मलेरियावर मात

    12-Oct-2021
Total Views |


malaria vaccine_1 &n




नुकतीच मलेरियाच्या लसीची घोषणा झाली. या लसीच्या वापरास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. ‘जीएसके’ या औषध कंपनीने ३० वर्षांच्या संशोधनानंतर ही लस शोधून काढली. ही लस लवकरच उपलब्ध होणार आहे. मलेरिया निर्मूलनाच्या दृष्टीने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे आज तरी वाटते. ही लस भारतात लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, भारतातील ‘भारत बायोटेक’ या औषधी कंपनीचा ‘जीएसके’ कंपनीबरोबर समझोता करार आहे. या आनंदाच्या बातमीच्या निमित्ताने मलेरियाचा आढावा पुन्हा एकदा घेऊया.



स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही वर्षे ‘राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन’ कार्यक्रम हा अतिशय चांगल्या रितीने राबविला गेला. त्यामुळे मलेरिया हा साथीचा आजार बर्‍याच अंशी नियंत्रणात होता. नियमित कीटकनाशकांची फवारणी करणे, घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण शोधणे, तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांना ‘क्लोरोक्वीन’च्या गोळ्या देणे, या सर्व उपायांमुळे मलेरिया हा आजार नियंत्रणात राहिला. मात्र, त्यानंतर प्रशासकीय ढिलाईमुळे व मलेरियाच्या कृमीमध्ये झालेल्या बदलामुळे (म्युटेशन) मलेरियाने पुन्हा डोके वर काढले. मलेरिया रुग्णांची संख्या वाढू लागली. ‘क्लोरोक्वीन’च्या गोळ्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. मलेरियात निर्माण होणार्‍या उपद्रवाचे (कॉम्प्लिकेशन) प्रमाणदेखील वाढू लागले व काही रुग्ण यात मृत्युमुखी पडू लागले. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस ‘सेरेब्रल मलेरिया’ने डोके वर काढले व अनेक रुग्ण यात मृत्युमुखी पडू लागले. हा आजारदेखील झपाट्याने वाढत असे. आरोग्य यंत्रणेसाठी ‘सेरेब्रल मलेरिया’ हे मोठे आव्हान निर्माण झाले होते. गेल्या तीन दशकांत मलेरियावर अनेक नवीन औषधे निर्माण झाली, पण ही सर्व औषधे महागडी होती. मलेरियाचा उपद्रव झाल्यास त्यावर खासगी रुग्णालयात उपचार करणे सामान्य जनतेस परवडणारे नव्हते. आमच्या लहानपणी ‘क्लोरोक्वीन’च्या गोळ्या, तापाच्या रुग्णास घरपोच दिल्या जायच्या. नव्वदच्या दशकानंतर सर्व संदर्भ बदलले. मलेरिया हा प्राणघातक व खर्चिक आजार ठरु लागला.२०१० च्या दशकात डासांमुळे पसरणारा ‘डेंग्यू फिवर’ हा आजार डोके वर काढू लागला. या आजाराच्या उपद्रवानेदेखील अनेक तरूण रुग्ण मृत्युमुखी पडले. ‘डेंग्यू’ हा ‘व्हायरल’ आजार असल्यामुळे त्यावर प्रभावी औषध नव्हते. ‘डेंग्यू’ची लस निर्माण करण्याचे प्रयत्न झाले, पण त्याला यश आले नाही.



मलेरियाचा प्रसार हा डासांमुळे होतो. ‘प्लासमोडियम’ या कृमी (पॅरासाईट) मुळे हा रोग उद्भवतो. या कृमी डासांमध्ये आढळतात. या कृमी असलेली ‘अनोफेलीस’ या जातीच्या डासांची मादी चावल्यास माणसांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. या कृमी यकृत आणि रक्तातल्या तांबड्या पेशींवर हल्ला करतात. तांबड्या पेशींमध्ये या कृमींचे विभाजन होऊन त्या वाढू लागतात. ही वाढ प्रमाणाबाहेर झाल्यावर त्या तांबड्या रक्तपेशी फोडून बाहेर येतात. याच सुमारास रुग्णास थंडी-ताप येण्यास सुरू होतो. या थंडी-तापाच्या तीन अवस्था आहेत.



