
नेवाडा : अमेरिकेतील हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते विकास देशपांडे म्हणाले की, “नेवाडा राज्याने ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करणार असल्याचे जाहीर केले, त्यातून एक समाज म्हणून हिंदूधर्मियांना पाठिंबा आहे, असे त्या राज्याने दाखवून दिले. नेवाडा हिंदू संस्कृतीचा आदर करते, तसेच हिंदू संस्कृती अमेरिकेतही वृद्धिंगत व्हावी म्हणून त्यांनी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील हिंदूधर्मीय आपले काम उत्तमरीत्या करतो,” असे सांगत ते पुढे म्हणाले की, “हिंदू संस्कृतीचे अमेरिकेला फायदेच झाले आहेत, होत आहेत आणि होणार आहेत. हिंदूंची खाद्य संस्कृती, योग, वेशभूषा, बॉलीवूड अमेरिकेतील नागरिकांना भावते. कारण हिंदू ‘रिलिजन’ नाही तर ‘धर्म’ आहे आणि त्याचे कौतुक ‘हिंदू हेरिटेज मंथ’च्या माध्यमातून होत आहे,” असेही विकास देशपांडे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितले. वॉशिंग्टन, दि. २ (वृत्तसंस्था)ः अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला (हिंदू वारसा महिना) सुरुवात झाल्याने अमेरिकेतील हिंदू धर्मीयांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. त्यातच अमेरिकेतील नेवाडा राज्यानेही ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
हिंदूधर्मीयांच्या परंपरा, संस्कृती आणि वारसा असणार्या ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला शुक्रवार, दि. १ऑक्टोबरपासून अमेरिकेत सुरुवात झाली. अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये हिंदूधर्मीयांच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणार्या विविध कार्यक्रमांचे आयोजन ‘हिंदू हेरिटेज मंथ’अंतर्गत करण्यात आले. येथे वास्तव्यास असणार्या हिंदूधर्मीय नागरिकांनी नृत्य, संगीत, वक्तृत्व, कविता आदी कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला सुरुवात झाली असली, तरी याला मिळणारा वाढता प्रतिसाद अमेरिकेत कायम आहे. अमेरिकेतील नेवाडा राज्यानेही गुरुवार, दि. ३० सप्टेंबर रोजी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला मंजुरी दिली. ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला मंजुरी देणारे नेवाडा दहावे राज्य ठरले आहे. नेवाडाचे राज्यपाल स्टीव्ह सिसोल्क यांनी याबाबत लेखी निवेदन जारी करत ‘हिंदू हेरिटेज मंथ’ आपल्या राज्यातही साजरा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हिंदू समाजातील नागरिकांनी अमेरिकेच्या विविध क्षेत्रांच्या विकासात बहुमूल्य योगदान दिले आहे. विज्ञान, शिक्षण, वैद्यकीय, कायदा, राजकारण, व्यवसाय, संस्कृती, क्रीडा आणि अन्य विविध क्षेत्रांतील हिंदू समाजातील नागरिकांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे. हिंदू समाजातील वारसा, परंपरा आणि संस्कृती आदींमुळे अमेरिकेतील राज्ये समृद्ध झाली असून, याच कारणात्सव ऑक्टोबर हा संपूर्ण महिना ‘हिंदू हेरिटेज मंथ’म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे या लेखी निवेदनांमध्ये म्हटले आहे.
फ्लोरिडानंतर टेक्सास, न्यू जर्सी, ओहयो, ‘दि कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स’, जॉर्जिया, मिसिसिपी मिनेसोटा, व्हर्जिनिया आणि नेवाडा अशा एकूण दहा राज्यांनी ‘हिंदू हेरिटेज मंथ’ला आपला पाठिंबा जाहीर केला असल्याने अमेरिकेतील हिंदूधर्मीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- विकास देशपांडे