विदेशीयांच्या नजरेतून भारत व भारतीय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2021
Total Views |

Indian_1  H x W

 
 
 
आज भारताबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल परदेशात बरेच औत्सुक्य व आकर्षण निर्माण झाले आहे. पर्यटक इथे येताना भारताची सर्व माहिती काढून अभ्यास करूनच येतात. त्यामुळे बहुतेक पर्यटकांनी मला सांगितले की, भारतीय संस्कृती अत्यंत उच्च दर्जाची, संपूर्ण विश्वाचे कल्याण साधणारी असली, तरी भारतीयांचे देशातले व विदेशातले आचरण बरेचसे याविरुद्ध आढळते. याचे कारण काय? असा प्रश्नही त्यांनी मला विचारला. या सर्व अनुभवांवरून, आपला इतिहास व आजचे आपले आचरण जाणून घेतल्यावर माझे जे मत झाले, ते आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या लेखात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
 
 
 
प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव असतो, गुणदोष असतात. वैयक्तिक दुर्गुण, दुराचार हा मनुष्यस्वभाव आहे. पण, हे गुणदोष जेव्हा सार्वजनिक जीवनात प्रगट केले जातात, तेव्हा ते गुणदोष राष्ट्रीय गुणदोष, राष्ट्रीय स्वभाव किंवा राष्ट्रीय चारित्र्य म्हणून मानले जातात. नाना पाटेकरांचा एक डायलॉग आहे, ‘सौ मेसे अस्सी बेईमान, फिर भी मेरा भारत महान’ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विदेशात आपली ही राष्ट्रीय प्रतिमा निर्माण झालेली आहे. मला गेल्या अनेक वर्षांत युरोपीय देशांतून भारतात पर्यटनासाठी आलेल्या सामान्य पर्यटकांशी व काही वर्षांसाठी वास्तव्यास आलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांची भारताबद्दलची, भारतीयांबद्दलची तसेच त्यांच्या देशात वास्तव्याला असलेल्या भारतीयांबद्दलची मते जाणून घेण्याची संधी मिळाली. इंग्लंड, न्यूझीलंड, इटली इत्यादी देशांत भ्रमण झाल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीयासंबंधीची स्थानिक नागरिकांची मते जाणून घेण्याचाही प्रयत्न मी केला. या परदेशीयांच्या मतांना अनुसरून मी भारतातही निरीक्षण केले. आम्हा भारतीयांत अनेक गुण आहेत. पण, दोषही अनेक आहेत. सध्या आपला देश विश्वगुरू पदाकडे वाटचाल करत असताना आपण आपले चांगले गुण जोपासून आपल्या दोषांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. म्हणूनच मी या लेखात आपल्या राष्ट्रीय दुर्गुणांची/दोषांची चर्चा करणार आहे.
 
 
 
आपल्या देशाला रामायण-महाभारत काळापासूनचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. वेद, उपनिषदे, पुराणे यामध्ये सांगितलेल्या जीवनमूल्यांनुसार, नीतिमूल्यानुसार आपली समाजव्यवस्था व जीवनशैली होती. त्या काळात अनेक शोध लावले गेले. अनेक शास्त्रे, ग्रंथसंपदा निर्माण केली गेली. व्यक्तीच्या कामानुसार समाजव्यवस्था निर्माण केली गेली. कालांतराने आपल्यातल्या दोषांनी उचल खाल्ल्यामुळे गेली काही शतके आपण पारतंत्र्यावस्था अनुभवली. या अवस्थेत आपले अज्ञान, गरिबी यात वाढ होऊन आपण आपली प्राचीन जीवनमूल्ये विसरलो. आपण आपल्या संस्कृतीची चेष्टा करू लागलो. परकीय सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन, आंधळेपणाने त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानू लागलो. यामुळे आपली संस्कृती, सण, परंपरा यांचे विकृतीकरण झाले. मनुष्याची हाव वाढून घरभेदीवृत्ती, विश्वासघात, भ्रष्ट आचार-व्यवहार, जातीपातीचे गलिच्छ राजकारण इत्यादी दुर्गुणांनी उचल खाल्ली. यातून बाहेर पडून स्वातंत्र्य मिळवून आपले प्राचीन वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी अनेक महापुरुष, साध्वी-संन्यासी, संत महात्मे, स्वयंसेवी संघटना यांनी अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांना आज फळे येताना दिसत आहेत. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज विसाव्या शतकात भारताला पुनर्वैभवाप्रति नेऊन, प्राचीन संस्कृतीचा परिचय जगाला करून देऊन, विकासाचा मार्ग धरून, विश्वगुरुपदी विराजमान करण्याच्या प्रयत्नांना जोमाने चालना मिळाली आहे. अशा वेळी आपल्यातल्या गुणांना प्रोत्साहन देऊन आपल्यातल्या दुर्गुणांचे उच्चाटन करणे व विकासाला हातभार लावणे जरुरीचे आहे. या उद्देशाने आपल्यात असलेल्या दोषांची चर्चा करत आहे.
 
