धन्य हा प्रेरक‘विजयोत्सव’

    14-Oct-2021
Total Views |

shri ram_1  H x
उद्या विजयादशमी. सामान्य जनतादेखील नानाविध दोष, दुर्गुणांवर आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवत सत्कर्म, सद्गुणांच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त होते, ती विजयादशमी दिनी! आश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमीपर्यंतचे हे दहा दिवस म्हणजेच ‘दश + अहर्’! या दहा दिवशी आध्यात्मिक प्रगती व आत्मोन्नती यासाठी जागृत राहण्याचा प्रयत्न होतो.



जयेम कारे पुरुहूत कारिणो
अभितिष्ठेम दूढ्य:।
नृभिवृत्रं हन्याम शूशुयाम च,
अवेरिन्द्र प्रणो धिय:॥
(ऋग्वेद-८.२१.१२)



अन्वयार्थ


(पुरुहूत इन्द्र) हे पुष्कळ स्तुतियुक्त परमेश्वरा, (कारिण:) कार्य करण्यात तत्पर आम्ही (कारे) प्रत्येक कर्मक्षेत्रामध्ये (जयेम) विजय ठरोत. (दूढ्य:) दुर्बुद्धी असलेल्या आणि दुष्कर्मे करणार्‍या वाईट लोकांना (अभितिष्ठ) पराजित करोत,(नृभि:) मोठ्या पुरुषार्थाने (वृत्रं) दुष्ट व हिंस्र शत्रूंना (हन्याम) नाहीसे करोत. (च) आणि (शूशुयाम) पुढे प्रगती करीत राहोत. हे परमेश्वरा! तू (न:) आमच्या (धिय:) बुद्धी, ज्ञान आणि कर्मांना (प्र अवे:) प्रकृष्ट रूपाने रक्षण कर.

विवेचन

भगवद्शक्तीसमोर मानव अल्पज्ञ असला, तरी त्याला आत्मशक्तीचे अद्भुत वरदान लाभलेले आहे. अशा या बलाढ्य सामर्थ्य लाभलेल्या मानवाला वेदांनी नेहमीच उत्साही बनवले आहे. नाना प्रकारच्या संकटांना तोंड देत त्यांच्यावर मात करण्यासाठी व जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विजयी होण्यासाठी वेदांचा प्रेरक दृष्टिकोन नेहमीकरिता उद्बोधक ठरतो.भारतीय संस्कृतीचा इतिहास देदीप्यमान आहे. याच पावन भूमीच्या ऐतिहासिक पाऊलखुणा सण व उत्सव यांच्या माध्यमांनी निरंतर जगाला प्रेरणा देत असतात. या आर्यभूमीत वेळोवेळी साजर्‍या होणार्‍या सणा-समारंभांना आधार आहे तो निसर्गात घडणार्‍या बदलांचा व नवपरिवर्तनांचा, तसेच धार्मिकता, आध्यात्मिकता आणि महापुरुषांचे नैतिक बळ आणि त्याविषयींच्या घटना-प्रसंगांचा परिसस्पर्शदेखील आहे. म्हणूनच सर्वच पर्व आणि उत्सवांच्या मूलभूत उद्दिष्टांनुसार त्या त्या विषयांवर समर्पक असे विचार वेदांकडून प्राप्त होतात. वेदांमध्ये काळ, घटना व महापुरुषांचा इतिहास नसला, तरी नंतरच्या युगांमध्ये मानव समूहाने जे सण व उत्सव साजरे केले, त्यांना पाठबळ देणार्‍या तद्विषयक वेदमंत्रांचा दिव्य संदेश उपयुक्त ठरतो. म्हणूनच सांस्कृतिक व धार्मिक उत्सव प्रवाहांना अधिक विकसित करण्यासाठी वैदिक मंत्रांची प्रेरणा फारच मोलाची ठरलेली आहे.विजयादशमी म्हणजेच दसरा हा भारतीय जनसमूहाला नेहमीच उत्साही बनवणारा सण. अगदी वैदिक काळापासून क्षत्रिय व वैश्य वर्णांसाठी जगण्याचे नवे बळ देणारा हा उत्सव. देशाचे सर्वदृष्टीने रक्षण करणारा क्षत्रिय वर्ग हा प्रखर विजयाची महत्त्वाकांक्षा हृदयी बाळगून आपल्या क्षात्रतेजाला नवी झळाळी देतो, तर देशवासीयांचे आर्थिक बळ वाढविण्यात सदैव तत्पर असलेला वैश्य वर्ग हा याच उत्सवापासून आपल्या व्यापारकर्मांचा पुनश्च शुभारंभ करतो, ही या सणाची पार्श्वभूमी. इतकेच काय, तर अध्यात्म मार्गावर नेहमीच वाटचाल करणारा सात्त्विक ज्ञानी व तपस्वी असा ब्राह्मण वर्गदेखील ज्ञान-विज्ञानाच्या मार्गावर अनुगमन करतो. त्याचबरोबर सामान्य जनतादेखील नानाविध दोष, दुर्गुणांवर आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवत सत्कर्म, सद्गुणांच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त होते, ती विजयादशमी दिनी! आश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमीपर्यंतचे हे दहा दिवस म्हणजेच ‘दश + अहर्’! या दहा दिवशी आध्यात्मिक प्रगती व आत्मोन्नती यासाठी जागृत राहण्याचा प्रयत्न होतो. अंधारातून प्रकाशाकडे व प्रवृत्तींकडे निवृत्तीकडे वाटचाल करण्यासाठी सर्वव्यापक अशा जगदंबा परमेश्वराकडे प्रार्थना व कामना करण्याचा प्रयत्नही या दरम्यानच होतो. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रियेया दहा इंद्रियांवर विजय मिळविण्याकरिता कृतसंकल्पित होण्याचाही हा सण.



