मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्स चॅटमध्ये तिचे नाव समोर आल्याची शक्यात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी तिच्या घरी जाऊन तिला समन्स दिले आहे. दुपारी २ वाजता तिला एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर माहितीबद्दल एनसीबीकडून अधिकृतरित्या कोणतीही पुष्टी केलेली नाही. परंतु, यामुळे हे प्रकरण आणखी किती खोलात जाते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हीदेखील एक नवोदित अभिनेत्री आहे. तसेच, ती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची मैत्रीणदेखील आहे. एनसीबीने बुधवारी न्यायालयात आर्यन खान आणि नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे.
दरम्यान, एनसीबीची एक टिम ही मन्नत बंगल्यावरही गेली असल्यचे काही फोटो समोर आले आहेत. गुरुवारी सकाळी शाहरुख तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटला. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील क्रूझमधून अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तो ३ ऑक्टोबरपासून तुरुंगात आहे. बुधवारी त्याची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली. गुरुवारी, आर्यनच्या वकिलांनी शाहरुखच्या मुलाच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या जामीन अर्जावर आता २६ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.