शीख विरोधी दंगलीच्या आरोपीची दिल्ली काॅंग्रेस कमिटीत नियुक्ती

    29-Oct-2021
Total Views |
congress _1  H



दिल्ली - १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी जगदीश टायटलर यांना प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये स्थायी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी टायटलर यांचा राज्य काँग्रेस कमिटीत समावेश केला आहे. टायटलरसह माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जेपी अग्रवाल, माजी राष्ट्रीय सरचिटणीस जनार्दन द्विवेदी आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, अजय माकन आणि कृष्णा तीरथ यांनाही स्थान देण्यात आले आहे.



१९८४ च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी टायटलरचे नाव पुढे आले होते. जगदीश टायटलरवर १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत लोकांना भडकवल्याचा आरोप आहे. आता भाजपचे आयटी सेल प्रभारी अमित मालवीय यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमित मालवीय यांनी ट्विट केले की, "सोनिया गांधींनी जगदीश टायटलर यांची दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ३७ कायम निमंत्रितांपैकी एक म्हणून नियुक्ती केली आहे. ज्यांच्यावर काँग्रेस प्रायोजित १९८४ च्या शीख नरसंहाराचा आरोप आहे. काँग्रेस पक्षाला शीखांच्या जीवाला काही फरक पडत नाही? पंजाब ऐकतोय का?"
 


भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी या कृतीवर काँग्रेसचा खरपूस समाचार घेत म्हटले की, “भारतीयांच्या, विशेषत: शीख आणि पंजाबी समुदायाच्या सदस्यांच्या भावना दुखावल्याबद्दल काँग्रेसला पुन्हा एकदा लाज वाटायला हवी. जगदीश टायटलरवर १९८४ च्या शीख दंगलीचा आरोप आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यात काँग्रेस अपयशी ठरली असून त्यांनी गुन्हेगारांना बक्षीस दिले आहे." गुरुवारी काॅंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्ली काँग्रेससाठी ३७ स्थायी निमंत्रितांची नियुक्ती केली. एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी नियुक्तीचे आदेश जारी केले. दिल्ली काँग्रेस कार्यकारिणीत आता ८७ सदस्य आहेत. जगदीश टायटलर हे शीखविरोधी दंगलीप्रकरणी आरोपांना सामोरे जाणारे दुसरे मोठे काँग्रेस नेते होते. त्याच्याशिवाय हा डाग सज्जन कुमारवरही होता. या दंगलीतील सहभागाबद्दल सज्जन कुमारला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो सध्या तुरुंगात आहे.