हवामानबदलाचे जागतिक परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2021   
Total Views |

Flood _1  H x W




निसर्गाचे अधिकाधिक शोषण करण्याची आमची धोरणे आणि मानसिकतेने संपूर्ण मानवजातीला अशा टप्प्यावर आणले आहे, जिथे आपण सर्वांना निसर्ग आणि माणसाच्या आत्मीयतेचे समीकरण पुन्हा स्थापित करावे लागणार आहे.



 
हवामानबदलाचा सध्याचा बदलणारा दर मानवाला वेळीच सजग होण्यासाठी खुणावत आहे. पृथ्वीवरील ज्या भागात यापूर्वी दुष्काळ होता, अशा भागात आता पूर येत असल्याचे दिसून येत आहे. तर ज्या भागात एकेकाळी मुसळधार पाऊस पडत होता, ती क्षेत्रे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येते. या घटनांचा रशियाच्या याकुत्सक शहरातील परिस्थितीच्या माध्यमातून सहज अंदाज लावता येणे शक्य आहे. याकुत्सक रशियाच्या याकुटिया प्रदेशातील एक प्रसिद्ध शहर आहे,


 
 
जे बर्फाच्या पृष्ठभागावर बांधलेले एकमेव शहर असल्याचे मानले जाते. येथे एकेकाळी कमाल तापमान २० अंश सेल्सिअस असायचे. रशियातील यंदाच्या उन्हाळ्यात येथील तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. एखाद्या शहराच्या तापमानात एवढी वाढ होणे म्हणजे निसर्गचक्र बाधित होण्याचे द्योतक आहे. जगातील वैज्ञानिक पर्यावरणवादी जागतिक तापमानवाढीबाबतच्या धोक्यांबद्दल सातत्याने इशारा देत आहेत. परंतु, तथाकथित विकासाच्या चिंतेत, संपूर्ण मानवी सभ्यतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या तथ्यांकडेही जगाचे विशेषत: अमेरिकेसारख्या महासत्ता म्हणवून घेणार्‍या आणि जगाच्या नेतृत्वाचे धोरण अंगीकारलेल्या राष्ट्रांचे हेतूपुरस्सर जगाचे दुर्लक्ष होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
 
 
वारंवार समुद्रीवादळे, चक्रीवादळे, हिमनद्यांचा उद्रेक, सतत भूस्खलन, तीव्र उन्हाळा, तीव्र हिवाळा, वारंवार भूकंप आणि जगाच्या विविध भागांमध्ये जंगले जाळणे, हे सूचित करते की, हवामानाच्या स्वरूपात सातत्याने मोठा बदल होत आहे. मानवाने या बाबींकडे दुर्लक्ष करू नये. हेच रशियाच्या या उदाहरणावरून दिसून येते. दुसर्‍याच्या अंगणातील आगीचे आम्हाला काय करायचे आहे? असा विचार आता सोडून देणे, हेच मानवजातीच्या हिताचे असल्याचे याकुत्सकच्या या घटनेवरून दिसून येत आहे. जेव्हा जगाच्या कोणत्याही भागात मोठी पर्यावरणीय अडचण येते, तेव्हा ती संपूर्ण मानवी समुदायासाठी चिंतेची बाब असते.
 
 
सध्याच्या विकासातील काही चुकीच्या धोरणांमुळे आणि आपण स्वीकारलेल्या जीवनशैलीमुळे वातावरणात सतत विषारी वायू उत्सर्जित होत आहेत. ओझोनचा थर कमकुवत होण्याची चिंता जगाच्या डोक्यावर आजदेखील घोंघावत आहे. दुसरीकडे, वातावरणात एरोसोलचे वाढते प्रमाण पृथ्वीच्या जलचक्रावर विपरीत परिणाम करत आहे. एरोसोल ही वायूमध्ये घन कण किंवा थेंब मिसळण्याची स्थिती आहे आणि त्याच्या जास्त प्रमाणामुळे मान्सूनचे वर्तनदेखील अनियमित झाले आहे. हवामानतज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, यावेळी मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत भारतात सक्रिय असेल. या वेळेपर्यंत मान्सूनच्या हालचालीमुळे अचानक खूप थंड हिवाळ्याचे दिवस येण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. जेव्हा-जेव्हा मान्सून या अनियमित होतो. तेव्हा भारतीय जीवनमानावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. यापूर्वी, ‘नासा’च्या अहवालात, २०२० हे अलीकडील इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष म्हणून वर्णन केले गेले होते.
 
 
त्याआधीही एप्रिल २०१७मध्ये, ‘क्लायमेट सेंटर’ नावाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेने एका अहवालात म्हटले होते की, मागील ६२८ महिन्यांपैकी एकही पूर्वीच्या वर्षाप्रमाणे थंड नव्हते. म्हणजेच, ६२८ महिने पृथ्वीभोवतीचे तापमान वाढतच गेले. जर तापमानवाढीची परिस्थिती अशीच राहिली, तर २०५०पर्यंत पृथ्वीचा पृष्ठभाग किती गरम असेल, याचा अंदाज बांधता येईल. फिनलँडमध्ये, जुलै, २०२१ हा महिना जून, १९६१नंतर सर्वात उष्ण होता, या देशातील कोवोला अंजला या शहरात ३१ दिवस सतत उष्णता होती. यावर्षी ९ जुलै रोजी कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये ५४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर तुलनेने थंड असलेल्या लास वेगास शहरात तापमानाने २७ अंशांचा टप्पा ओलांडला.
 
 
दुसरीकडे, ब्राझीलच्या काही भागांत पावसाअभावी दुष्काळी आणीबाणी जाहीर करावी लागली.चीन आणि बांगलादेशमध्ये जोरदार पाऊस झाला. जुलैच्या पावसाने जर्मनीतील शतकांचे विक्रम मोडले. जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पेटेरी तालास यांनी हे जगभरातील दृश्य पाहून सांगितले की, जगातील कोणताही देश हवामानबदलाच्या विनाशकारी परिणामांपासून वाचलेला दिसत नाही. याकुत्सकमध्ये घडलेली घटना ही समस्त मानव जातीसाठी वॉर्निंग बेल आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.




@@AUTHORINFO_V1@@