाला होता. त्याला प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत असले तरीही शाहरुखचा मुलगा असल्याने तो वारंवार चर्चेत येत असतो. करण जौहरच्या 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील शाहरुखच्या बालपणाचे पात्र त्यानेच साकारले होते. आर्यनने शाहरुख खान, रानी मुखर्जी, अभिषेक बच्चन यांच्या 'कभी अलविदा ना कहना' या सिनेमातही काम केले आहे. मात्र, त्याचा हा सीन एडीट करण्यात आला होता.

आर्यनचे शिक्षण लंडनच्या सेवेन ओक्स येथे झाले आहे.त्यानंतर साऊदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातून फिल्ममेकींग आणि पटकथा लेखनाचे शिक्षण घेतले आहे. आर्यनचे नाव अमिताभच्या नात नव्या नवेदी नंदा हिच्याशीही जोडले जात होते. मात्र, या अफवा असल्याचे म्हणत दोघेही चांगले मित्र असल्याचा खुलासा करण्यात आला होता.