ठाणे (दीपक शेलार) : ‘आयआयटी’च्या समाधानकारक अहवालानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित कोपरी पुलाच्या पहिल्या दोन मार्गिका नुकत्याच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या. मात्र, असे असले तरी सकाळ-संध्याकाळ वर्दळीच्या वेळी (पीक अवर्स) या मार्गावरील वाहतूककोंडीचे शुक्लकाष्ठ कायम असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील मेट्रोची कामे व तीन हात नाका येथील अरुंद ‘बॉटलनेक’मुळे तसेच मुंबई दिशेकडील आनंदनगर टोलनाक्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे वाहतूक उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील १९६५ साली उभारण्यात आलेल्या अरुंद कोपरी पुलावर वाहतुककोंडी होत असल्याने २०१३ साली सर्वप्रथम आमदार संजय केळकर यांनी या पुलाच्या रुंदीकरणासाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. फडणवीस यांनीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘एमएमआरडीए’कडे या पुलाचे दायित्व सोपवल्यानंतर या कामाला वेग आला. राज्यात सत्तांतर झाले. पुन्हा काही काळ हे काम लांबणीवर पडले.
अखेरीस बर्याच कालावधीनंतर नुकत्याच दोन्ही दिशेकडील दोन्ही मार्गिका खुल्या केल्यानंतर या मार्गावरील कोंडी सुटणार असल्याचे दावे सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आले होते. मात्र, अद्यापही सकाळ-संध्याकाळ वर्दळीच्या वेळेत या मार्गावर वेग धीमा होऊन वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईकडून येताना वाहने तिनहात नाक्यावरील उड्डाणपुलावर जाताना दोनच लेन (बॉटलनेक) असल्याने तसेच, खालील सिग्नलमुळे वाहने खोळंबतात. मुंबईच्या दिशेला जाणारी वाहने आनंदनगर टोलनाक्यावर रखडत असल्याने वाहनांच्या रांगा लागतात.
यासंदर्भात, वाहतूक उपायुक्त पाटील यांना विचारले असता पूर्वीप्रमाणे वाहतूककोंडीचे प्रमाण घटल्याचा दावा केला. सध्या वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार, विविध ठिकाणी मार्गरोधक उभारून वाहतूक पोलीस तैनात केले जातात. तीन हात नाका सिग्नल यंत्रणेचा कालावधी पाच टप्प्यांत बदलण्यात आला आहे. वर्दळीच्या वेळेत नियम मोडणार्या वाहनांवर कारवाईऐवजी वाहतूक नियोजनावर भर दिला जात असून पूर्व द्रुतगती महामार्गावरून सर्व्हिस रोडवर जाण्यासाठी कोपरी पुलाच्या मार्गिकेआधी तुळजाभवानी मंदिरानजीकच्या मार्गाची जागा बदलण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेला दिल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, वाहतुकीचा अडथळा कायमस्वरूपी संपवण्यासाठी भविष्यात आनंदनगर चेकनाक्यावरून कोपरीमार्गे मुंबईच्या दिशेने ये-जा करण्यासाठी थेट गुरुद्वारा सर्व्हिस रोडचा वापर सकाळ-संध्याकाळ एकदिशा मार्ग करण्याचे विचाराधीन असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
जुन्या कोपरी रेल्वे पुलाचे बांधकाम आठवड्याभरात
पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेच्या मार्गिका तूर्त सुरू झाल्याने आठवड्याभरात जुन्या रेल्वे पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची दमछाक होणार असल्यामुळे कोपरी पुलाच्या कोंडीत वाहनांना अडकून पडावे लागण्याची शक्यता आहे.