भारताचेही ‘हायपरसोनिक मिसाईल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Oct-2021   
Total Views |

china_1  H x W:
पाकिस्तान व पाकिस्तानपेक्षाही चीनकडून निर्माण होणाऱ्या सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत संरक्षण-शस्त्रास्त्र क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत आहे. नुकताच अमेरिकेच्या ‘काँग्रेशनल रिसर्च सर्व्हिस’-‘सीआरएस’ने एक अहवाल जारी केला असून त्यानुसार भारत ‘हायपरसोनिक मिसाईल’ विकसित करणाऱ्या जगातील निवडक देशांत सामील झाला आहे. येत्या काळात भारत आपल्या शस्त्रास्त्र भांडारात ‘हायपरसोनिक मिसाईल्स’चा समावेश करण्यात यशस्वी झाला, तर ती वैश्विक स्तरावरील ऐतिहासिक उपलब्धी असेल. इतकेच नव्हे, तर भारताची ‘हायपरसोनिक मिसाईल्स’ चीनलाही बेचैन केल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच, अमेरिकेच्या तथाकथित महासत्तापदाच्या दाव्यातील हवाही निघू शकेल.
 
‘हायपरसोनिक मिसाईल्स’ म्हणजे आवाजाच्या, पाच, सहा, सात, आठ पट वा त्याहीपेक्षा अधिक वेगाने लक्ष्याचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे! ‘मॅक-८’ स्तरातील ‘हायपरसोनिक मिसाईल्स’ एका तासात ९ हजार, ८०० किमीपर्यंतचा प्रवास करू शकतात. ‘सीआरएस’च्या अहवालानुसार, ‘भारत रशियाच्या साथीने अतिवेगवान ‘हायपरसोनिक मिसाईल्स’ विकसित करत असून, त्याला ‘ब्राह्मोस-२’ असे नाव देण्यात आले आहे. तर ‘ब्राह्मोस-२’ सुरुवातीला २०१७ सालीच मैदानात उतरवण्याचे नियोजन होते. पण, त्याला महत्त्वपूर्ण कारणांमुळे विलंब झाला आणि आता २०२५ व २०२८ दरम्यान भारताच्या ‘हायपरसोनिक मिसाईल्स’चे संचालन निर्धारित करण्यात आले आहे, तर भारत कथितरीत्या स्वदेशी ‘हायपरसोनिक मिसाईल्स’देखील विकसित करत असून, ‘हायपरसोनिक टेक्नोलॉजी डिमॉन्स्ट्रेटर व्हेईकल प्रोग्राम’चा भाग म्हणून दुहेरी सक्षम ‘हायपरसोनिक मिसाईल’ आणि ‘मॅक-६ स्क्रॅमजेट’चे जून २०१९ साली यशस्वी परीक्षणही केल्याचेही म्हटले जाते.
 
नव्या ‘हायपरसोनिक’ शस्त्रांच्या विकसनातून भारत सर्वाधिक कपटी शेजारी चीनला नियंत्रणात ठेवू इच्छितो. कारण, समोर आलेल्या माहितीनुसार, चीन आपल्या मिसाईल कार्यक्रमाचा अधिक विस्तार करत आहे. ‘फायनान्शियल टाईम्स’ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, चीनने गुप्तरीत्या एका शक्तिशाली व नव्या पद्धतीच्या ‘हायपरसोनिक मिसाईल्स’चे परीक्षण केले होते. चीनच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ लॉन्च व्हेईकल टेक्नोलॉजी’ने जुलैमध्ये आपल्या ७७व्या आणि ऑगस्टमध्ये ७९व्या रॉकेट परीक्षणाची घोषणा केली होती. पण, ७८व्या रॉकेट परीक्षणाची फारशी माहिती दिली नव्हती, तर संरक्षण क्षेत्रातील विशेषज्ञांच्या मते, नवी पद्धती अवकाश शटलप्रमाणे असून, त्याच्या कार्गोमध्ये अण्वस्त्रे व लॅण्डिंग साहित्य भरले जाते. नव्या पद्धतीमध्ये ‘हायपरसोनिक मिसाईल’ काही काळासाठी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते आणि अवकाश यानाप्रमाणे पुन्हा पृथ्वीवर परतते.
 
दरम्यान, चीनने ‘हायपरसोनिक मिसाईल्स’च्या परीक्षणाचा इन्कार केला असून, त्याला ‘प्रायोगिक अवकाश यान’ म्हटले आहे, तर यंदाच्या जुलैमध्ये चीनने गोबी वाळवंटातील युमेन शहरात १००पेक्षा अधिक ‘इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिसाईल्स’-‘आयसीबीएम’चे परीक्षण केले होते. तसेच चीनकडे २५० ते ३००च्या आसपास अण्वस्त्रांचा साठा असून, नव्या ‘मिसाईल्स’ निर्मितीतून चीनच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या बड्या विस्ताराचा संकेत मिळतो, तर भारत-चीनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तणावाची स्थिती असून, त्या पार्श्वभूमीवर ‘हायपरसोनिक’ शस्त्रास्त्रांच्या विकासात कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरीकडे अमेरिका चीनच्या ‘हायपरसोनिक मिसाईल्स’मुळे चिंतेत आहे. कारण, अमेरिकेने ‘हायपरसोनिक मिसाईल्स’निर्मितीत फारशी प्रगती केलेली नाही. ‘हायपरसोनिक मिसाईल्स’च्या विकसनात अमेरिका चीनच्या तुलनेत मागे राहिल्याचे अमेरिकेच्या हिंदी-प्रशांत कमांडचे माजी कमांडर अ‍ॅडमिरल हॅरी हॅरिस यांनी २०१८ साली म्हटले होते, तर अमेरिकेने नुकतेच ‘हायपरसोनिक मिसाईल्स’चे केलेले एक परीक्षण अपयशी ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर अमेरिका चीनला वेसण घालण्यासाठी भारताच्या ‘हायपरसोनिक मिसाईल्स’ विकसनावर आक्षेप घेण्याची शक्यता नाही. तसेच यामुळे चीनची ‘हायपरसोनिक मिसाईल्स’ विकसनाची गती रोखता येईल.
 
@@AUTHORINFO_V1@@