ठाणे : महाराष्ट्र बंद करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी ठाण्यात पोलिसांसमोर रॅली व गर्दी जमवुन चक्क धुमाकुळ घातल्याचे दिसुन आले. जबरदस्तीने दुकाने आस्थापने तसेच रिक्षा बंद करण्याचे प्रयत्न शहरात सुरु होते. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास शिवसैनिकानी रिक्षाचालकांना दमदाटी तसेच मारहाण केल्याचे प्रकार घडले.
विशेष म्हणजे, या बे'बंद'शाहीत ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम यांचाही सहभाग होता. रिक्षा वाहतुक बंद करण्यासाठी पवन कदम हे काही शिवसैनिकासोबत रिक्षा चालकांवर जोर जबरदस्ती करत असतानाचे व्हीडीओ चित्रण व्हायरल झाल्याने शिवसेनेच्या या बे'बंद'शाहीवर टिका होत आहे. तर यावर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ते उपमहापौरांचे पती नसल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले.
महापौर नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे की, "महाराष्ट्र बंदचा फायदा उचलत काही रिक्षाचालक ग्राहकांकडून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, असा प्रकार कुठे झाला असेल तर मी त्याची चौकशी करेल. या प्रकरणी मी दिलगिरी व्यक्त करण्यासही तयार आहे. तसेच, यामध्ये या व्हिडियोमधील मारहाण करणारे उपमहापौरांचे पती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता यावरून ठाण्यामध्ये शिवसेनेवर टीका होताना दिसत आहे.