काश्मीर : दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2021   
Total Views |

kashmir_1  H x
 
काश्मिरी हिंदूंना आपल्या मायभूमीत परतण्यायोग्य पोषक वातावरण तयार होत असल्याचे या दहशतवाद्यांना सहन झालेले नाही. मुस्लिमेतर समाजामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण तयार करण्याच्या हेतूने खोऱ्यामध्ये दहशतवाद माजविला जात आहे. पण, दहशतवाद्यांना घाबरणारे काश्मिरी हिंदू नाहीत, हे माखनलाल बिंदरू यांच्या कन्येने दाखवून दिले आहे!
 
जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ निकालात काढल्यानंतर आणि त्या राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आल्यानंतर तेथील परिस्थिती सुधारू लागली होती. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांचा बिमोड केला जात होता. काश्मीर खोऱ्यातील ज्या हिंदूंना १९९०मध्ये दहशतवाद्यांनी त्यांच्या मातृभूमीतून हुसकावून लावले होते, असे विस्थापित हिंदू नागरिक पुन्हा परत येण्यास उत्सुक असतानाच दहशतवाद्यांनी तेथे पुन्हा डोके वर काढले आहे. १९९०मध्ये ज्याप्रमाणे केवळ हिंदू समाजाच्या लोकांना जिहादी दहशतवाद्यांनी बंदुकीच्या बळावर काश्मीर सोडण्यास भाग पाडले होते, तसे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटनांकडून तेथे केला जात आहे. या सर्व दहशतवादास पाकिस्तानची फूस आहे हे काही सांगायलाच नको! अगदी अलीकडे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यास भारताने तेवढेच प्रभावी प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानची बोलती बंद केली होती. असे असले तरी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मदत केली जात आहेच. गेल्या ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर तर तालिबान्यांच्या मदतीने काश्मीरमध्ये हवे ते घडविता येईल, अशा मस्तीत दहशतवादी आहेत! दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील हिंदूंना, शीख समाजाच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे ठरविले असल्याचे अलीकडे ज्या घटना घडल्या आहेत, त्यावरून दिसून येत आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे पाहून सीमेपलीकडून दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या, हिंदूंच्या हत्या करण्याच्या ‘सूचना’ मिळत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडे काश्मीर खोऱ्यामध्ये ज्या हत्या घडल्या त्यावरून हेच दिसून येत आहे.
 
 
 
काही दिवसांपूर्वी श्रीनगरमधील एक प्रसिद्ध औषधविक्रेते माखनलाल बिंदरू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. १९९०मध्ये दहशतवाद्यांनी ज्यावेळी हिंदू समाजाविरुद्ध मोहीम उघडली होती, त्यावेळी त्यांच्या धमक्यांना भीक न घालता माखनलाल बिंदरू हे ठामपणे श्रीनगरमध्ये राहिले होते.पण, अखेर मुस्लीम दहशतवाद्यांनी त्यांना आता लक्ष्य केले. काश्मिरी हिंदूंना आपल्या मायभूमीत परतण्यायोग्य पोषक वातावरण तयार होत असल्याचे या दहशतवाद्यांना सहन झालेले नाही. मुस्लिमेतर समाजामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण तयार करण्याच्या हेतूने खोऱ्यामध्ये दहशतवाद माजविला जात आहे. पण, दहशतवाद्यांना घाबरणारे काश्मिरी हिंदू नाहीत, हे माखनलाल बिंदरू यांच्या कन्येने दाखवून दिले आहे! त्या नीडर मुलीने दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध तर केलाच; पण त्याचवेळी त्यांना खुल्या चर्चेचे आव्हानही दिले. आपले वडील दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडलेले असताना ते दु:ख पचवून त्या वीरांगनेने भ्याड दहशतवाद्यांना चर्चेचे खुले आव्हान दिले. एवढे साहस दाखविणाऱ्या त्या मुलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
 
 
 
