स्वामी विवेकानंद व महिला सक्षमीकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2021
Total Views |

Swami Vivekanand_1 &
 
 
मंगळवार, दि. १२ जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यानिमित्ताने स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांनी महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण, संस्कार, मातृत्व यांसारख्या विविध पैलूंविषयी केलेले चिंतन आजही तितकेच उद्बोधक आहे.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण या शब्दांची गेल्या काही वर्षांत खूपच चलती आहे. परंतु, आजही आपल्याला त्याचा अर्थ नेमकेपणाने समजला आहे, असे म्हणावेसे वाटत नाही. मुलींचे शिक्षणाचे, अर्थार्जनाचे, निर्णयस्वातंत्र्याचे प्रमाण वाढते आहे, ही बाब नक्कीच दिलासादायक आहे. पण, आपल्याला अभिप्रेत अशी सक्षम स्त्री नेमकी आहे, कशी याबाबत मात्र संभ्रम आहे. आपल्याला नेमके काय साधायचे आहे हेच नीट उमगलेले नाही. कारण, पाश्चात्त्य स्त्रीमुक्तीच्या कल्पनेतून आपण अजूनही बाहेर आलेलो नाही. त्यामुळे स्वातंत्र्य व स्वैराचार, स्वाभिमान व अहंकार, व्यक्तिविकास आणि व्यक्तिवाद यातील सीमारेषा आजही स्पष्ट झालेल्या नाहीत आणि याचे कारण स्त्री तिच्या आत्मस्वरूपाला विसरून भलतेच काहीतरी बनू पाहते आहे. तिच्या विकासामागचा हेतूच तिला स्पष्ट झालेला नाही. स्वामी विवेकानंदांच्या विचारप्रकाशात हा हेतू आपल्याला अतिशय सुस्पष्ट दिसतो. भारतीय स्त्रीचे हे रूप अतिशय तेजस्वी, उन्नत आणि जगाला आदर्श ठरू शकेल असेच आहे. स्त्री व पुरुष हे समाजपक्षाचे दोन पंख आहेत. ते दोन्ही सारखेच सामर्थ्यशाली असले, तरच समाज प्रगती करू शकेल, असे म्हणणाऱ्या स्वामीजींना समानता अभिप्रेत नव्हती, असे कोण म्हणू शकेल? भारतीय स्त्रीच्या गुणसमुच्चयाबद्दल त्यांना प्रचंड विश्वास होता. तिला संधीची समानता मिळाली तरी ती स्वतःला खूप सामर्थ्यवान बनवेल याची त्यांना खात्री होती. तिला शिक्षण द्यावे, याकरिता ते सदैव आग्रह धरत. त्या काळात बालविवाहाची प्रथा सर्वमान्य होती. ‘कन्याप्येव पालनीया शिक्षणीया अतियत्नतः’ -कन्येचेही अतिशय काळजीपूर्वक संगोपन करावे व तिला प्रयत्नपूर्वक शिक्षण द्यावे, असे ज्या देशाची संस्कृती सांगते, त्यांचा वारसा सांगणारे तुम्ही आपल्या मुलींना घरात कोंडून ठेवता, अकराव्या वर्षी लग्न करणारे तुम्ही माणसे म्हणवून घ्यायला लायक आहात का? अशी अत्यंत कठोर शब्दात स्वामीजी त्यांची निर्भर्त्सना करत.
 
 
 
 
“मुलींना शिक्षण द्या, तेही असे की ज्यातून चारित्र्य घडेल, मनाची शक्ती वाढेल, बुद्धीचा विकास होईल आणि स्वावलंबी बनता येईल, असे शिक्षण दिले तर स्त्रियांचे प्रश्न त्या स्वतःच सोडवतील. आमच्या मुली फक्त दुबळेपणाच शिकत आल्या आहेत. जरा काही झाले की त्या रडू लागतात. त्यांच्या अंगी थोडे वीरत्व येण्याची गरज आहे. इतर देशातील स्त्रियांप्रमाणेच भारतीय स्त्रियाही उन्नती करण्यास समर्थ आहेत. तुम्ही फक्त त्यांना शिक्षण द्या व त्यांच्या वाटेतून बाजूला व्हा त्यांना योग्य अशा सुधारणा कोणत्या हे त्याच ठरवतील!” इतका विश्वास त्यांना भारतीय स्त्रीबद्दल होता. ‘स्त्रीपूजनानेच सारे समाज थोर पदवीला पोहोचले आहेत, ज्या देशात ज्या समाजात हे स्त्रीपूजन नाही, तो देश, तो समाज कधीही मोठा होऊ शकला नाही व पुढे कधी काळी होणेही शक्य नाही. तुमच्या साऱ्या समाजाचा जो हा अधःपात झाला आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे या शक्तिरूपिणी स्त्रियांची अवहेलना हेच होय.” परंतु, तिला पूज्य म्हणून देव्हाऱ्यात बसविणे, त्यांना अभिप्रेत नाही. “प्रत्येक व्यक्तीला तिच्या अंतर्यामी असलेल्या ब्रह्मतत्त्वाबद्दल शिकवण द्या. प्रत्येक जण आपल्या मुक्तीचा मार्ग स्वतः चोखाळील. उन्नतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्वातंत्र्य. आचार-विचारांचे स्वातंत्र्य हेच जीवन. जिथे स्वातंत्र्य नसेल त्या माणसाचे वा समाजाचे पतन निश्चित!” असे म्हणताना स्वामीजी अशा स्वतंत्र बुद्धीकरिता नेहमी वाचक्नवीचे उदाहरण देत. वेदकाळात स्त्रिया विचाराने किती प्रगल्भ होत्या व स्वामीजींना भारतीय स्त्रीकडून कोणत्या प्रकारची पक्वता व निर्भयता अपेक्षित होती, हे यातून दिसते. याज्ञवलक्य ऋषींना जनकाच्या दरबारात जिने प्रश्न विचारले ती वाचक्नवी. तिचे प्रश्नही इतरांहून निराळे व मूलभूत होते. जेव्हा अन्य लोक याज्ञवलक्यांना अमूक यज्ञ कसा करावा, अमूक कृत्याचे फळ काय? असे प्रश्न विचारू लागले, तेव्हा ती म्हणाली, “हे प्रश्न बालिश आहेत. माझे प्रश्न धनुष्यावर चढवलेल्या तीक्ष्ण बाणांसारखे आहेत. त्याचे उत्तर दिलेत तर तुम्हाला महर्षी मानेन.” आत्मा काय आहे? व परमेश्वर काय आहे? हे प्रश्न विचारून तिने त्याची उत्तरे ऋषींकडून घेतली होती. दुर्दैवानं स्त्री-पुरुष दोघांनाही आज आत्मस्वरूपाचा विसर पडला आहे. त्यांना देहिक अस्तित्वच महत्त्वाचं वाटत आहे.स्त्रीच्या रूपवर्धनाकरिता, प्रदर्शनाकरिता जेवढा पैसा, कल्पकता याचा व्यय होतो, तेवढा तिच्या गुणवर्धनाकरिता होताना दिसत नाही, हे दुर्दैव!
 
 
 
