सामाजिक कार्याने झपाटलेले जगदीश पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2021   
Total Views |

Jagdish _1  H x
 
चारचौघांसारखे आपणही इंजिनिअरिंग करावे, असे त्यांना वाटत होते. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांचे स्वप्न भंगले आणि ते सामाजिक कार्याशी जोडले गेले. ‘सावली’ बेघर निवाराकेंद्राची जबाबदारी जगदीश पवार आज समर्थपणे पेलत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
 
 
 
जगदीश यांचा जन्म मुंबईतील नायर रुग्णालयात झाला. काही काळ ते चिंचपोकळी येथे राहायला होते. त्यानंतर ते विक्रोळी येथे वास्तव्यास आले. विक्रोळीतील उत्कर्ष विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. विकास रात्र महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी संपादन केली. मुलुंडला एका खासगी कार्यालयात त्यांनी १५ वर्षे नोकरी केली. माजी उपमुख्यमंत्री तिळपुळे यांच्याकडे दोन वर्षे काम केले. चाळीसगावचे आमदार वासुदेवराव चांगरे यांच्याकडे १५ वर्षे काम केले. ‘राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगा’वर सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांना चांगरे यांनी स्वत:ची ‘एनजीओ’ स्थापन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी ‘गुरुकृपा’ संस्थेची स्थापना कल्याणमध्ये केली आणि त्यांच्या सामाजिक सेवेचा श्रीगणेशा झाला. जगदीश यांनी १५० कार्यकर्त्यांना घेऊन हे काम सुरू केले.
 
 
 
संस्थेने सुरुवातीला २००६मध्ये ठाणे जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता अभियान राबविले. वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत साठेनगर नारपोली येथे ज्यांची कच्ची घरे होती, त्यांना पक्की घरे बांधून देण्याचे काम केले. ‘म्हाडा’च्या फंडातून हे काम करून देण्यात आले आहे. १०० नागरिकांना या माध्यमातून पक्की घरे मिळाली. छत्रपती शिवाजी रुग्णालयाला स्वयंसेवक पुरविण्याचे काम तीन वर्षे केले. वस्ती स्वच्छता अभियान कल्याण-डोंबिवली, ठाणे, वसई महानगरपालिका येथे ‘एमएमआरडीए’च्या फंडातून कडोंमपाच्या देखरेखीखाली दीड कोटींचे काम केले. २०११मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेने रात्रनिवारा केंद्र पांडुरंगवाडी येथे काम दिले. ते काम दहा वर्षांपासून सुरू आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात चार रात्रनिवारा केंद्रे संस्थेस चालविण्यास दिली आहेत.
 
 
 
नवी मुंबई महापालिकेने तीन वर्षे रात्रनिवारा केंद्र चालविण्याची जबाबदारी संस्थेला दिली. २०१९ला कडोंमपाने दीनदयाळ अंत्योदय योजनेचे संस्थेला काम दिले. ते काम अद्याप सुरू आहे. ‘कोविड-१९’ या कालावधीत कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सार्वजनिक शौचालयाचे सॅनिटायझेशन करण्याचे काम संस्थेकडे दिले असून, ते काम अद्याप सुरूच आहे. २०१९ रोजी बृहन्मुंबई मुलुंड येथे दोन बालवाड्या संस्थेस चालविण्यास दिल्या आहेत. त्या बालवाड्या संस्था अजून चालवित आहे. २०१० रोजी बृहन्मुंबई महापालिकेने दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत कांदिवली येथे निवारा केंद्र चालविण्याचे काम दिले आहे. कांदिवली येथील संस्थेचे काम पाहून पावसाळी निवारा केंद्रेही संस्थेकडे चालविण्यास दिली.
 
 
 
 
ही केंद्रे चार महिन्यांसाठी संस्थेकडे चालविण्यास दिली होती. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी, ठाणे, वसई-विरार, पुणे या सर्व महापालिकेतील क्षय रुग्णांचे संस्थेतर्फे छातीचे एक्स-रे काढण्यात आले. त्यांना पोषक आहार संस्थेने पुरविला. ‘माझगाव डॉक लिमिटेड’ यांनी पाच लाखांचा निधी पोषक आहारासाठी दिला होता. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’मार्फत ठाणे महानगरपालिका परिसरात क्षयरोगाची जनजागृती करण्यासाठी ३० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीचा वापर करून ठाणे महानगरपालिका परिसरात जनजागृती करण्यात आली. ‘स्माईल’ व ‘नास्कॉम फाऊंडेशन’ या शहरातील बेरोजगारांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी ‘स्क्रील डेव्हलपमेंट’चे प्रशिक्षण दिले होते. त्यामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण, ‘इंग्लिश स्पीकिंग’, ‘रिटेल मॅनेजमेंट’, ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’, ‘डीटीपी’ यांचा समावेश होता. सुशिक्षित बेरोजगार आणि विधवा महिलांना ‘स्कील डेव्हलपमेंट’चे प्रशिक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या कंपनींमध्ये काम मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. ‘गोवर्धन घी’ या कंपनीने संस्थेसाठी एज्युकेशन, मेडिकल, वृक्षारोपण आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येकी ४५ लाखांचा निधी दिला होता. त्यामध्ये त्यांनी विविध कार्यक्रम राबविले.
 
 
 
जगदीश यांचा संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रम उभा करण्याचा मानस आहे. सध्या ते जागेच्या शोधात आहेत. जागा मिळत नाही. ज्या ठिकाणी जागा मिळेल, त्या ठिकाणी ते वृद्धाश्रम उभारणार आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांना भरीव कामगिरी करण्याची इच्छा आहे. ‘गुरुकृपा विकास संस्थे’च्या माध्यमातून एक महाविद्यालय उभारण्याचा त्यांचा विचार आहे. कडोंमपाच्या ‘सावली’ निवारा केंद्रात सध्या ७८ नागरिक वास्तव्य करीत आहेत. त्यापैकी वृद्ध, दिव्यांगांचा खर्च महापालिका करते. पण, उर्वरित नागरिकांचा खर्च ‘गुरुकृपा विकास संस्थे’च्या माध्यमातून केला जातो. नाका कामगारही संस्थेत वास्तव्याला आहेत. त्यांना कोरोनाकाळात हाताला काम नाही, त्यामुळे त्यांची जबाबदारी ही संस्था सध्या घेत आहे. संस्थेला येणार्‍या निधीतून हा खर्च केला जातो. ‘गुरुकृपा विकास संस्थे’चे जगदीश पवार या सगळ्या जबाबदार्‍या समर्थपणे पेलत आहे. अशा या सामाजिक कार्यकर्त्याला दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.









@@AUTHORINFO_V1@@