अगदी रामायण, महाभारत काळापासूनचे मौलिक प्रसंग या पर्वाचे महत्त्व वृद्धिंगत करतात. प्रभू श्रीरामांनी याच आश्विन शुक्ल दशमी दिनी आपल्या सहकारी वानरसेनेसह लंकेवर विजय मिळविण्याकरिता आगेकूच केली. ही यात्रा शेवटी विजयात रूपांतरित झालीच! महाभारतात पांडवांनी १२ वर्षांचा वनवास संपवून अज्ञात वासाकडे वळण्यासाठी आपली शस्त्रास्त्रे शमीच्या वृक्षावर सुरक्षित ठेवली. नंतर पुन्हा बरोबर एक वर्षाने दशमीच्या दिवशी तीच शस्त्रे काढून त्या शस्त्रांचे पूजन केले होते. म्हणूनच क्षत्रियांच्या दृष्टीने शस्त्रास्त्र पूजनाचा आजचा मोलाचा दिवस.आमचे जीवन विजयपथाकडे अनुगमन करणारे असावे. आर्यांना पराजय ठाऊकच नाही. अथर्ववेदाच्या(७.५०.८) एका मंत्रात विजयाचा उद्घोष करीत शूरवीर सैनिक मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो-



कृतं मे दक्षिणे हस्ते
जयो मे सव्य आहितः।
गोजिद् भूयासम् अश्वजिद्
धनंजयो हिरण्यजित्॥


म्हणजेच माझ्या उजव्या हातात सत्कर्म, पुरुषार्थ व प्रयत्न आहेत, तर डाव्या हातात विजयश्री आहे. मी माझ्या परिश्रमाने ‘गो-जित्’ म्हणजेच इंद्रियांवर, भूमीवर व गोधनावर विजय मिळविणारा आहे, त्याबरोबरच अश्वजित-घोड्यांना जिंकणारा, विविध प्रकारच्या धनैश्वर्यावर विजय मिळविणारा, तसेच सोने-चांदी इत्यादी मौल्यवान रत्नांवर ही विजय मिळविणारा विजय योद्धा आहे. मला कोणीही पराजित करू शकत नाही. माझ्या चहुदिशांनी व सर्व बाजूंनी विजयाचे वारे वाहत आहे-


इतो जय इतो विजय
सं जय जय स्वाहा।


याच विजयाची ही पवित्र भावना प्रारंभिक मंत्रात विशद होत आहे. भगवंताला साक्षी मानत उपासक मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो आहे की, आम्ही ‘कारिण:’ म्हणजेच सर्व क्षेत्रात पदार्पण करणारे कर्मशील योद्धे आहोत. आम्ही प्रत्येक कर्मक्षेत्रात विजय होऊ इच्छितो. मग ते आध्यात्मिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो की कौटुंबिक पातळीवरचे असो! या सर्वच क्षेत्रात विजयाची पताका रोवणारे आम्ही मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहोत. या विजयपथावर मार्गक्रमण करीत असताना ‘दूढ्य:’ म्हणजेच नाना प्रकारचे दुर्विचार आणि दुर्बुद्धींचे वातावरण निर्माण झाले, तरी आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही त्यांना परास्त करणारच. आमच्या पुरुषार्थाच्या बळावर नानाविध वृत्रांना म्हणजेच हिंसक वृत्तींना नाहीसे करू आणि कर्मक्षेत्रात सतत पुढे जात राहू. हे ईश्वरा, यासाठी आम्हाला बुद्धी, ज्ञान आणि सत्कर्माची गरज आहे. म्हणूनच ते तू प्रदान कर.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य