भारताने इतिहास घडवला, लसीकरणाने ओलांडला १०० कोटींचा टप्पा

अपप्रचार झुगारून लसीकरण मोहिम यशस्वी

    21-Oct-2021
Total Views |
modi_1  H x W:

डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांचे पंतप्रधानांनी मानले आभार
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोना लसीकरणामध्ये भारताने १०० कोटींचा आकडा गुरूवारी ओलांडला. त्यानंतर “भारताने इतिहास घडविला असून देशवासियांच्या एकजुटीचा हा विजय आहे” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
भारताने करोना लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा गुरूवारी पार केला. त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, भारताने आज इतिहास घडविला आहे. भारतीय विज्ञान, भारताची उद्यमशीलता आणि १३० कोटी भारतीयांच्या एकजुटीमुळे हे सर्व साध्य झाले आहे. लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार झाल्याबद्दल देशवासियांचे अभिनंदन. लसीकरण यशस्वीरित्या पार पाडणारे डॉक्टप, परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टामुळे ही कामगिरी साध्य झाली, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
 
 
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रूग्णालयास भेट दिली. पंतप्रधान तेथील लसीकरण व्यवस्थेचा आढावा घेत असतानाच १०० कोटींचा टप्पा झाला. यावेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत मूळ वाराणसी येथील रहिवासी अरुण राय यांनी १०० कोटीवी मात्रा घेतली. दिव्यांग असलेल्या राय यांच्याशी पंतप्रधानांनी संवादही साधला. त्याचप्रमाणे रूग्णालयातील कर्मचारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून पंतप्रधानांनी त्याचेही अभिनंद केले.
 

rml_1  H x W: 0 
१०० कोटीवी लस घेणारे अरुण राय
 
 
पंतप्रधानांनी त्यानंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या हरियाणातील झज्जर परिसरातील राष्ट्रीय कर्करोग संस्थेतील इन्फोसिस फाउंडेशनच्या विश्राम सदनाचे लोकार्पण केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज भारताने १०० कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना करण्यासाठी, देशाकडे आता १०० कोटी लसींच्या मात्रांची मजबूत संरक्षणात्मक ढाल आहे. हे यश भारताचे आणि येथील नागरिकांचे आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
अपप्रचाराला झुगारून देणारी लसीकरण मोहीम
 
 
केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेस प्रारंभ केल्यापासून त्याविषयी मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात येत होता. प्रथम भारत स्वदेशी करोना लस बनवू शकत नाही, असा अपप्रचार करण्यात आला. मात्र, भारत बायोटेकने स्वदेशी कोव्हॅक्सीनचे उत्पादन केल्यानंतर लसीच्या परिणामकारकतेविषयी शंका निर्माण करण्यात आल्या. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्डचे लसीकरण सुरू केल्यानंतर काही राजकीय पक्षांना परदेशी प्रसारमाध्यमांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या. त्याचप्रमाणे भारत एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यास कसा सक्षम नाही, असाही प्रचार आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आला होता.
 
 
अशी होती आव्हाने
 
 
भारताच्या १३० कोटी जनतेचे लसीकरण हे सर्वांत मोठे आव्हान होते. त्याचप्रमाणे सर्व राज्यांमध्ये कमीत कमी वेळात पुरसे लसपुरवठा करणे, ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्येही एकाच वेळी लसीकरण कार्यक्रम सुरू ठेवणे, लसींचा पुरवठा आणि साठा करण्यासाठी व्यवस्था उभारणे, दिव्यांगांचे लसीकरण अशा अनेक आव्हानांचा यशस्वी सामना करीत भारताची लसीकरण मोहिम सुरू आहे.
 
एकुण लसीकरण – १,००,५७,४२,४७२
पहिली मात्रा – ७१,०७,०४,७५३
दुसरी मात्रा – २९,५०,३७,७१९
 
 
लसीकरणात आघाडीवर असलेली पहिली पाच राज्ये
 
 
उत्तर प्रदेश – १२ कोटी ३१ लाख ५७ हजार ७५७
महाराष्ट्र – ९ कोटी ३९ लाख ६४ हजार १२६
पश्चिम बंगाल – ६ कोटी ९३ लाख ७६ हजार ६४०
गुजरात – ६ कोटी ८० लाख ९७०
मध्य प्रदेश – ६ कोटी ७८ लाख २ हजार ०४२
 
 
महिला – पुरुष प्रमाण
 
 
महिला – ४८ कोटी २२ लाख ३१ हजार ७०३
पुरुष – ५१ कोटी ९१ लाख ७ हजार १५५
 
 
वयोगट
 
 
वय वर्षे ६० व पुढे – १७ कोटी ११ लाख ६४ हजार ५१८
वय वर्षे ४५ ते ६० – २७ कोटी १० लाख ४३ हजार ६५६
वय वर्षे १८ ते ४४ – ५५ कोटी ९३ लाख ५५ हजार १७०
 
 
लस
 
 
कोव्हिशील्ड – ८८ कोटी ५८ लाख ५१ हजार ४७५
कोव्हॅक्सिन – ११ कोटी ५६ लाख ६० हजार १६३
स्पुटनिक व्ही – १० लाख ५१ हजार ७०६