मुंबईही आता ‘७-इलेव्हेन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2021   
Total Views |

7 - 11 _1  H x


मुंबई घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे महानगर. त्यामुळे मुंबईची गती दिवस असो वा रात्र कायम असते. अशा या देशाच्या वेगवान आर्थिक राजधानीत इतर राज्यांतून स्थायिक होणार्‍यांची, रात्रपाळीत काम करणार्‍यांची संख्याही तितकीच लक्षणीय. पण, मुंबईतील दुकाने, मॉल्स रात्रीच बंद होत असल्यामुळे अनेकांची गैरसोय होते. नाही म्हणायला हल्ली जेवणापासून ते वाणसामानापर्यंत ‘ऑनलाईन ऑर्डर्स’चा जमाना असला तरी शेवटी त्यालाही कुठे तरी काळवेळेचे बंधन आहेच. परंतु, आता जगप्रसिद्ध ‘७-इलेव्हेन’च्या दुकानांची साखळी मुंबईतही सुरु होणार असल्याने खर्‍या अर्थाने मुंबई रात्रभर जागी राहील, यात शंका नाही. ‘७-इलेव्हेन’ ही अमेरिकन ‘कन्विनिअंट स्टोअर’ची जागतिक फ्रँचाईझी. ‘रिलायन्स रिटेल’सोबत करार झाल्यानंतर दि. ९ ऑक्टोबरला मुंबईतील अंधेरीच्या मरोळमध्ये ६०० स्क्वे. फूट जागेत या पहिल्यावहिल्या दुकानाची सुरुवातही झाली. ही दुकाने म्हणजे सोप्या शब्दांत सुपरमार्केट. खाण्यापिण्याची, सौंदर्यप्रसाधनाची अशी सगळी उत्पादने इथे एका छताखाली इथे उपलब्ध होतात. पण, त्याचबरोबर अल्पोपहार, चहा-कॉफी (भविष्यात जेवणही मिळेल) सोय ग्राहकांसाठी करण्यात आली आहे. खरंतर २४ तास ही दुकानं खुली असतात. पण, सध्या तरी मरोळमधील हे पहिले ‘७-इलेव्हेन’ नावाप्रमाणे सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत ग्राहकसेवा देईल. त्याचबरोबर ग्राहकांना बसण्यासाठी जागा, शौचालयाची व्यवस्थाही या दुकानांमध्येच उपलब्ध आहे. भारतातील बियानींच्या ‘फ्युचर ग्रुप’बरोबर ‘७-इलेव्हेन’ दुकाने सुरु करण्याचा करार २०१९ सालीच झाला होता. परंतु, कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही व तो करार रद्द होताच रिलायन्सने त्यात रस घेऊन पहिले ‘७-इलेव्हेन’ दुकान उघडूनही दाखवले. तेव्हा आता ‘रिलायन्स फ्रेश’, ‘डी-मार्ट’प्रमाणेच ‘७-इलेव्हेन’ दुकानेही मुंबईच्या कानाकोपर्‍यांत आगामी काही काळात सहज दिसू लागतील. आता यांसारख्या दुकानांमुळे पुन्हा स्थानिक दुकानदारांचे, भाजीपाला विक्रेत्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. पण, आजचा जमाना हा ग्राहककेंद्रित सेवांचा आहे. त्यानुसार जो आपल्या सेवा ग्राहकांना लवकरात लवकर, दाराशी आणि किफायतशीर दरांत उपलब्ध करुन देईल, त्याचीच चलती. तेव्हा, ‘चलते रहो’ या घोषवाक्यासह मुंबईकरांच्या सेवेत झालेल्या ‘७-इलेव्हेन’चे स्वागत!



ग्राहकाभिमुखतेची गुरुकिल्ली


परदेशात ज्यांनी प्रवास केला असेल त्यांना ‘७-इलेव्हेन’ची महती वेगळी सांगावी लागणार नाही. जुलै २०२०च्या एका आकडेवारीनुसार एकूण १७ देशांमध्ये ‘७-इलेव्हेन’ची तब्बल ७१ हजार, १०० दुकाने कार्यरत आहेत. या दुकानांपैकी सर्वाधिक दुकाने आहेत, ती जपानमध्ये आणि त्या खालोखाल थायलंडमध्ये. त्यापैकी थायलंड दौर्‍यावर असतानाच चौकाचौकात असलेले ‘७-इलेव्हेन’ हे स्थानिकांसह पर्यटकांनाही कसे आकर्षित करते, ते प्रत्यक्ष अनुभवताही आले. असो. तर अशा या ‘७-इलेव्हेन’ दुकानांच्या साखळीची सुरुवात झाली ती १९२७ साली अमेरिकेतून आणि हळूहळू ही फ्रँचाईझी जगभरात फोफावत गेली. ‘७-इलेव्हेन’चा ‘युएसपी’ हाच की, सुरुवातीला नावाप्रमाणे सकाळी ते ७ ते रात्री ११ प्रमाणे उघडी असणारी ही दुकाने सध्या जगभरात रात्रभर खुली असून ग्राहकांच्या सेवेसाठी २४ तास सज्ज असतात. त्यामुळे रात्रीही धावणार्‍या मुंबईसारख्या महानगरात ‘७-इलेव्हेन’ दुकानांचे जाळे मुंबईकरांच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यात सक्षम ठरेल, असे वाटते. पण, आधी म्हटल्याप्रमाणे ‘७-इलेव्हेन’ किंवा अन्य सुपरमार्केट्समुळे छोटे दुकानदार, भाजी-फळ विक्रेते उद्ध्वस्त होतील, अशी ओरड यापूर्वीही करण्यात आली होती. स्थानिकांचे रोजगार बुडतील, बेरोजगारी वाढेल म्हणूनही चिंता व्यक्त केली गेली. परंतु, आज प्रत्यक्षात याच मोठमोठाल्या सुपरमार्केट्समध्ये लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे एक किराणाचे दुकान जे दोन-तीन जणांना रोजगार देत होते, त्याच धर्तीवर सुपरमार्केट्स आज किमान शे-दोनशे तरुणांना रोजगार देताना आपण पाहतो. त्यामुळे दुकानदारांनी, विक्रेत्यांनी कालानुरुप बदलांना आपलेसे करुन ग्राहकाभिमुखतेला केंद्रस्थानी ठेवणे हीच व्यवसायाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल. उदाहरणादाखल, कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या दूध, भाजीपाला, सामानखरेदीवर काही मर्यादाही आल्या. परंतु, या काळात काही भाजी-फळ विक्रेत्यांनी चक्क मोबाईलवर केवळ ऑर्डर्सच स्वीकारल्या नाहीत, तर ‘ऑनलाईन पेमेंट’चाही मार्ग प्रशस्त केला. त्यामुळे ‘७-इलेव्हेन’सारख्या दुकानांमुळे भविष्यात मुंबईतील किरकोळ बाजारातील स्पर्धा वाढीस लागेलच. पण, म्हणून नुसती बोटे न मोडता या स्पर्धात्मक जगतात टिकून राहायचे असेल तर ग्राहकाभिमुखतेबरोबरच कल्पकता, नावीन्य व्यापार्‍यांनी आत्मसात केल्याशिवाय गत्यंतर नाही.




@@AUTHORINFO_V1@@