मनसंघर्षाचे स्टेडियम

    26-Oct-2021
Total Views | 61

stadium_1  H x


तणावाचा भार किती आहे आणि त्याचे स्वरुप कसे आहे, याचा व्यवस्थित विचार करून शेवटी खेळाडू आपली एक ‘स्ट्रॅटेजी’ ठरवितात. अर्थात, त्या त्या प्रसंगी त्या खेळाडूची मानसिक अवस्था कशी आहे, यावर ती योजना अवलंबून असते.



तणाव प्रतिकार, तणाव नियोजन वा तणाव नियंत्रणाचे विविध निर्णय आणि वास्तविक आयुष्यात त्याचा प्रयोग करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ही समजावून घेताना ‘लॅझॅरस’ आणि ‘फोकमन’ यांनी समजावलेली तणाव नियंत्रणाची व्याख्या शास्त्रज्ञ आजही पसंत करतात. अगदी साध्यासुलभ भाषेत त्यांनी म्हटले आहे की, आयुष्यात जे आंतरिक आणि बाह्य घटक विवक्षितरित्या व्यक्तीकडे असलेले स्रोत निष्फळ करतात आणि ती परिस्थिती त्यांना जाचक व असह्य करतात, तेव्हा ती व्यक्ती सातत्याने त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी वैचारिक, भावनिक आणि वागणुकीत साजेसे बदल करते व विपरित परिस्थिती आपल्या काबूत ठेवण्याचा वा तिच्यावर मात करत पुढचे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते. त्याला ‘तणावाचे नियोजन’ म्हणता येईल. व्हाईट (2006) या शास्त्रज्ञाने तणाव नियंत्रण म्हणजे तणावाच्या विपरित असे परिस्थितीशी प्रतिकार करत जाण्याची प्रक्रिया असे म्हटले आहे. ती कधी एखाद्या महत्त्वाच्या त्या वेळेपुरता निर्णय असेल वा सातत्याने केलेला पाठपुरावा असेल, या विषयावर मानसशास्त्रज्ञांनी खूप रोचक आणि माहितीशीर संशोधन केले आहे. ते संशोधन धावपटू,क्रिकेटपटू, कुस्तीपटू, बुद्धिबळपटू, रग्बीचे खेळाडू, टेनिसपटू ते फुटबॉलपटू या विविध पल्ल्यातील खेळाडूंवर केले गेले आहे.




या सगळ्या संशोधनांनंतर असे दिसून आले आहे की, उच्च दर्जाचा खेळ देण्याचा ताण, खेळ प्रशिक्षण आणि स्पर्धा या भोवतालचे वातावरण आत्मविश्वासाचा अभाव, खेळामधील कार्यक्षमता कमी झाल्याने होणारी चिंता, दुखापतीची चिंता, प्रशिक्षकांचा स्वभाव आणि त्यांची शिकवण्याची पद्धत या सर्वसाधारण घटकांचा समावेश आहे. अर्थात, याहीपलीकडे जाऊन काही तणाव हे खेळाचे, त्या त्या देशातील वातावरण आणि तेथील लोकांची खेळाडूंशी वागणूक यावर अवलंबून आहे. शिवाय त्यात राजकीय संदर्भही आहेतच. भारत-पाकिस्तानमध्ये खेळले जाणारे क्रिकेट हे कधीच खिल्लाडू प्रवृत्तीचे नव्हते. खेळांमधील सगळ्यात टोकाची अहमहामिका आपण ‘इंडो-पाकिस्तान’ क्रिकेटमध्ये पाहतोच. यात चिंतेची बाब म्हणजे दोन्ही देशांत होणारा सामना तटस्थ पार्श्वभूमीवर व्हायला हवा असेल, तर खेळाडू आणि मुख्य म्हणजे त्यांचे चाहते यांच्या मनात या खेळातील ताणतणाव वास्तविक युद्धापेक्षा कसा कमी करायचा, ही चिंता धगधगत असते. कारण, हे दोघे सख्खे शेजारी एकमेकांना बघून घेत नाहीत. या दोघांमध्ये काश्मीरपासून आपल्या देशावर होणारा अतिरेकी हल्ला इथपर्यंत अनेक जळजळीत राजकीय गोष्टी पाठीशी आहेत. रसिक, दर्दी आणि खेळावर बिनशर्त प्रेम करणारेच खेळाचा उत्तम आस्वाद घेतात. समस्या असते, ती संकुचित वृत्तीने खेळाकडे पाहणार्‍या ‘ठार वेड्या’ कट्टर दर्शकांची! सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे भरपूर असे स्वभाववृत्तीचे दोस्त आहेत, ते एक वेगळेच कडू आणि हिंसक ‘टेन्शन’ देऊन जातात.





खरंच कौतुक वाटतं ते या खेळाला या कट्टरवादापासून कोसो मैल दूर नेत मैदानावर आपला खेळ जिद्दीने आणि खिलाडू प्रवृत्तीने खेळणार्‍या खेळाडूंचे! चातकासारखी या खेळाची वाट पाहणार्‍या रसिकमनांचे आणि तो खेळ संपन्न व्हावा म्हणून यथोचित पावले उचलणार्‍या राजकीय संकल्पांचे! आपल्याकडे यावर ‘क्या बात हैं’ हे शब्दच मनात दरवळतात.तथापि, या खेळात खर्‍या अर्थाने जी हिरीरी आणि निर्णायक आव्हानदडले आहे, ते तसेच कुठलीही आणीबाणी न येता खेळाच्या मैदानातच राहो, हीच प्रार्थना! अर्थात आपण सख्खे शेजारी सोडलो, तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशेससुद्धा या वादासाठी कित्येक दशकापासून सुप्रसिद्ध आहेत.ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडूंची आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ओंगळ पद्धतीने दबाव आणण्याची सहनशक्ती सीमेपलीकडे ताणली जाईल, अशा पद्धतीने दबाव आणायची सहनशक्ती सीमेपलीकडे ताणली जाईल, अशा पद्धतीने त्यांना ताण-तणावांना सामोरे जाणे, खेळांडूसाठी आव्हानात्मक आहे. ते ऐनवेळी चीडचिडे होतात, त्यांना असाहाय्य वाटतं. त्यांचे मनोधैर्य खचले जाते, हा असा अचानकअनपेक्षित तणावाचा सामना करण्यास खेळाडूंची प्रगल्भता महत्त्वाची ठरते. पुन्हा एकदा शांत, धीरगंभीर, स्थैर्याची मूर्तिमंत प्रतिमा असणारा राहुल द्रविड आठवतो. खडे ठेवून ‘दिमाग कूल-कूल’ ठेवणारा कॅप्टन कूल धोनी प्रेक्षकांना चक्क वेडा करून सोडायचा. उत्तम यष्टिरक्षण करणे आणि शिवाय टीमला थंड राहून मार्गदर्शन करणे, त्यांनासुद्धा मधूनमधून बर्फाचे थंड गोळे खायला घालणे, धोनीला कसे काय जमते बुवा, हा प्रश्न जगाला कायम पडायचा आणि त्याचे उत्तर धोनीच्या अंटार्क्टिकावरून आयात केलेल्या मेंदूत आहे. कूल कॅप्टन धोनी शुद्ध मराठीत म्हणायचे, तर तो क्रिकेटचा ‘बर्फाचा गोळा’ आहे. खेळाच्या क्षेत्रात तणाव अनेक आहेत आणि त्याच्या नियोजनाच्या व नियंत्रणाच्या तशा पद्धती अनेक आहेत. त्याविषयी पुढील भागात...
(क्रमश:)


- डॉ. शुभांगी पारकर



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121