पोकळ वासे ‘पडकी हवेली’ वाचविणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2021   
Total Views |

vicharvimarsh_1 &nbs


शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष आता ‘पडकी हवेली’ असेल, तर कन्हैयासारखे ‘पोकळ वासे’ या हवेलीला वाचवू शकत नाहीत. मात्र, हवेली आणखी चार वर्षांनी कोसळणार असेल, तर ती दोन वर्षांतच कशी कोसळेल, याची तजवीज मात्र  माजी कॉम्रेड करू शकतात.

देशात दीर्घकाळ सत्ता उपभोगणार्‍या पक्षाची अवस्था २०१४ पासून अतिशय दयनीय झाली आहेच. मात्र, त्यानंतरही पक्षामध्ये बदल घडविण्याची त्यांची इच्छा नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतर गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थांनाचे विलीनीकरण घडवून आणले होते. मात्र, त्यानंतरही काही संस्थानिकांची मुजोरी संपली नव्हतीच. कारण, अद्याप आपणच राजे आहोत हे त्यांच्या डोक्यात अगदी पक्के बसले होते. मात्र, कालांतराने अशा सर्व राजेमंडळींना सत्य पचवावे लागले होते. सध्या तशीच काँग्रेसची आणि गांधी कुटुंबाची मनोवस्था झाली आहे. दीर्घकाळ देशात सत्ता उपभोगताना प्रामुख्याने गांधी कुटुंबाने स्वत:ला संस्थानिकांपेक्षा वेगळे कधी समजलेच नव्हते. मात्र, गांधी कुटुंबाचे हे संस्थान २०१४ साली खालसा झाले, त्यानंतर २०१९ साली त्यांचा ‘तनखा’ही बर्‍याच प्रमाणात बंद झाला. तरीदेखील पडक्या हवेलीतून सत्ता गाजवायचे स्वप्न काँग्रेस पाहत आहे. मात्र, पडक्या हवेलीची दुरुस्ती करण्याचे मात्र त्यांच्या काही मनात येत नाही.काँग्रेस पक्षाची एक परंपरा म्हणजे जनाधार असलेल्या नेत्यांना गप्प बसवायचे आणि दरबारी नेत्यांच्या हाती कारभार द्यायचा. यामुळे एक साध्य होते, ते म्हणजे दरबारी नेते पक्षातील गांधी कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान वगैरे द्यायच्या भागनडीत कधीही पडत नाहीत. त्यामुळे आपल्या मर्जीतील नेत्यांच्या हाती सत्ता देऊन काँग्रेस नेतृत्व सत्तेची फळे चाखायला मोकळा असतो. मात्र, आता या दरबारी नेत्यांचीच कोंडी पक्षात व्हायला लागली आहे आणि यावेळी दरबारी नेत्यांनी थेट कुटुंबाविरोधातच मोर्चेबांधणी करून ‘जी -२३’ असा नवा सुभा उभा केला आहे. या सुभ्यामध्ये तसे पाहिले तर मातब्बर मंडळी आहेत. त्यात आहेत गुलामनबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, राज बब्बर, शशी थरूर, आनंद शर्मा आदी. आता अगदी २०१४ सालापर्यंत हे नेते म्हणजेच काँग्रेस अशी स्थिती होती. सत्तास्थानांवर पक्की मांड असलेल्या या नेत्यांनी काँग्रेसची सत्ता राबविण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजाविली. यातील अनेक नेत्यांनी तर सीताराम केसरी यांना अपमानास्पदरीत्या घालवून सोनिया गांधी यांच्या हाती पक्षाची सूत्रे देण्यात सक्रिय भूमिका बजाविली होती. त्यावेळी या नेत्यांनी पक्षांतर्गत लोकशाही वगैरेस तिलांजली दिली आणि गांधी कुटुंबाकडे पक्ष सोपवून स्वतः सत्तेची फळे चाखायला सुरुवात केली.


