पुणे : कबड्डीपट्टू असलेल्या १४ वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करत तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. भाजपशासित राज्यात एखादा प्रकार घडला की, त्याच्या निषेधासाठी महाराष्ट्र बंद करणारं महाविकास आघाडी सरकार महिला अत्याचारासाठी विशेष अधिवेशन कधी बोलावणार?, राज्यांतील महिला अत्याचाराच्या घटनांसंदर्भात एखादा बंद कधी पुकारणार, असा सवाल भाजपतर्फे विचारला जात आहे.
पुण्यात नेमकं काय घडलं?
तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला. घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे हा प्रकार घडला. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय १४, रा, अप्पर, बिबवेवाडी), असे या मृत तरुणीचे नाव आहे. नियमितपणे कब्बडीचा सराव करण्यासाठी सायंकाळी ती या भागात येत असे.
तिथे आलेल्या तीन नराधमांनी क्षितिजावर कोयत्याने हल्ला चढवला. तिच्यासह इतर मुलीही कबड्डी खेळत होत्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. आरोपीने क्षितिजा व्यवहारेचा कोयत्याने गळा चिरून हत्या केली. दरम्यान आरोपीकडे पिस्तुलही होते. रागाच्या भरात त्याने कोयत्याने सपासप वार केले. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यातील एक आरोपही तिच्या नात्यातला होता, अशी माहितीसमोर आली. राज्यातील महिला अत्याचाराचा आकडा हा सातत्याने वाढत असून आरोपींना जरब बसलेला नसल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीसांची गस्त असूनही आरोपींना धाक नाही!
धक्कादायक म्हणजे आरोपी दोन कोयते, २ तलवारी, २ सुरे आणि एक खेळण्यातील पिस्तुल घेऊन आले. धक्कादायक म्हणजे, घटनास्थळावर पोलिसांची गस्तीवर असलेली गाडी आली होती. पोलिसांची गाडी गेल्यानंतर आरोपी पुन्हा १० मिनिटांत तिथे पोहोचले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेसह बिबवेवाडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.