पहिली अवस्था - (कोल्ड स्टेज)



या अवस्थेत रुग्णास थंडी वाजते. अंग कंप पावते. अगदी दोन-तीन पांघरुणे घेतली तरी ही थंडी जात नाही. अस्वस्थता वाढते. आपल्याला काय झाले आहे, हेच रुग्णास समजत नाही व रुग्ण घाबरुन जातो. लहान मुलांमध्ये हा प्रकार आकडीसारखा वाटून पालकांची घाबरगुंडी उडते. मात्र, यामध्ये आकडीप्रमाणे शरीर ताठ होत नाही की तोंडाला फेस येत नाही. ही अवस्था साधारणत: 20 मिनिटे ते एक तास राहते. त्यानंतर दुसरी अवस्था सुरू होते.



दुसरी अवस्था - (हॉट स्टेज)



या अवस्थेत अंग तापू लागते व ताप १०३ ते १०४ ‘फॅरनहाईट’पर्यंत चढतो. औषध देऊन किंवा मीठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवूनदेखील हा ताप उतरत नाही. ज्या मुलांना आकडीची सवय आहे, अशा मुलांना या तापामध्ये आकडी येण्याची शक्यता असते. ही अवस्था साधारणत: एक ते चार तास राहते.



तिसरी अवस्था (स्टेज ऑफ स्वेटिंग)


या अवस्थेत प्रचंड घाम येऊन सर्व अंथरुण ओले होते. ही अवस्था दोन ते तीन तास राहते व त्यानंतर रुग्णास बरे वाटू लागते. मुले तर व्यवस्थित खेळू लागतात. हा प्रकार साधारणत: ४८  तासांनंतर पुन्हा उद्भवतो. वरील तीन अवस्था रुग्णामध्ये आढळल्यास निदान करणे सोपे होते. मात्र, प्रत्येक रुग्णामध्ये पुस्तकात दिल्याप्रमाणे मलेरियाची लक्षणे दिसत नाहीत व निदान करणे कठीण होऊन जाते. काही रुग्णांमध्ये तापाबरोबर उलट्या, जुलाब, खोकला, दम लागणे, शुद्ध हरपणे इत्यादी लक्षणे दिसतात. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जुलै ते नोव्हेंबरमध्ये येणारा ताप हा मलेरियाचा असू शकेल का, ही शक्यता डॉक्टरांना नेहमी ध्यानात ठेवावी लागते.



प्रयोगशालेय चाचणी




रक्तामध्ये मलेरियाच्या कृमी आढळल्यास या आजाराचे निदान पक्के होते. या कृमींचे मुख्यत्वे चार प्रकार आहेत. 'P.vivax', 'P.falciparum', 'P.ovale', 'P.malariae.'’ यातील पहिले दोन प्रकार प्रामुख्याने भारतात आढळतात. ‘फालसीपॅरम’ (Falciparum) मलेरियावर वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. रक्तामध्ये कृमी दिसल्यास मलेरियाचे निदान पक्के होते. परंतु, कृमी न दिसल्यास रुग्णास मलेरिया झाला नाही असे खात्रीने सांगता येत नाही. अशा वेळेस रुग्णामध्ये दिसणार्‍या लक्षणांवरुन निदान केले जाते. यकृतास व प्लीहेस आलेल्या सूजेवरुन हे निदान केले जाते.


