ठाणे : ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि सत्ताधारी शिवसेना ठाणेकरांची फसवणुक करीत असल्याचा आरोप करून मंगळवारी मनसेने ठाणे महापालिकेसमोर उग्र निदर्शने केली. ठाणे जिल्हा मनसेप्रमुख अविनाश जाधव यांनी याविषयी बोलताना, सत्ताधारी व प्रशासनाने खड्डे प्रकरणी अभियंत्याच्या निलंबन कारवाईत घुमजाव केले. तर यापुर्वी २०१२ आणि २०१७ च्या प्रत्येक पालिका निवडणुकीत दिलेल्या वचननाम्यांची पूर्तता न करून ठाणेकरांच्या हाती 'नारळ' दिल्याचे म्हंटले. तेव्हा,ठाणेकरांनी यांची सत्ता उलथवुन टाकण्याचे आवाहन मनसेकडुन करण्यात आले.
"मंत्री एकनाथ शिंदे यानी फावडे- कुदळ घेऊन रस्ते उखडले,डांबर हातात घेऊन पाहणीचा फार्स केला. त्यानंतर महापालिकेच्या ४ अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले होते. मात्र अवघ्या २२ दिवसातच चौघांचेही निलंबन मागे घेऊन घुमजाव केले.हे म्हणजे दिशाभुल असुन ठाणे मनपा आयुक्तानी ठाणेकरांची माफी मागावी," अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली. सत्ताधारी शिवसेना, पालिकेतील विरोधी पक्ष आणि पालिका आयुक्त ठाणेकरांची फसवणुक करीत आहेत. २०१२ आणि २०१७ च्या पालिका निवडणुकीच्या वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे शिवसेना अद्याप ठाणेकरांना धरण देऊ शकलेली नाही, क्लस्टरचा पत्ता नाही, तर ५०० फूटांच्या घराना करमाफीचाही सत्ताधाऱ्यांना विसर पडला असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला.