मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सविरोधात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या याचिकेत देशमुख यांनी त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने बजावलेले समन्स आणि या प्रकरणातील संपूर्ण कार्यवाही रद्द करण्याची विनंती केली होती.
ईडीवर आरोप१३ ऑक्टोबर रोजी अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले होते की, कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आपल्याविरुद्ध सुरू केलेली कारवाई हत्या आणि खंडणीसारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींच्या दाव्यावर आधारित आहे. अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास अपयशी ठरलेल्या देशमुख यांनी आपल्या वकिलामार्फत न्यायालयाला सांगितले होते की, त्यांना तपास संस्थेसमोर हजर व्हायचे आहे. परंतु, एजन्सीने त्यांची प्रतिमा चौकशीसाठी सहकार्य न केल्याची प्रतिमा निर्माण केली आहे.
सीबीआयने यावर्षी २१ एप्रिल रोजी देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने देशमुख आणि इतरांविरुद्ध चौकशी सुरू केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाच्या आरोपांची प्राथमिक चौकशी (पीई) केल्यानंतर सीबीआयने एफआयआर नोंदवला होता. परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आरोप असून त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे.