समस्यामुक्तीसाठी काम करणारे गिरीश लटके

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2021   
Total Views |

manse_1  H x W:

राजकारण, समाजकारण, साहित्य, काव्य अशा कोणत्याही क्षेत्रातील समस्या असो त्या सोडविण्यासाठी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे गिरीश लटके. त्यांच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेऊया.
गिरीश लटके यांचा जन्म मनमाड येथे झाला. ते चार-पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांची ओडिशाजवळील एका गावात बदली झाली होती. त्यामुळे त्यांचे बालपण फिरतेच राहिले. जबलपूरला ते राहत होते. १९६७ ला त्यांच्या वडिलांचे निधन झाले. मग त्यांना महाराष्ट्रात त्यांच्या काकाने बोलवून घेतले. वडिलांचे निधन झाले, तेव्हा ते गेले आहेत हेदेखील त्यांना समजत नव्हते. काकांकडे काही वर्षं राहिल्यावर त्यांनी कल्याण पश्चिमेला घर घेतले आणि स्वतंत्रपणे राहू लागले. तोपर्यंत विविध प्रकारची कामे करून दिवस ढकलत होते. ते जबलपूरला नूतन मराठी विद्यालयात शिकत होते. त्या ठिकाणी हिंदी माध्यम होते. त्यामुळे हिंदी पुस्तके मराठीत भाषांतर करून विद्यार्थ्यांना शिकवत होते. शिक्षण चांगले होते. कल्याणमध्ये आल्यावर न्यू हायस्कूल कल्याण या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले. बिर्ला महाविद्यालय आणि मेडिकल महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. वस्तीच्या समस्या जाणून घेऊन त्या मांडणे एक वेगळा भाग आहे. पाकिस्तानच्या फाळणीनंतर विस्थापित झालेले सिंधी लोक उल्हासनगरमध्ये येऊन वसले. महायुद्धाच्या काळात सैनिक मुंबईच्या जवळ असावे म्हणून बराक्स तयार केले. त्या काळात फाळणी झाल्यावर या निर्वासितांना उल्हासनगरला वसविले. १९४७ नंतर केमिकल झोन कुठे असावा, हा प्रश्न होता. पण खाडी या ठिकाणी असल्याने घाणरडे पाणी त्यात सोडता येत होते. ते पाणी समुद्राला मिळत होते. महाराष्ट्रात इतर ठिकाणी आऊटलेट नव्हते. त्यामुळे केमिकल झोन तिकडे उभे करता येत नव्हते. ठाणे जिल्ह्यात केमिकल फॅक्टरी जास्त आल्या. इंजिनिअरिंग, केमिकल, फार्मास्युटिकल फॅक्टरी सगळ्याचा या ठिकाणी संच तयार झाला. यासाठी लागणारा कामगार येऊ लागला. वसाहत निर्माण होऊ लागली. जिकडे जागा मिळते, तिकडे ते राहू लागले. आता ते राहायला येथे आल्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या झाल्या. शिक्षणासारख्या समस्या निर्माण झाल्या. नागरीकरण वेगाने सुरू झाले. त्यांचे दुष्परिणाम राजकीय क्षेत्रात दिसून येऊ लागले. राजकीय, ऐतिहासिक विषय वेगवेगळे आहेत. नागरिक हळूहळू समस्यांकडे लक्ष देऊ लागले. भावना विकसित होत गेल्या. त्यानंतर आम्ही काही मुले दत्तक घेऊन त्यांना वाढविले. पालकत्वाची भावना तयार झाली. त्यातून अनेक चांगल्या घटना घडल्या. ‘मानव साहाय्यक सेवा’ या संस्थेची ४० वर्षांपूर्वी स्थापना केली. त्यातून अनेक उपक्रम केले. गिरीश आणि किशोर खराडे या दोघांनी मिळून संस्था काढली.

