डॉ. संदीप डाकवे यांचा १० हजार कलाकृती भेटीचा टप्पा पूर्ण

    01-Oct-2021
Total Views |

sandip _1  H x
दूरदर्शन ‘सह्याद्री’ वाहिनीवरील मुलाखतीच्या वेळी ‘विचारांच्या पलीकडले’ या विचारमंचावर निवेदक/अभिनेता रोहन गुजर यांना त्याचे रेखाचित्र देऊन १०  हजार कलाकृती प्रदान करण्याचा टप्पा डॉ. संदीप डाकवे यांनी पूर्ण केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत शिल्पकार राजेंद्र कुंभार, अभय वीर, विशाल डाकवे, सुनील सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, डॉ. संदीप डाकवे यांनी रोहन गुजर यांना ‘मनातलं’ हा चारोळी संग्रह भेट दिला.

तसेच कार्यक्रमाचे निर्माते डॉ. आलोक खोब्रागडे, राजेंद्र फरांदे यांनासुद्धा त्यांच्या नावातील अक्षरगणेशा भेट दिले.ठिपक्यातून रेखाटलेले अप्रतिम चित्र डॉ. डाकवे यांनी रोहन गुजर यांना दिले. या चित्राचे त्यांनी खूप कौतुक केले व डॉ. संदीप डाकवे यांच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील डॉ. संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती, सेलिब्रिटी यांना ’अक्षरगणेशा’, शब्दचित्रे, पेपटर कटिंग आर्ट, ठिपका चित्रे भेट दिली आहेत. हे करताना त्यांनी २०  पेक्षा जास्त कलात्मक उपक्रम राबवले आहेत. त्यामधून मिळालेला एक लाखांपेक्षा जास्त निधी त्यांनी गरजूंना दिला आहे.

याशिवाय ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून गरजूंना लाखोंचे साहित्य प्रदान केले आहे. डॉ. संदीप डाकवे यांनी २०  पेक्षा जास्त हस्तलिखिते तयार केली आहेत. त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये तीनदा, तर ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये एकदा झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाकडून त्यांना चार पुरस्कार, तर विविध संस्थांनी ५०  पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवले आहे.डॉ. डाकवे यांच्या उपक्रमांची दखल ‘खसखस’ वेबपेज, वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, दूरदर्शन इत्यादींनी घेतली आहे.डॉ. संदीप डाकवे यांची चार पुस्तके प्रकाशित झाली असून चार पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. याशिवाय ५०  पेक्षा जास्त पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांच्या संकल्पनेतून साकारली आहेत. तसेच स्पंदन प्रकाशनाच्या माध्यमातून पाचहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. डाकवे यांनी ‘पत्रमैत्री’चा छंददेखील जोपासला आहे.

डॉ.संदीप डाकवे यांच्याकडून सेलिब्रिटींना चित्रे भेट

रवींद्र बेर्डे, अशोक सराफ, अशोक शिंदे, संजय नार्वेकर, प्राजक्ता माळी, भरत जाधव, सयाजी शिंदे, डॉ. अमोल कोल्हे, स्पृहा जोशी, मकरंद अनासपुरे, डॉ. गिरीश ओक, वैभव मांगले, संजय खापरे, सुबोध भावे, जयराज नायर, ऐश्वर्या नारकर इ. सह अनेक सेलिब्रिटींना चित्रे भेट दिली आहेत.
 
दहा हजार कलाकृती भेट दिल्याबद्दल डॉ. संदीप डाकवे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.