 
वस्तुतः समाजात होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध व्हायला हवा असेल व दूषित वातावरण बदलायला हवे असेल, तर स्त्री-पुरुष दोघांचाही स्त्रीविषयक दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. भारतात स्त्रीला नेहमीच मातृरूपात पाहिलं गेलं आहे. स्वामीजी तर सर्वच महिलांना ‘माता’ म्हणून संबोधत. परदेशात महिलांना याची मुळीच सवय नसे. परंतु, स्वामीजींना वाटे, ‘आई’ या संबोधनात मागास काय आहे? ‘मातृत्व’ ही तर सर्वश्रेष्ठ उपाधी आहे. सर्वात कमी ऐहिक भाव निर्माण करणारे हे संबोधन आहे. याच्या उच्चारानेच वासना बोथट होतात व आपोआपच वर्तनावर नियंत्रण येते. पण, मातृत्व म्हणजे जैविक मातृत्व त्यांना अभिप्रेत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मातृत्वात असलेली सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती, क्षमाशीलता या गुणसमुच्चयाची अपेक्षा ते स्त्रियांकडून करत. स्त्रीने केवळ मातृत्वात अडकून पडावे, अशी त्यांची धारणा नव्हती. परदेशातील स्त्रियांना मिळणारा मोकळेपणा, त्यांच्यात शिक्षणामुळे आलेला आत्मविश्वास, पतीच्या बरोबरीने समाजात वावरणारी पत्नी हे पाहून ते तिथल्या लोकांना म्हणत, “आम्ही मातृभावाची वृद्धी केली आहे व तुम्ही पत्नीभावाची. मला वाटते की, थोड्याशा आदान-प्रदानाने उभयपक्षांचा फायदा होण्यासारखा आहे. “स्त्री-पुरुषांची जीवने परस्परला पूरक असावीत, परस्परांना स्वातंत्र्य देणारी असावीत व परस्परांचा आदर करणारी असावीत, असे ते सांगत. परंतु, त्यांच्यात निव्वळ आसक्ती असू नये, तर खरे प्रेम असावे, असे त्यांना वाटे. खरे प्रेम म्हणजे काय, हेही त्यांनी सांगितले आहे. एकमेकांच्यात देवाणघेवाणीचे हिशेब असू नयेत.
 
 
 
प्रेम म्हणजे निरपेक्ष, निःस्वार्थी मनाने दुसऱ्याकरिता करणे. प्रेमाचे दुसरे लक्षण निर्भयता. प्रेमाबद्दल म्हणजे एकमेकांविषयी किंतू, किल्मिष, भय नसणे. तिसरे म्हणजे, प्रेमाच्या ठिकाणी उच्चतम आदर्शाला पाहणे. ज्या घरात पती-पत्नीत असे प्रेम असेल त्या घरातील मुले भावनासंपन्न होतात, असे ते म्हणत. भारताचा भविष्यकाळ स्त्रियांच्याच हातून घडणार आहे, यावरही स्वामीजींचा ठाम विश्वास होता. भारतातील आदर्श कठोर आहेत, महनीय उदात्त संकल्पनांवर आधारलेले आहेत, त्यामुळे संकुचित व्यक्तिवादी दृष्टिकोनातून ते अन्यायकारक वाटू शकतात. परंतु, श्रेयस काय याचा विचार करून बंधने स्वीकारणे हीच आमची खरी उदात्तता आहे. कारण, भारतीयांची स्वहिताची संकल्पनादेखील व्यक्तीपासून समष्टीपर्यंत विस्तारलेली आहे. चांगले व वाईट सर्वच देशात आहेत. आपल्याकडच्या समस्यांवर चर्चा करत बसण्यापेक्षा सर्वांना शिक्षण द्या. शिक्षणाच्या जोरावर चांगल्या वाईटाचा ते आपोआपच विचार करतील. आपोआपच वाईट गोष्टींचा त्याग करतील, मग जोरजबरदस्तीने समाजातील कोणतीही प्रथा नष्ट वा पुष्ट करण्याची गरज भासणार नाही, यावर त्यांचा विश्वास होता. याकरिता काय शिक्षण द्यायचे त्याची त्यांची कल्पनाही अतिशय स्पष्ट होती. पूर्व व पश्चिम यांच्यातील चांगल्या गोष्टींच्या समन्वयाकरिता त्यांनी नेहमी प्रयत्न केले. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीला भारतीय संस्कृती व राष्ट्रीयत्व याचा स्पर्श असणे व भारतातील प्राचीन शिक्षणपद्धती नव्या स्वरूपात मांडणे याची गरज ते मांडत. भारतीय स्त्रियांच्या सक्षमीकरणाची त्यांची संकल्पना भगिनी निवेदितांना पूर्ण आत्मसात झाली होती.निवेदितांच्या भारतीय स्त्रीविषयीच्या विचारातून स्वामीजींचेच चिंतन परावर्तित होताना दिसते.स्त्रियांमध्ये प्रत्यक्ष काम केल्याने त्या तर स्वामीजींच्याही पुढे जाऊन बोलत. प्राचीन काळी स्त्रियांना खरं शिक्षण मिळत असे, तुम्ही एकतर त्यांना कोडकौतुकात ठेवता किंवा अनादराने वागवता. भारतीय कुटुंब व्यवस्थेत पुरुषाला जी भयानक प्रतिष्ठा आहे, ती मला दचकवून टाकते. तुमचे विचार, आशा-आकांक्षा यात त्यांना सहभागी करून घ्या. ती तुमची सहकारी सहचरी व्हायला हवी.
 
