दक्षिण कोकणाची खास ओळख असलेल्या जांभा खडकांनीयुक्त पठारांना स्थानिक भाषेत ‘सडा’ या नावाने ओळखले जाते. या सड्यांवर आढळणार्या प्रागैतिहासिक काळाचे साक्ष देणार्या कातळ खोद चित्रांचे म्हणजेच कातळ शिल्पांच्या संवर्धनाचे काम ‘निसर्गयात्री’ या संस्थेकडून सुरू आहे. या संस्थेकडून निरनिराळ्या आकाराच्या कातळशिल्पांचा शोध सुरू असून, अशा एका कातळशिल्पाच्या शोधाची ही कथा....
सुधीर (भाई) रिसबुड - कोणे एके काळी रात्रीच्या वेळेत दरोडेखोरांनी गावात दरोडा घातला. गावातील देवीचे दागिने घेऊन पोबारा केला. हे दरोडेखोर गावाच्या बाहेर सड्यावर आल्यावर त्यांना पुढे जायचे कळेना. कोणीतरी अडवून ठेवल्यासारखी त्यांची परिस्थिती झाली. इकडे गावातील कोणा एका व्यक्तीच्या स्वप्नात देवी आली आणि दरोडेखोरांनी दागिने पळवून नेले आहेत आणि ते गावच्या सड्यावर अडले आहेत, असे सांगितले. त्या माणसाने गाव गोळा केला आणि सर्व गावकरी दरोडेखोरांच्या मागावर बाहेर पडले. देवीने सांगितल्याप्रमाणे गावकर्यांना सड्यावर चोर आढळून आले. गावकर्यांनी त्यांच्याकडून सर्व दागिने हस्तगत केले आणि चांगला चोप देऊन गावाच्या बाहेर हाकलून दिले. या चोरांनी संभ्रमावस्थेत निर्माण केलेल्या खुणा, अशी आख्यायिका रत्नागिरी जिल्ह्यातील देऊड गावातील सड्यावर असलेल्या कातळ खोद चित्ररचनांविषयी आहे.
देऊड गावातील ही आख्यायिका शिल्लक होती. मात्र, चित्ररचना हरविल्या होत्या. चवे देऊडच्या सड्यावर चित्ररचना असल्या पाहिजेत. या आमच्या अंदाजाला चवे गावचे रहिवासी विलास काळे (वय ७० वर्ष) यांनी ही आख्यायिका सांगून दुजोरा दिला आणि सुरू झाला या चित्ररचनांचा शोधप्रवास.
बरीच पायपीट करूनदेखील चित्ररचनांचे अस्तित्व काही नजरेत पडत नव्हते. तसेही या सड्यावर निर्माण केलेले रस्ते, जागामालकांनी आपल्या जागांभोवती घातलेले गडगे, चिरा खाणी यामुळे सड्याचे रूप नाही म्हटले तरी बदलले होते. काळे आजोबांच्या आठवणीतल्या अनेक बाबी कालौघात नष्ट झाल्या होत्या. परत, “कधीतरी येऊ शोधायला” असे म्हणत, एका गडग्यावर पाणी पिण्यासाठी विसावलो. गप्पा मारता मारता सहजच नजर गडग्याच्या पलीकडील भागावर गेली आणि आमच्या कातळ खोद चित्र ओळखण्यासाठी हळूहळू तयार झालेल्या नजरेला कातळावरील रेषांचे वेगळेपण जाणवले. “आजोबा हेच का ते ठिकाण?” आमच्या या प्रश्नाला आजोबांनी तरुणाला लाजवेल अशा वेगाने गडगा ओलांडून कृतीतून उत्तर दिले. हाच तो भोपळीणीचा वेल. येथील चित्रांची ही अजून एक आठवणीतील ओळख. चित्ररचना ठिकाणावर शिक्कामोर्तब झाले.
