ग्रामविकास, वनवासी विकास, अपारंपरिक ऊर्जेचा विकास, पर्यावरण रक्षण आणि गोवंश वृद्धी या पाच मुख्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असणारी भाईंदर, उत्तन येथील ‘केशवसृष्टी’ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित सामाजिक संस्था आपल्या वैभवशाली कामांमुळे प्रचलित आहे. कोरोना काळात जीवितहानी झालेल्या कुटुंबांच्या पुनरुत्थानासाठी ‘केशवसृष्टी’ने ‘अक्षय सहयोग’ योजना सुरू केली. त्या ‘अक्षय सहयोग’ योजनेचे उद्दिष्ट, लक्ष्य या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनच ‘केशवसृष्टी’ समाजाच्या उत्थानासाठी सेवाकार्य करीत आहेच. त्यात प्रामुख्याने ‘सॅनिटायझर’, ‘पीपीई’चे वाटप, अन्नधान्य वाटप यांचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. ‘केशवसृष्टी’ वनौषधींचा ‘आयुष काढा’ एक लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे. आपण भारतीय सेनेसाठी ३० हजार ‘आयुष काढ्या’ची मागणी पूर्ण करून दिली आहे. ५,५०० च्या पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले. मुंबईत जोगेश्वरी आणि अंधेरी भागात तसेच जव्हारला जवळजवळ दोन महिने रुग्णांसाठी अद्ययावत ‘कोविड’ केंद्रांची निर्मिती करण्यात आली. दरवर्षी ‘केशवसृष्टी’ सामाजिक काम करणार्या एखाद्या तरुण संस्थेला पुरस्कार देते. २०२० हे पुरस्काराचे अकरावे वर्ष होते. त्यावेळी एखाद्या संस्थेला पुरस्कार देण्याऐवजी निवड समितीने कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांना सन्मानित करण्याचे ठरविले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या ‘केशवसृष्टी’ या संस्थेने ‘अक्षय सहयोग’ हा एक नवीन उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोनाने प्रभावित झालेल्या कुटुंबीयांचे सशक्तीकरण केले जात आहे. सध्या या ‘अक्षय सहयोग’ उपक्रमाची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्यांनी माझ्यावर सोपविली आहे.
यावर्षी कोरोनाची आलेली दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयावह आणि जीवघेणी ठरली. मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत होती. त्यातच घराचा कर्ता पुरुषच या महामारीत गतप्राण झाला, तर त्याच्या मुला-बाळांची, कुटुंबाची होणारी वाताहत, तर न बघावणारी असते. उपासमारीमुळे संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर येण्याची शक्यतासुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळाली. आलेली सर्व संकटे विसरून पुन्हा जीवन जगणार्यांना एक मायेचा, आपुलकीचा हात देण्यासाठी ‘केशवसृष्टी’ने १४ मे रोजी ‘अक्षय सहयोग’ उपक्रमांतर्गत आपल्या सेवाकार्यास अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रारंभ केला. कोरोना प्रभावित कुटुंबांच्या मदतीसाठी नवीन प्रकल्प सुरू करताना सुरुवातीला मुंबई, पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले होते. गेल्या चार महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या योजनेबद्दल माहिती मिळाल्यामुळे उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबई, पालघर भागांतून ४०० च्या वर कुटुंबांची नोंदणी झाली. आपण मासिक रेशन खर्च, विद्यार्थ्यांची शाळा, कॉलेजचे शुल्क आणि वैद्यकीय खर्च अशा प्रकारची मदत केली आहे. वाडा तालुक्यातील अनेक गावांतून आपले विस्तारक सक्रियपणे ‘अक्षय सहयोग’चे कार्य करीत आहेत. दर गुरुवारी ‘केशवसृष्टी’, वाडा कार्यालयात अनेक कोरोना प्रभावित कुटुंबे आपल्या समस्या घेऊन येतात, त्यांच्या आवश्यकतेनुसार आपण अशा कुटुंबांना मदत करीत आहोत. काही कुटुंबांना घरघंटी, शिवणयंत्र इ. वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच व्यवसायासाठीचे भांडवलसुद्धा आपण अशा कुटुंबांना दिले. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून १०० कुटुंबांनी नोंदणी केली. त्यापैकी ८५ जणांना आपण महिन्याचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी शुल्काची मदत केली. वाडा, डहाणू तालुक्यात काही कुटुंबांना भेटले. परिस्थिती अतिशय भयावह आहे. दि. ३१ जुलै आणि १८ ऑगस्ट रोजी मुंबईत उत्कर्ष मंडळ, विलेपार्ले येथे आपण कोरोना प्रभावित कुटुंबांसाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. २०० च्यावर लोकांनी यासाठी संपर्क केला होता. त्यापैकी १५० कुटुंबे प्रत्यक्ष येऊन आपल्या कार्यकर्त्यांना आणि समिती सदस्यांना येऊन भेटून गेले.
येणार्या काळात ‘केशवसृष्टी’चे ज्येष्ठ सदस्य विमल केडिया, मुकुंदराव चितळे, डॉ. अलका मांडके यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील तरुणांचे एक पथक अशा कुटुंबांचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करीत आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी एक-एक पालक परिवार नेमण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांसह, विविध विचारमंथन सत्रांमधून सुयोग्य अशा कल्पना आणि सूचना विचारात घेतल्या जात आहेत. प्रभावित कुटुंबांसाठी जी मदत केली जाणार आहे, त्यामध्ये शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण, वैद्यकीय साहाय्य, कायदेशीर साहाय्य, करिअर समुपदेशन, मानसिक आरोग्य सल्ला, विवाह मदत, मासिक शिधावाटप, निवारा, सरकारी योजनेचा लाभ आदी महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमात तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेतले जात असून त्यानुसार कार्यपद्धती ठरविली गेली आहे. तसेच अन्य स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्यात येत आहे. कुणाला या प्रकल्पात आपले योगदान द्यायचे असेल, मग ते आर्थिक स्वरुपात असेल किंवा एखाद्या कुटुंबाचा पालक म्हणून असेल तर संस्थेशी जरूर संपर्क साधावा, असे मी आपणांस आवाहन करते.
- प्रा.अमेया महाजन
(लेखिका ‘केशवसृष्टी’च्या कार्यकारिणी मंडळाच्या सदस्य आहेत.)