 
 
 
भारतात राहून भारतीय कुटुंबजीवन त्यातील स्त्रियांचे स्थान याचे निवेदितांनी सूक्ष्म अवलोकन केले. भारतीयांचे भारतीयत्व नेमके कशात आहे, भारतीय स्त्रीची खरी बलस्थाने काय आहेत, याचा आपल्याला विसर पडला. पण, निवेदिता मात्र त्याचे नेमके वर्णन करतात. “भारतीय स्त्रीचे जीवन ही भारतीय मातीतली कविता आहे,” असे त्या म्हणत.पाश्चात्त्य संकल्पनांनी भारतीय विचारपद्धतीवर कुरघोडी केल्यामुळे स्त्रीजीवनातले मार्दव, काव्य हरवले! कुटुंबातील वा परिसरातील व्यक्तीच नव्हे, तर पशू, पक्षी, वृक्षवेली, नद्या असे निसर्गातील घटकदेखील भारतीय स्त्रीजीवनाचा स्वाभाविक भाग होते. शेणाने घर सारवणारी, स्वयंपाकात सोवळे-ओवळे पाळणारी स्त्री वस्तुतः जंतुविज्ञानाचे नियमच पाळत होती, हे आज आपल्याला पटतेच आहे! भारतीय स्त्रीला अशिक्षित, मागास म्हटल्याचा निवेदितांना अतिशय राग येई.त्या भारतीय महिलांची खरी बलस्थाने साऱ्या जगाला सांगत. “जी स्त्री आपल्या कुटुंबातील नव्या पिढीला आपल्या देशातील उच्चतम आदर्शांचे दर्शन घडवते, त्याच्यावर संस्कार करते, तिला तुम्ही अज्ञानी कसे म्हणू शकता,” असे त्या विचारत. जुन्या भारतीय शिक्षणपद्धतीचे ध्येय माणसाचे चारित्र्य घडवणे, हे होते. स्त्रीशिक्षणाला आधुनिक बनवतानाच त्याचा हा गाभा हरवता कामा नये. मुलींना आधुनिक शिक्षण देतानाच तिच्या स्वाभाविक गुणांचे विकसन व्हायला हवे. तिला व्यवसाय शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण द्यायला हवे, या स्वामीजींच्या संकल्पनेतूनच निवेदितांची शिक्षणपद्धती आकाराला आली.
 
 
 