ते १९६८ पासून सामाजिक काम न थांबता करीत आहेत. कोरोनाकाळात त्यांनी अनेक आंदोलन केली. कोरोनाकाळात डॉक्टर रुग्णांना अवाढव्य बिले लावत होते. कोरोना काळात डॉक्टरांना सुवर्ण संधी लाभली होती. एखादा माणूस आजारी पडल्यावर त्यांना दोन ते तीन लाख रुपये उपचारासाठी लागत होते. कोरोनाकाळात आम्ही जनजागृती केली. त्यामुळे महापालिकेला सर्व नियम लागू करावे लागले. त्यासाठी एक समिती बसविण्यात आली. गिरीश हे समाजात ज्या घटना आणि प्रतिक्रिया घडतात, त्याबाबत जनजागृती करणे आणि त्या रोखण्यासाठी प्रयत्न करीत असतात. उदा. दंगल झाली की, शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. दरोडा पडला तर बैठकी घेणे व त्यातील निर्णय पुढे घेऊन जाणे ही कामे करीत असत. शहर स्वच्छतेसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली. हा सगळा औद्योगिक पट्टा असल्याने या ठिकाणच्या कामगारांच्या संघटना बनविणे, त्यातून काम करणे सुरू होते. भांडवलदारांशी संघर्ष करण्याची आमची मानसिकता नव्हती. आम्ही जागरूकतेसाठी बाहेर पडल्यावर ती सर्वांना आवडत होती. ‘औद्योगिक अशांतता आणि त्यांचे दुष्परिणाम’ या विषयावर पुस्तक तयार करून त्यांचा प्रचार केला. आरोग्यासंदर्भातील भूमिका, औद्योगिकीकरणातील भूमिका या संदर्भात काम केले आणि शहरात जातीयवाद असल्याने त्यांसाठी ‘सर्वधर्म सलोखा मंच’ नावाची संस्था स्थापन केली. सर्वधर्मीय एकत्र घेऊन चांगले घडावे, यासाठी प्रयत्न केले. त्या समाजातील लोकांनी मुलांना नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. हळूहळू राजकारण प्रभावी असल्याने सर्व त्यांनी आपल्या पंखाखाली घेतले. त्यामुळे संस्था निर्जीव झाली. कारण, राजकारणात शक्ती असते. राजकारण काहीही करू शकते, असे गिरीश सांगतात.

कल्याण शहरात ८० टक्के महाविद्यालये ही अन्य राज्यातील लोकांची आहेत. कंपनी बंद झाल्यानंतर एका कर्मचार्‍यांनी खिशात पैसे नसताना त्याने महाविद्यालय काढले. कल्याणात अनेक महाविद्यालये आहेत. पण, त्यांचे मॅनेजमेंट हे उत्तर भारतीयांचे आहे. मराठी माणूस फक्त पेन्शन कशी वाढेल, मुख्याध्यापक कसा होईन, एवढाच विचार करीत असतो. ४० -५० वर्षांपूर्वी काहीतरी जागा घेऊ, असा विचार करून महाविद्यालय काढले असते तर शिक्षण क्षेत्र आपल्या माणसांच्या ताब्यात राहिले असते. पण, आता शिक्षणक्षेत्राच्या जवळ जाऊन त्यांनी सर्व ब्रेन आपल्या ताब्यात घेऊन ठेवला आहे. ज्या वेळेस आपण रोजगार गेल्यावर समाजाला जागा मागितली. त्यावेळी जयंतीबाई हारिया यांच्या नावाने दोन एकर जागा दिली. त्या जयंतीबाईंच्या आई विधवा झाल्यावर एका छोट्या स्टुलावर धान्य विकण्यास सुरुवात केली. त्या कष्टकरी महिलेने जागा दिली. तेव्हा तिने जागा देताना महिलांना शिक्षण द्या, असे सांगितले. आचरेकर यांनी पाच एकर जागा केवळ एक शब्दावर दिली. “तुम्ही प्रामाणिक राहा. तुम्हाला लोक मदत करीत असतात. लोकांचा हा विश्वास इतक्या वर्षांत संपादन केला आहे. लोक जेव्हा आपल्याला लाखो रुपयांची जागा देत असतील तर आपली जबाबदारी वाढते,” असेही गिरीश सांगतात. या अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.


- जान्हवी मोर्ये






@@AUTHORINFO_V1@@