तिघाडीतील तीन पक्षांची महिषासुरी चाल : आशिष शेलार

महाराष्ट्र बंदवरून भाजपची महाविकास आघाडी सरकारवर टीका

    11-Oct-2021
Total Views |

Ashish Shelar_1 &nbs
मुंबई : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील लखीमपुर येथे हिंसाचार झाला. मात्र, आता या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र राज्यात बंदची हाक दिली. सत्ताधारी पक्षानेच बंद पुकारल्याने विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. 'ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित"बंदसम्राटांचा" पुन्हा आज इतिहास आठवा,' असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
 
 
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे की, "ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले, त्या तथाकथित 'बंदसम्राटां'चा पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढेच नव्हे तर, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरले. बंद आणि विरोध यांचा धंदा, गोळा होतो त्यावरच चंदा!" असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
 
 
पुढे त्यांनी म्ह्नातले की, "आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद, ही तर तिघाडीतील तीन पक्षांची 'महिषासुरी' चाल आहे. आई दुर्गामाते जनतेला दे 'बळ'! उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा 'खेळ'!" असे म्हणत म्हणत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील महाविकास आघाडीने लखीमपुर घटनेला विरोध म्हणून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.