पण, केवळ माखनलाल बिंदरू यांची हत्या करून दहशतवादी थांबले नाहीत. बिंदरू यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची गोळ्या घालून हत्या केली. श्रीनगरमधील ईदगाह परिसरातील शाळेमध्ये घुसून दहशतवाद्यांनी त्या शाळेच्या प्रिन्सिपॉल सुपिंदर कौर आणि शिक्षक दीपकचंद या दोघांची हत्या केली. या दोघांची हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी ओळखपत्रे तपासली आणि ते दोघे मुस्लिमेतर असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. आता या हत्याकांडाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. काश्मीर खोऱ्यात काश्मिरी हिंदू पुन्हा परतू नयेत, या हेतूने शेजारच्या देशाच्या इशाऱ्यावर हा सर्व दहशतवाद सुरू आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये झालेल्या या हत्येनंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी छापे मारून ५००हून अधिक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दगडफेक करणारे, तसेच विविध संघटनांशी संबंधित तरुणांचा समावेश आहे.
 
 
 
काश्मीर खोऱ्यामध्ये जी राजकीय प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामध्ये व्यत्यय आणण्यासाठी हा सर्व हिंसाचार ठरवून केला जात आहे. काश्मीरमध्ये घटनेच्या ‘कलम ७३’मधील तरतुदींचा वापर करून लोकशाहीची पाळेमुळे रुजविण्याचा यशस्वी प्रयत्न प्रशासनाने केला. जिल्हा विकास परिषदांच्या आणि पंचायतींच्या निवडणुका यशस्वीपणे संपन्न झाल्या. त्यामध्ये विविध पक्षांनी सहभाग घेतला. पण, शेजारच्या पाकिस्तानला काश्मीरमध्ये लोकशाहीची पाळेमुळे रुजली जावीत, असे वाटत नाही. त्या देशाला काश्मीरमध्ये ‘शरियत’ कायदा अस्तित्वात यायला हवा, असे वाटते. पण, पाकिस्तानचे हे स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही, हे त्या देशाच्या एव्हाना लक्षात आले असेल! काश्मीरसाठीचे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ निकालात काढल्यानंतर तेथील राजकीय हत्यांचे सत्र थांबले नाही. ऑगस्ट २०१९मध्ये विशेषाधिकार देणारी ही कलमे मोडीत काढल्यानंतर काश्मीरमध्ये ४० राजकीय हत्या झाल्या. या ४० जणांपैकी ३० जण हे भारतीय जनता पक्ष वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. तसे पाहिल्यास जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हत्यांना प्रारंभ झाला तो १९८९मध्ये. त्या साली भाजपनेते टी. एल. तपिलू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तेव्हापासून सुरू झालेले हे हत्यासत्र पुढील काळात सुरूच राहिले. १९८९पासून भारतसमर्थक असलेल्या सुमारे पाच हजार राजकीय कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. काहींच्या मते हा आकडा सात हजार आहे.
 
 
 
काश्मीरसाठीची विशेष कलमे रद्द करण्यात आल्यानंतर खोऱ्यातील परिस्थिती सुधारू लागली होती. असे असले तरी पाकिस्तानच्या जीवावर उड्या मारणारे फुटीरतावादी नेते अधूनमधून डरकाळ्या फोडत आहेत. काश्मीरला विशेष अधिकार देणारी कलमे पुन्हा अस्तित्वात येईपर्यंत स्वस्थ न बसण्याचा निर्धार फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अन्य ‘गुपकार’ नेते व्यक्त करीत आहेत. पण, आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही, हे या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे. काश्मीरला जे विशेषाधिकार देण्यात आले होते, ते पुन्हा कधीच त्या राज्यास लागू होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे सर्व फुटीरतावाद्यांनी लक्षात घ्यायला हवे! त्यामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये मुस्लिमेतरांच्या हत्या करून काही साधणार नाही, हे दहशतवाद्यांनी आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या नेते आणि संघटनांनी पक्के लक्षात ठेवायला हवे. भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानने तालिबान्यांची वा चीनची मदत घेतली, तरी त्या देशाच्या हाती काही लागणार नाही. काही आगळीक केल्यास जबर किंमत मोजावी लागेल. काश्मिरी हिंदू पुन्हा आपल्या मायभूमीत येऊ नयेत, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून केवळ हिंदूंच्या हत्या करण्याचे तंत्र दहशतवाद्यांनी अवलंबिले आहे. पण, दहशतवाद्यांचे असे प्रयत्न, मनसुबे, इरादे कधीच यशस्वी होणार नाहीत!
 
 
@@AUTHORINFO_V1@@