मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : कोर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे आणि धक्कादायक आरोप केले जाऊ लागले आहेत. मात्र, या आरोप प्रत्यारोपांमुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी याप्रकरणी केलेल्या अनेक गौप्यस्फोटांनंतर आता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप नेते मोहित कंबोज यांनीही एक व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओलाला स्टिंग ऑपरेशन म्हटले आहे. वानखेडेंवर पैसे मागितल्याचे आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलने किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, किरण गोसावींनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळेच आता प्रभाकर साईल आरोप करत आहे, असे कुंभोज यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
या कथित स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ भाजप नेते मोहित कंबोज यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या व्हिडिओत किरण गोसावीकडून प्रभाकर साईलने पैशांची मागणी केली होती असे दिसून आले आहे.
प्रभाकर साईलचे वानखेडेंवर आरोप
वानखेडेंवर आरोप करताना साईलने म्हटले होते की, "पंच साक्षीदार म्हणून माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या होत्या. तसेच आर्यन खानला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी शाहरुखकडे २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. किरण गोसावी हा शाहरुखची मॅनेजर असलेल्या पूजा ददलानीच्या संपर्कात होता, असाही दावा प्रभाकर साईलने आरोप करताना म्हटले होते