नेहमीप्रमाणे सर्व काळजी घेत साफसफाईला सुरुवात झाली. अर्ध्या-पाऊण दिवसाच्या मेहनतीनंतर तब्बल २५ चित्ररचनांचा समूह समोर आला. हरीण, माकड, तरस, मोर, उदमांजर प्रजातीतील प्राणी, उडती खारसदृश प्राणी या सर्व रचना वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्या जुळत्या. सोबत काही लहान, तर काही भले थोरले पावलांचे ठसे असाव्यात अशा रचना. या ठिकाणी असलेली आणि एक रचना आम्हाला वेड लावणारी. तोपर्यंतच्या आमच्या कातळशिल्पबाबतच्या विचारांना, तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केलेल्या काळनिश्चितीबाबतच्या अंदाजाला आणि अभ्यासाला आणि काळे आजोबांसारख्या गावकर्यांच्या समजाला संपूर्णपणे वेगळे वळण देणारी. ही रचना भल्या थोरल्या एक शिंगी गेंड्याची. १८ फूट लांब आणि नऊ फूट रुंद अशी सुस्पष्ट रचना. कोकणातील कातळशिल्प रचनांचा कालावधी निश्चितीसाठी ही रचना मार्गदर्शन करणारी आहे, याची मनात खूणगाठ मांडत उर्वरित दस्तावेजीकरणाच्या कामाला लागलो, तेवढ्यात तिथे अजून एक व्यक्ती येऊन उभी राहिली ती म्हणजे, या जागेचे जागामालक प्रसाद आपटे. पहिल्याच भेटीत आमचे सूर जमले आणि सुरू झाला हा अनमोल वारसा संरक्षण संवर्धनाचा प्रवास.
हाती घेतलेल्या शोधकार्यातून एकीकडे नवनवीन ठिकाणांची भर पडत होती, तर दुसरीकडे ही ठिकाणे संरक्षण संवर्धनसाठी शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू झाला होता. प्रशासनातील काही अधिकार्यांचे अप्रतिम सहकार्य, पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांची साथ मिळत होती. तर शासनाकडून मात्र शून्य प्रतिसाद मिळला होता. प्रसाद आपटे यांसारख्या जागामालकांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला आणि पुढे आलेल्या वारसा स्थळांना आणि आमच्या अन्य कामांना न्याय द्यायचा झाल्यास स्वतःच पुढाकार घ्यावा या विचारांनी उचल खाल्ली. हातात निधी नव्हताच, तरी धाडस करायचे ठरवले. अमित शेडगे (प्रांताधिकारी रत्नागिरी, माजी) यांनी पुढाकार घेऊन एका बँकेकडून ‘सीएसआर’मधून काही निधी मिळवून दिला. कामाच्या एकंदर आवाक्याच्या तुलनेत उपलब्ध झालेला निधी खूपच अपूर्ण होता. पण, कामाला सुरुवात केली.
मकरंद केसरकर (वास्तुविशारद), चवे गावातील दीपक गावणकर, संतोष गावणकर यांनी त्यांच्या सहकार्यांसह आमच्या हाकेला साद दिली आणि प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी उचलली. जवळच्या चिरा खाण व्यावसायिकाने मदतीचा हात पुढे केला आणि कामाची मुहूर्तमेढ रचली. कामाची जशी प्रगती होत होती तसा निधीही लागत होता. एका टप्प्यावर हातातील निधी संपत आला, आता काय करायचे? असा प्रश्न आवासून उभा राहिला. त्याच वेळी रत्नागिरीमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व दीपक गद्रे यांनी स्वतःहून आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि आमच्यातला उत्साह टिकवून ठेवला. त्याच वेळी गावणकर आणि त्यांच्या सहकार्यांच्याही आमची अडचण लक्षात आली आणि “तुम्ही आहात आमचा मोबदला कुठे जाणार नाही, आज निधी नाही म्हणून काम थांबणार नाही, तुम्ही काळजी करू नका.” त्यांनी आमच्यावर दाखविलेल्या या विश्वासासाठी आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.