बालिका विद्यालयात त्या मुलींना लिहिण्या-वाचण्यासह विविध खेळ-व्यायाम शिकवत व आपला इतिहास, त्यातील प्रेरक व्यक्तिरेखा यांची माहिती देत. त्या मुलींना विविध व्यावसायिक प्रशिक्षणे देत. त्यातून तयार होणाऱ्या वस्तू युरोपीय बाजारात विकल्या जाव्यात व अशा रीतीने तिला राष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक विकासात सहभागी करून घ्यावे, ही त्यांची विचाराची झेप थक्क करणारी आहे. सत्त्वसंपन्न, ओजस्वी, राष्ट्रभावनेनी रसरसलेली व सकल विश्वाला आपल्या प्रेमाच्या परिघात सामावून घेणारी, मोठे हित साधण्याकरिता वैयक्तिक त्याग सहजपणे करणारी, आपल्यासह पती-पुत्र यांनाही राष्ट्रकार्याला प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्रीची प्रतिमा स्वामी विवेकानंद व निवेदिता यांनी पाहिली होती. मृदुता, माधुर्य, करुणा, सहचर्य, सोशिकता, समतोल, सहिष्णुता, पवित्रता या भारतीय स्त्रीमध्ये असणाऱ्या गुणांची अवहेलना झाली. त्याचा गैरफायदा घेतला जाऊन ती घरात बंदिस्त झाली व त्यामुळे हे गुणच आपल्याला मारक ठरत आहेत, अशी तिची चुकीची धारणा झाली. दुसरीकडे पुरुषांनाही संस्कारसंपन्न व चारित्र्यसंपन्न अशी गृहिणी मागास वाटू लागली व तिला आधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याकरिता पाश्चात्त्य शिक्षणाला आरंभ झाला. निवेदिता म्हणत, “पाश्चात्त्य शिक्षणाचा आग्रह धरला तर त्यासोबत हमखास येणारी असंस्कृतता व सामाजिक वर्तनातील आक्रमकता आपल्यात येईल. ती तशीच आलेली आता दिसते आहे! तिचा बुद्धिविकास अवश्य हवा. पण, तिच्यातील नैसर्गिक उच्चगुणांचा बळी देऊन नको. गुणांचे प्रकटीकरण नव्या काळाला अनुसरून होईल. पण, बाह्यरूप बदलले तरी गुणसमुच्चय तोच असायला हवा. येणाऱ्या काळातील आव्हाने पेलू शकेल, असे शिक्षण तिला हवेच; पण तिला आपल्या आदर्शांकरिता बाहेर जाण्याची गरज नाही,” असे त्या कळकळीने सांगत.
 
 
 
योद्धा, शासनकर्ती, साहित्यिक, ब्रह्मवादिनी सर्व आदर्श आपल्याकडेच आहेत व ते सर्व गुण वारसाहक्कानं आपल्याला मिळाले आहेत, याची तिला जाणीवच नाही, याचा त्यांना खेद होई. “तुम्ही आधुनिक जरूर व्हा. पण, आधुनिक होणं म्हणजे परंपरांवर आघात करणं नव्हे, तर त्याचं कालानुरूप विकसन करणं. हे स्त्री करू शकते तिला तो दृष्टिकोन देण्याची गरज आहे,” हे निवेदितांचे मत आजही किती खरे आहे! या देशात पुन्हा वैभव निर्माण करायचे हे मोठे आव्हान आहे. पुनर्निर्मितीच्या या पर्वात स्त्रियांचा सहभाग आणि आत्मीयता महत्त्वाची आहे, कारण स्त्री ही एक सामाजिक शक्ती आहे. तिचे आतापर्यंतचे शिक्षण हे अनुशासनप्रधान आहे, विकासप्रधान नाही, तरीही भारतात इतक्या अलौकिक स्त्रिया झाल्या. ही उदाहरणे भारतीयांचे गुणसामर्थ्य दाखवतात. हे यश भारतीय शिक्षणपद्धतीचे नाही. पण, स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुकूल बदल जर केले तर त्यांचं सुप्त सामर्थ्य प्रकटायला व आर्थिक चित्र बदलायला मदत होईल, हा विश्वास स्वामी विवेकानंदांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणाचे जे विचार मांडले त्यातून ठायीठायी प्रकट होतो. आज स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रे पादाक्रांत करत आहेत. आजच्या विज्ञानयुगात येणाऱ्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता भारतीय स्त्रीमध्ये नक्कीच आहे व त्याकरिता तिला तिच्या मूळ स्वभावाशी वा परंपरांशी फारकत घेण्याची आवश्यकता नाही. या त्यांच्या प्रगतीच्या मार्गावर जर स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांचे दीप लागले, तर त्या प्रकाशात स्त्रीला तिच्या आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन घडेल व खचितच ती विश्वापुढे एक आदर्श प्रस्थापित करेल!
 
 
- विनीता तेलंग
@@AUTHORINFO_V1@@