 
१. घरभेदी व विश्वासघातकी वृत्ती
 
 
आपल्या वैयक्तिक क्षुद्र स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी, आपसातली भांडणे सोडविण्यासाठी परकीयांना, देशाच्या शत्रूंना आमंत्रण देण्याचा घरभेदीपणा, गद्दारी व विश्वासघातकी वृत्ती ही आपल्या संस्कृतीचा नाश होण्यास, देशाला पारतंत्र्यात लोटण्यास जबाबदार होती. परकीय सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन, शत्रूला मदत करणे, सरकार उलथविण्यासाठी परदेशाची मदत घेणे, या राष्ट्रीय दुर्गुणांचा प्रत्यय आजही आपल्याला येत आहे. परदेशी जुलमी राजवटीच्या खुणा पुसण्याच्या प्रयत्नांना विरोध करणे, हेही आपल्याच लोकांकडून होताना आजही दिसत आहे. जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी केलेल्या कायद्यांना, योजनांना विनाकारण विरोध करून जनतेला वेठीस धरणे, या गोष्टी आपल्या विकासाला बाधक ठरत आहेत. आपल्या इतिहासाविषयी, संस्कृतीविषयीचा, हिंदू धर्माविषयीचा भ्रम फैलावून विदेशी धर्मप्रचारकांना धर्मपरिवर्तनाची संधी देणे, हाही देशद्रोह आज होताना दिसत आहे.
 
 
२. अज्ञान आणि अंधश्रद्धा
 
 
आपले अज्ञान व अंधश्रद्धा हे विकासाला, मानसिक व शारीरिक स्वास्थ्याला बाधा आणणारे मोठे दुर्गुण आहेत. कबुतरे, मोकाट जनावरे, तळ्यामधले मासे यांना पाव-बिस्किटे असे खाणे घालून आपण त्यांचे नुकसान करतो. पण, त्यामुळे रोगराई पसरून आपलेही नुकसान होते, हे आपल्या लक्षात येत नाही. जनावरांचे बळी हेही अंधश्रद्धेचे उदाहरण आहे.
 
 
३. अस्वच्छता
 
 
आपण वैयक्तिक स्वच्छता काही प्रमाणात पाळत असलो, तरी सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबद्दल आपण बेपर्वा असतो. इमारतीत, लिफ्टमध्ये, रस्त्यावर, गाडीत, बसमध्ये पान खाऊन पिचकाऱ्या मारणे, सार्वजनिक ठिकाणी, सभेनंतर, जत्रेनंतर त्या ठिकाणी होणारी घाण साफ न करणे, मोकाट-भटक्या व पाळीव प्राण्यांची विष्ठा व मानवीय विष्ठा रस्त्यांवर, पदपथावर पसरलेली असणे. रोगराई पसरण्यास या गोष्टी कारणीभूत असतात, हे आपणास माहीत असूनही आपण घाण करत असतो. आपली मंदिरे, तीर्थस्थाने येथील अस्वच्छता तर त्या पवित्र स्थानांची विटंबना करणारी असते. भारतात प्रथमच येणाऱ्या विदेशीयांना विमानतळाबाहेर आल्याबरोबर घाण, दुर्गंधी, गोंगाट, प्रदूषण, रस्त्यावर मोकाट फिरणारी जनावरे, लबाडी, फसवणूक व प्रत्येक स्तरावरचा भ्रष्टाचार प्रकर्षाने जाणवतो.
 