आता सत्ता होती, तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले होते. मात्र, अखेर २०१४ साली सत्ता गेली आणि या मंडळींना पहिला धक्का बसला. त्यानंतर २०१९ साली पुन्हा पराभव झाला आणि त्यानंतर अचानक या ज्येष्ठ नेत्यांना पक्षांतर्गत लोकशाहीची आठवण झाली. कारण, आता कुटुंबाच्या नेतृत्वाखाली राहून काही आपल्याला फायदा नाही, याची त्यांना जाणीव झाली. मग या नेत्यांनी आपला एक गट तयार केला, त्याला नाव मिळाले ‘जी-२३’. मात्र, ज्या मंडळींना आपल्या भरवशावर सत्ता उपभोगली, आज त्यांनीच आपल्याला नखे दाखवावीत, हे काँग्रेस नेतृत्वाला रुचणे शक्य नव्हतेच. त्यामुळे मग पक्षामध्ये ‘ज्येष्ठ नेते विरुद्ध उरलेले तरुण नेते’ असा थेट संघर्ष सुरू झाला. पक्षाच्या कार्यसमितीच्या एका बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुकीची मागणी केली असता राहुल गांधी यांनी त्यांना थेट भाजपचा एजंटच ठरविले होते.त्यानंतर आता अगदी कालपरवाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या घरासमोर निदर्शने झाली. ही निदर्शने केली ती अखिल भारतीय युवक काँग्रेसने. यामध्ये सिब्बल यांच्या घरावर हे कार्यकर्ते चालून गेले, त्यांच्या घरावर टॉमेटो फेकण्यात आले, त्यांच्या मोटारीचे नुकसान करण्यात आले. एकेकाळी कपिल सिब्बल यांचे काँग्रेसमध्ये जे स्थान होते, ते पाहता आज त्यांच्याविषयी घडलेला हा प्रकार काँग्रेसच्या सध्याच्या राजकारणाची दिशा दर्शविणारा आहे. कारण, हा प्रकार घडून दोन दिवस झाले आहेत आणि अद्याप काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्याविषयी चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे हा प्रकार पक्षश्रेष्ठींच्याच मर्जीनुसार घडला की काय, अशी शंका निर्माण होते. मात्र, सिब्बल यांच्याविरोधात जो प्रकार घडला, तो उद्या आपल्याविरोधातही घडू शकतो, हे लक्षात घेऊन सिब्बल यांचे सहकारी शशी थरूर यांना सिब्बल यांनी पक्षासाठी किती कायदेशीर लढे दिले, याची आठवण करून दिली. तर पी. चिदंबरम यांनी, “आम्ही पक्षामध्ये चर्चाही करू शकत नाही” हे अत्यंत निराशाजनक असल्याचे ट्विट केले. या सर्वांचा रोख आहे तो पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर. कारण, जुलै महिन्यात पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल, पक्षांतर्गत निवडणुकांचा निर्णय होईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप तसे काही झालेले नाही. विशेष म्हणजे, हे ‘जी-२३ ’ नेते अद्याप त्यावर अडून बसले असून, त्यांनी तत्काळ पक्षाच्या कार्यसमितीची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे.


आता अनेकांना हा प्रकार पाहून १९६९ सालची आठवण येऊ शकेल. तेव्हा काँग्रेसमध्ये ‘सिंडिकेट विरुद्ध इंडिकेट’ वाद निर्माण झाला होता. पक्षातले जुने-जाणते, बुजुर्ग नेते १९६९ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जसे वेचून पक्षाबाहेर काढले, तसेच आज काँग्रेसचे हायकमांड करताना दिसत आहेत. त्यावेळी निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, नीलम संजीव रेड्डी, स. का. पाटील आदी नेते होते. तर आज आज कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद, कॅप्टन अमरिंदर सिंग, लुईजिनो फालेरो, आनंद शर्मा आदी नेते लक्ष्य होत आहेत. या दोन्ही नेत्यांच्या पिढीमध्ये समानता अशी की, त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला. त्याच बरोबर अशीही समानता आहे की, काँग्रेस हायकमांडने पक्षात उभी फूट पाडली. पण, आपल्याला आव्हान देणार्‍या बड्या बुजुर्ग नेत्यांचे काहीही ऐकले नाही. त्यावेळी इंदिरा गांधींनी ऐकले नाही आणि आज सोनिया गांधी ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

मात्र, एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. ती म्हणजे ज्येष्ठ नेत्यांना हटविल्यानंतर इंदिरा गांधी यांनी आपल्या बळावर काँग्रेस पक्ष उभा केला. केवळ पक्ष उभाच केला नाही, तर तो अधिक बळकट केला, देशभरामध्ये अतिशय मजबूत संघटन त्यांनी उभे केले. त्यामुळे आज सोनिया आणि राहुल गांधी ज्या पक्षाच्या गादीवर बसले आहेत, ती त्यांना इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वामुळे मिळाली आहे. अर्थात, त्यांना ती टिकविता येत नसल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मात्र, काँग्रेसने आज ‘जी-२३’ नेत्यांकडे दुर्लक्ष करायचे ठरविल्यास राहुल गांधी यांना आपल्या आजीप्रमाणे पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष बळकट करणे शक्य आहे का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा वकूब अतिशय सुमार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच ज्योतिरादित्य सिंधिया, जितीनप्रसाद, सुश्मिता देव आदी एकेकाळच्या सहकार्‍यांनी राहुल यांची साथ सोडली आहे. त्यामुळे आता ‘माजी कॉम्रेड’ कन्हैया कुमारमध्ये राहुल गांधी आशा शोधत आहेत. त्यामुळे शरद पवार म्हणतात, त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष आता ‘पडकी हवेली’ असेल, तर कन्हैयासारखे ‘पोकळ वासे’ या हवेलीला वाचवू शकत नाहीत. मात्र, हवेली आणखी चार वर्षांनी कोसळणार असेल तर ती दोन वर्षांतच कशी कोसळेल, याची तजवीज मात्र माजी कॉम्रेड करू शकतात.









@@AUTHORINFO_V1@@