उपचार



‘क्लोरोक्वीन’ हे मलेरियावर परिणामकारक औषध आहे. मात्र, हे औषध योग्य वेळेस व योग्य प्रमाणात दिले गेले पाहिजे. रुग्णास सुरुवातीस ‘क्लोरोक्वीन’च्या २५० मि.ग्रॅमच्या चार गोळ्या दिल्या जातात. सहा तासांनी पुन्हा दोन गोळ्या दिल्या जातात. दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी प्रत्येक दोन गोळ्या दिल्या जातात. प्रौढ माणसांमध्ये असा हा दहा गोळ्यांचा कोर्स दिला जातो. लहान मुलांमध्ये मुलांचे वजन लक्षात घेऊन हा डोस ठरविला जातो. रक्त चाचणीमध्ये ’झ.तर्ळींरु’ या मलेरियाचे निदान झाल्यास ‘प्रायमाक्विन’ ७.५ मि.ग्रॅमची एक गोळी सकाळ-संध्याकाळ अशी १४ दिवस दिली जाते. यामुळे मलेरिया पुन्हा पुन्हा उद्भवत नाही. काही मलेरियाच्या रुग्णांत शुद्ध हरपणे, दम लागणे, लघवी लालसर होणे, डोके प्रचंड प्रमाणात दुखणे इत्यादी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास रुग्णास रुग्णालयात भरती करुन पुढील उपचार करावे.‘क्लोरोक्विन’ हे औषध लागू पडत नसेल तर ‘क्विनिन’, ‘मेटाकेलफिन’, ‘डॉक्सीसायक्लिन’ व ‘फालसीगो’ ही औषधेदेखील सध्या भारतात उपलब्ध आहेत.ज्या व्यक्तींना मलेरिया पुन्हा पुन्हा होतो किंवा जे परदेशातून भारतात आले आहेत, अशा व्यक्तींना ‘क्लोरोक्विन’च्या गोळ्या आठवड्यास दोन गोळ्या याप्रमाणे आठ ते दहा आठवडे दिल्या जातात.



प्रतिबंधात्मक उपाय


मलेरियाच्या रुग्णावर तातडीने उपचार केल्यास रुग्ण तर बरा होतोच व त्याचबरोबर मलेरियाचा इतर व्यक्तींमध्ये होणारा प्रसारदेखील काही प्रमाणात टाळला जातो.प्रतिबंधात्मक उपायांचा विचार करताना रुग्णाच्या उपचाराबरोबर डासांच्या प्रतिबंधावरदेखील लक्ष दिले जाते.डासांपासून संरक्षण खालील प्रकारे केले जाते.


१) पावसाळ्यात घराभोवती डबके साचले असल्यास, पाणी तुंबले असल्यास त्याचा त्वरित निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी. गटारे तुंबलेली असल्यास त्यातील कचरा साफ करून पाण्यामध्ये कीटकनाशके टाकावी. वापरात नसलेल्या पाण्याच्या टाक्या, हौद यात पावसाळ्यात पाणी साठून राहते व यातूनच मलेरियाची साथ फोफावू शकते.


२) घरांमध्ये ‘डीडीटी’ किंवा बाजारात मिळणार्‍या ‘फ्लिट’, ‘हिट स्प्रे’ यांची फवारणी करावी.


३) ‘म्युनिसिपल कॉर्पोरेशन’तर्फे धुराच्या औषधाची फवारणी आपल्या परिसरात करुन घेणे.


वरील उपायांमुळे डासांपासून चांगल्या प्रकारे संरक्षण मिळू शकेल. याशिवाय मच्छरदाणी, कासवछाप अगरबत्ती, धूप, ‘गुडनाईट कॉईल’ आणि ‘लिक्विडेटर’ हेदेखील काही प्रमाणात डासांपासून संरक्षण देतात.
मलेरियाची लस लवकरच उपलब्ध होत आहे, या पार्श्वभूमीवर काही गोष्टींचा आढावा घेऊया.


