वंचित मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी देणारी दुर्गा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2021   
Total Views |

Minal Sohoni_1  
 
वंचित मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी देणाऱ्या मीनल सोहोनी यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेखमालेतील पाचवा लेख...
 
 
मीनल सोहोनी यांचे बालपण ठाण्यात गेले. त्यांचे शालेय शिक्षण शिवसमर्थ शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. मराठी विषयात त्यांनी पदवी प्राप्त केली. सध्या त्या ठाण्यात वास्तव्यास असून, कल्याणमधील अग्रवाल महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मीनल या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ‘समता आंदोलन संघटने’शी जोडल्या गेल्या. ही संस्था सफाई कामगारांचे शिकवणी वर्ग चालविणे तसेच वंचिताच्या शिक्षणप्रश्नावर काम करीत होती. या संस्थेच्या माध्यमातून १९८३ला त्यांनी हे काम करण्यास सुरुवात केली. सामाजिक कार्याचा श्रीगणेशा त्यांचा येथूनच झाला.
 
 
अग्रवाल महाविद्यालयाच्या बाजूलाच ‘आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड’ आहे. कचरावेचक मुलांचे आयुष्य सुधारण्यासाठी काहीतरी करावे, असा विचार त्यांच्या मनात आला. लगेचच त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे, हे त्यांच्या लक्षात आले. ‘अनुबंध’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी यासाठी पुढाकार घेतला. केवळ कचरावेचक मुलांच्या जीवनाला दिशा देण्यापुरते मर्यादित न राहता कुपोषित मुलांसाठीही त्यांनी काम केले.
 
 
मीनल यांचे काम आता पाणबुडी नगर, मुरबाड रस्त्यावरील पाडे, नांदकरपाडा, ‘डम्पिंग ग्राऊंड’, उंबर्डे या ठिकाणी काम सुरू आहे. चांगल्या शिक्षणाची संधी सर्वांना मिळत नाही, मग त्यांच्यापर्यंत शिक्षणाची संधी कशी पोहोचविता येईल, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. ‘डम्पिंग ग्राऊंड’वरील मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठीदेखील ‘अनुबंध’च्या माध्यमातून काळजी घेण्यात येते. केवळ शिक्षणाने या मुलांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यांच्या नोकरीचाही प्रश्न असतो. त्यांच्या नोकरीचा प्रश्न मिटावा, यासाठी त्यांना उद्योजकता विकास केंद्रात नेले जाते. या मुलांचा बाहेरच्या जगाशी संबंध यावा म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. पूर्वी न्यूनगंडाने समाजापासून दूर राहणारी मुले आता धीटपणे, आत्मविश्वासाने समाजप्रवाहात मिसळत आहेत. या मुलांमध्ये अभिनय कौशल्यही दिसून येत आहे. या मुलांनी सादर केलेल्या ‘जीना इसका नाम हैं, ‘प्लटफॉर्म’ या नाटकांना पारितोषिकेही मिळाली आहेत.
 
वंचित मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्याची, काम करण्याची संधी मिळावी, यासाठी बालग्राम उभारण्याचा त्यांचा मानस आहे. वंचित समूहातील मुले ही खरे तर स्वयंप्रेरित असतात. त्यांना फक्त एका आधाराची गरज असते. त्यासाठी टीम ‘अनुबंध’तर्फे विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. वंचित मुलांच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मीनल सोहोनी या खऱ्या अर्थाने समाजदुर्गा आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@