समाजकार्याचा ‘नंदा’दीप!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2021   
Total Views |

nanda barate 2_1 &nb


घरकाम करणार्‍या समाजभगिनींच्या पाल्यासाठी पाळणाघर चालवणार्‍या नंदा बाराटे म्हणजे सेवाकार्याचा नंदादीप. त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला मागोवा...


सेवावस्तीतील माता आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी कष्ट करायला तयार असतात. मात्र, पदरात लहान मुले असल्यामुळे त्या घराबाहेर पडू शकत नाहीत. शहरात पाळणाघरं असतातच. पण, त्यांचे शुल्क या आयाबायांना परवडणारे नसते. तसेच सेवावस्तीला लागूनच संस्था आणि विश्वास ठेवावा, असे संस्थेचे संचालक मिळणे कठीणच. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे कर्वेनगरच्या नंदा बाराटे सलग २१ वर्षे घरकाम करणार्‍या महिलांच्या बालकांसाठी पाळणाघर चालवतात.हे पाळणाघर सुरू व्हायलाही एक घटना कारणीभूत ठरली. नंदा यांचे बंधू नव्वदच्या दशकात निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे होते. त्यांच्या प्रचारासाठी त्या पुण्यातील सेवावस्तीमध्ये गेल्या. साधारण २१ वर्षांपूर्वीची ही गोष्ट.




झोपडीला कुलूप लावले होते. झोपडीच्या बाहेर ओसरीवर गोणपाटावर तीन-चार वर्षांचे बाळ बसलेले. त्याच्या बाजूला ताटात भाकरी दुधात चुरून ठेवलेली. बाळ ती भाकरी खात होते. त्याच ताटाला कुत्र्यानेही तोंड लावले आणि त्याने भाकरी फस्त केली. भुकेलेले बाळ रडू लागले. नंदा बाराटे यांनी हे दृश्य पाहिले. हे दृश्य पाहून नंदा यांचे हृदय द्रवले. त्या बाळाला त्यांनी घरी नेले. त्या झोपडीच्या बाजूच्या झोपडीत राहणार्‍या महिलेला सांगितले की, नंदा बारोटे बाळाला घेऊन गेल्या. चार तासांनी नंदा यांच्या घरी मुलाची आई आली. नंदांनी विचारले, “असं मुलाला टाकून जातेस उघड्यावर? कुत्रा चावला असता तर? तुझ्या बाळाची सगळी भाकरी कुत्र्यानेच खाल्ली.” यावर ती महिला रडत रडत म्हणाली, “ताई, आम्ही उस्मानाबादवरून आलो. चार घरची धुणी-भांडी केली, तरच मला आणि माझ्या बाळाला पोटभर अन्न मिळेल. माझ्या बाळाला सांभाळणारे कुणी नाही. घरात कसं कोंडून ठेवणार म्हणून बाहेर ठेवते.” त्या दिवसापासून ते आजपर्यंत नंदा घरकाम करणार्‍या मातांच्या मुलांसाठी पाळणाघर चालवतात. पाळणाघराचे नाव आहे ‘नंदादीप बालक मंदिर.’




पुणे कर्वेनगरमध्ये घरकाम करणार्‍या महिलांच्या मुलांना सांभाळून त्यांना शिक्षण आणि संस्कार देणार्‍या नंदा बाराटे या परिसरात ‘नंदाआत्या’ म्हणून प्रसिद्ध. आज त्यांच्याकडे १२० बालके आहेत. या मुलांना सांभाळण्यासाठी १६ सेविका आहेत. सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळात तीन-तीन तास या सेविकांना काम असते. यासाठी त्यांना मानधनही दिले जाते. या सगळ्यासाठी नंदा बाराटे नाममात्र शुल्कही पालकांकडून घेतात. मात्र, विधवा आणि परित्यक्ता महिलांची दोन मुले असतील, तर त्या केवळ एकाच मुलाचे शुल्क घेतात. आज पुण्यातील अनेक सेवाभावी संस्था नंदा बाराटे यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत.पुणे कर्वेनगरमध्ये समाजजीवनात आणि सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या नंदा बाराटे. इतका प्रदीर्घ काळ सामाजिक कार्यासाठी त्याग स्वरूपात व्यतीत करणार्‍या नंदा यांचे आयुष्य चित्र कसे असेल?तर मूळच्याच पुण्याच्या गणपत बाराटे आणि भामा बाराटे या शेतकरी दाम्पत्याला आठ अपत्ये. त्यापैकी एक नंदा. घरचे वातावरण अत्यंत चौकटीतले. रूढी आणि रीतिरिवाज पाळणारे. सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी नंदा यांचा विवाह सदाशिव पेठेतल्या मधुकर यानपुरे यांच्याशी झाला. राजाराणीचा संसार सुरू झाला. पण, निष्ठुर दैवगती. मधुकर यांना कॅन्सर झाला आणि विवाहाला तीन वर्षे होतात न होतात, तर त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी नंदा केवळ २० वर्षांच्या होत्या.



सासरचे म्हणाले की, इतक्या तरुण लहान मुलीला आम्ही सांभाळू शकत नाही. तिने माहेरी जावे. कोवळ्या वयात विधवा झालेल्या नंदा यांच्यावर आभाळ कोसळले. यावेळी नंदा यांची बहीण त्यांच्यासोबत उभी राहिली. त्यांनी नंदा यांना हिंगणे शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथे नंदा यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे बालवाडीचे प्रशिक्षण पूर्ण केले. हे सगळे करताना त्या हिंगणे शिक्षण संस्थेमध्ये अनेक सेवाभावी उपक्रमांमध्ये सहभागी झाल्या. सेवाभावी उपक्रम राबवताना त्या वैयक्तिक दुःख विसरून गेल्या. पुढेही सेवा हेच आपले ध्येय हे त्यांनी ठरवले. संस्थेत बाया कर्वे यांच्या कार्याची माहिती मिळालीच होती. त्यांच्यासारखे सेवाकार्य करावे, हा निर्णय नंदा यांनी घेतला. त्यातूनच मग १२ वर्षे त्यांनी लहान मुलांसाठी बालवाडी चालवली. पुढे घरकाम करणार्‍या महिलांच्या पाल्यासांठी त्यांनी पाळणाघर सुरू केल्यानंतर तर आयुष्याचे अर्थच बदलले. पाळणाघरात असणार्‍या मुलांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांना संस्कार देणे, आईच्या मायेने त्यांचा सांभाळ करणे, ही मुले पुढे देश आणि समाजनिष्ठ कशी होतील, असे विचार त्यांच्यावर बिंबवणे यातच त्या कार्यरत झाल्या. आज त्यांच्या पाळणाघरात राहून गेलेली मुले मोठी झाली आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे. सेवावस्तीतील गरीब कुटुंबांच्या मुलांना उत्तम भविष्य मिळावे, यासाठी निःस्वार्थी सेवाकार्य करणार्‍या नंदा या खर्‍या अर्थाने समाजकार्यातील नंदादीपच आहेत. नंदा म्हणतात की, “आयुष्याचा प्रत्येक क्षण मला सेवावस्तीतील बालकांच्या संस्कारक्षम जीवनासाठी व्यतीत करायचा आहे.”



@@AUTHORINFO_V1@@