भारतातील मलेरिया


२००७ साली भारतात १ कोटी, ५० लाख मलेरियाचे रुग्ण आढळले, तर २० हजार रुग्णांचा त्यामुळे मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये २० लाख लोकांना मलेरिया झाला, तर एक हजार मृत्युमुखी पडले. २०१८ मध्ये ४ लाख, २९ हजार लोकांना मलेरिया झाला, तर ९६ मृत्युमुखी पडले. या आकडेवारीवर नजर टाकल्यास मलेरियाच्या संख्येत घट होताना दिसते. २०१४ पासून ‘राष्ट्रीय स्वच्छता अभियान’ राबविण्यात येत आहे. घरोघरी शौचालय, स्वच्छ ग्राम मोहीम या योजनांमुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन मलेरियाचे प्रमाण कमी झाले व मृत्युदरातही घट झाली आहे. आजही जागतिक मलेरिया रुग्णांच्या संख्येतील भारताचा वाटा तीन टक्के आहे. भारताची लोकसंख्या ही जागतिक लोकसंख्येच्या सुमारे १८ टक्के आहे. ते बघता मलेरियाच्या रुग्णात होणारी घट उत्साहवर्धक आहे. नव्या लसीमुळे रुग्णांचे प्रमाण आणखी घटणार आहे.


महाराष्ट्रातील मलेरिया


२०१४ मध्ये महाराष्ट्रात ५३ हजार रुग्ण होते व ७८ जणांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्ये ८,९०० जणांना मलेरिया झाला व फक्त सात जणांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये ही आकडेवारी वाढून १३ हजारांच्या घरात गेली व मृत्यूचे प्रमाण १२ होते. या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष मलेरिया होणार्‍यांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. याला अनेक कारणे आहेत. मलेरियाच्या चाचणीत रक्ताचा नमुना ‘स्लाईड’वर घेऊन तपासला जातो. या तपासणीत रक्तामध्ये मलेरियाचे कृमी आढळल्यास ‘पॉझिटिव्ह’ रिपोर्ट दिला जातो. थंडी भरून ताप आलेल्या प्रत्येक रुग्णाची रक्त तपासणी केल्यास ‘पॉझिटिव्ह’ रिपोर्ट येण्याची शक्यता दहा टक्केदेखील नसते. याचा अर्थ इतर रुग्णांना मलेरिया नव्हता, असा काढता येत नाही. त्या रक्त नमुन्यात मलेरियाच्या कृमी आढळल्या नाही, असे त्याचे अनुमान होते. बरेचशे डॉक्टर अशा तापाच्या रुग्णांवर ‘क्लोरोक्वीन’च्या गोळ्या देऊन अनुभवजन्य उपचार (इम्पिरीकल ट्रिटमेंट ) करतात. मलेरियाचा ‘पॉझिटिव्ह’ रिपोर्ट असणार्‍याच रुग्णांना फक्त मलेरियाचे उपचार दिले, तर या तापाच्या रुग्णांमध्ये उपद्रव निर्माण होण्याचे व हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे प्रमाण वाढू शकते.



मुंबईत गेले काही वर्षे स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या कारकिर्दीत रस्त्यावरील कचराकुंड्या व त्याभोवती जमा होणारा प्रचंड कचरा हटविण्यात आला. कचरा प्रत्येक सोसायटीत जमा होऊन तो कचरा गाडीत नियमित जाऊ लागला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अनेक विभागात अजून सुधारणेस वाव आहे. परंतु, मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुंबई आणखी स्वच्छ झाल्यास व भ्रष्ट मानसिकता कमी झाल्यास मलेरियाच्या रुग्णांची संख्या आणखी कमी होऊ शकेल.कोरोना महामारीनंतरच्या काळात साथीच्या इतर आजारांमध्ये उद्भवणार्‍या तापाचाही विचार करण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण व ‘फॅमिली डॉक्टर’ ही संस्था पुनर्जीवित करावी लागेल. ती काळाची गरज आहे.


या पार्श्वभूमीवर मलेरियाची लस उपलब्ध झाली आहे तिचे स्वागत करुया! साथीच्या आजारांपासून देव माझ्या वसुंधरेचे रक्षण करो!