एखाद्या वारसा ठेव्याचे संरक्षण-संवर्धन म्हणजे नुसते बांधकाम नव्हे, तर आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्या वारसा ठेव्याबाबत अभिमान वाटला पाहिजे, ती माणसे त्याभोवती जोडली गेली पाहिजेत. गावणकर आणि त्यांच्या सहकार्यांनी दाखवलेल्या कृतीतून याची जाणीव झाली आणि आमचा प्रवास योग्य दिशेने चालू आहे याची खात्री पटली. आज कामाचा मोठा टप्पा संपला आहे. कोरोना परिस्थिती आणि निधीची कमतरता यामुळे पुढील कामाची प्रगती थोडी मंदावली आहे. पण, गावातील कलाकार, महिला बचतगट यांच्यामार्फत भेट वस्तू आणि विविध बाबींची निर्मिती यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झाली आहे. लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. येथे माहिती देण्यासाठी गावातील मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा.
कोकणातील कातळ खोद चित्ररचना ठिकाणांना ‘युनेस्को जागतिक वारसा स्थळ’ म्हणून नामांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज तारखेस रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून ७२ गावांतून १,६०० पेक्षा अधिक कातळ खोद चित्ररचना पुढे आणण्यास ‘निसर्गयात्री’ संस्थेच्या सदस्यांना यश आले आहे. त्याचबरोबर त्यांचे संरक्षण-संवर्धन व्हावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. ‘कातळशिल्प’ या विषयासोबत कासव संवर्धन, जैवविविधता नोंद, जनजागृती उपक्रम, कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत पर्यटन विकास अशा विषयांवरदेखील संस्थेचे मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. अर्थात, ही कार्य सिद्धीस नेण्यासाठी आर्थिक मदतीस आपल्या सर्वतोपरी सहकार्याची अपेक्षा आहे.
हत्तीचाही शोध !
प्रागैतिहासिक कालखंडापासून ‘हत्ती’ आणि मानव यांचे नाते तत्कालीन मानवाच्या कलाकृतींमधून दिसून येते. कोकणात आढळून येत असलेल्या अश्मयुगीन कातळ खोद चित्ररचनांमधूनही हत्तीचे चित्रण ठिकठिकाणी केल्याचे आढळून आले आहे. खोद चित्ररचनांमधील हत्तीचे अवाढव्य आकार लक्षवेधी आहेत. सध्याच्या कालखंडात कोकणातील रत्नागिरी आणि उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीचे अस्तित्व दिसून येत नाही. मात्र, प्रागैतिहासिक कालखंडात या प्रदेशातदेखील हत्तीचे अस्तित्व होते, याचे कातळ खोद चित्ररूपी पुरावे शोधून जगासमोर आणायचे काम संस्था सदस्य गेली काही वर्षे सातत्याने करीत आहेत. यांच्या शोधकार्यातून कोकणात एक-दोन ठिकाणी नव्हे, तब्बल १५ पेक्षा अधिक ठिकाणी हत्तीच्या अवाढव्य खोद चित्ररचना आढळून आल्या आहेत. प्रत्यक्षातील हत्तीच्या आकाराएवढ्या या खोद चित्ररचना लक्षवेधक आहेत. एके ठिकाणी आढळून आलेली हत्तीची खोद चित्ररचना अतिभव्य सदरात मोडणारी आहे. प्रागैतिहासिक कला प्रकारातील आशियातील ही सर्वात मोठी खोद चित्ररचना आहे. या खोद चित्ररचनांच्या शोधकार्यासोबत त्यांचे संरक्षण संवर्धन व्हावे म्हणून संस्था स्वखर्चाने सर्वतोपरी काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. उक्षी गाव सड्यावर असलेल्या हत्तीच्या खोद चित्ररचनेला स्वखर्चाने आणि लोकसहभागातून संरक्षण हा या प्रयत्नाचा एक भाग.
(लेखक स्वतः कोकणातील कातळ खोद शिल्प शोधकर्ते आहेत. त्यांनी धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या सोबत ७२ गावांतून १,५०० पेक्षा अधिक कातळ खोद शिल्परचनांचा शोध घेतला आहे. त्याचबरोबर ‘निसर्गयात्री’ संस्थेच्या माध्यमातून दोन ठिकाणी पर्यटन प्रकल्प उभारण्याचे कामही हाती घेतले आहे.)