मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये बंदची हाक दिली. मात्र, या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच, अनेक व्यापारी संघटनांनी याला विरोधदेखील केला. तर, काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यासाठी जबरदस्ती केल्याचे चित्रदेखील समोर आले. यावरून भाजपप्रमाणेच मनसेनेदेखील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. 'आता बंद पुकारणारे महाविकास आघाडीचे खासदार,शेतकरी विरोधी विधेयक मंजूर होत असताना शेपूट घालून का बसले होते?' असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र बंदवर टीका करताना म्हंटले आहे की, "लखीमपूरमध्ये घडलेली घटना दुर्दैवीच असून त्याचा निषेध झालाच पाहिजे. पण, ज्या कृषी कायद्यांमुळे हे सगळे घडत आहे, ते कृषी कायदे होत असताना संसदेत महाविकास आघाडीचे खासदार संसदेत शेपूट घालून का बसले होते? शिवसेनेच्या खासदारांची थोबाडे बंद का होती? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित का होते?" असे प्रश्न सत्ताधारी महाविकास आघाडीला विचारले आहेत.
"लॉकडाऊनमुळे आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आत्ता कुठे हळूहळू ते सावरू लागले आहेत. सणासुदीत थोडाफार व्यापार होतो, नेमका त्याच वेळी हा सरकारपुरस्कृत बंद केला जात आहे. दादरसारख्या भागांमध्ये स्वत: पोलीस फिरून दुकाने बंद करत आहेत. ही कुठली पद्धत आणि हे कुठले राज्य?" असे म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.