 
४. कायदे नियम मोडण्याची वृत्ती व लाचखोरी
 
 
आपण कायदे, नीती-नियम मोडण्यात धन्यता मानतो व त्याची प्रौढी मिरवतो. रांगेचे, रस्त्यांवरचे नियम मोडतो, सरकारी नोकरांना पैसे देऊन आपली बेकायदेशीर कामे पास करून घेतो व भ्रष्टाचार किती वाढला आहे, अशी बोंबही आपणच मारतो. हीच सवय भारतीयांनी परदेशातही वापरल्यामुळे त्यांना जबर दंड भरावा लागतोच; पण देशाचीही बदनामी होते हे मी पहिले आहे. सरकारी लाचखोरी व भ्रष्टाचार यांनी तर कळस गाठला आहे.
 
 
५. बेशिस्त व बेपर्वाई
बेशिस्त व बेपर्वाई हे तर आपल्यात खोलवर रुजलेले दुर्गुण वा दोष आहेत. घरात, इमारतीत, रस्त्यावर, कार्यालयात, जत्रा-सभा-उत्सव अशा ठिकाणची बेशिस्त अपघातास, मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत होते. सुरक्षेचे नियम मोडणे, वाहतुकीतली बेशिस्त हीसुद्धा अपघातास आणि विलंबास कारणीभूत ठरते, आपण आपल्याबरोबर इतरांचे जीवही धोक्यात घालतो हे आपल्या नावीगावी नसते.
 
 
६. उत्तम दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन, वापर व नंतरच्या देखभालीविषयीची अनास्था
आपण नव्या नव्या आधुनिक वस्तू, अवजारे, उपकरणे बनवतो, विकत घेतो व वापरतो. आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवलेली नवी वाहने वापरतो, घरात व कार्यालयात वातानुकूल यंत्रणा, इमारतीत लिफ्ट्स, अग्निरोधक यंत्रणा बसवतो. पण, ती यंत्रे, उपकरणे नीट चालावी, योग्य वेळी उपयोगात आणता यावी, यासाठी त्यांची योग्य ते सुटे भाग वापरून तज्ज्ञ तंत्रज्ञाकडून नियमित देखभाल करण्यात अनास्था दाखवतो. इमारतीतील, रस्त्यांवरील लोंबकळणारे विद्युत तारांचे जाळे व विद्युत उपकरणे यांची वेळच्या वेळी दुरुस्ती व देखभाल न केल्यास आपण जीवघेण्या अपघाताला, आगीला आमंत्रण देतो. रस्त्यांवरचे, मोक्याच्या ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ गरजेच्या वेळी देखभालीअभावी बंद असतात, याचे कारण एकदा बसवल्यावर अनेक कारणांमुळे त्यांची नियमित देखभाल होत नाही. आपल्याकडे विजयादशमीला शस्त्रे-अवजारे तेलपाणी करून तयार ठेवतात व मग त्यांची पूजा करतात, याचे कारण योग्य वेळी ती विनातक्रार वापरता यावी हेच असते. ‘चलता हैं, कुछ नहीं होगा, जब होगा तब देखा जायेगा,’ अशा विचारसरणीने व थोडे पैसे वाचविण्यासाठी कमी प्रतीचे सुटे भाग वापरून, थातूरमातूर दुरुस्ती करून आपण अपघाताला आमंत्रण देतो, तसेच इतरांचेही जीव धोक्यात घालतो. ही वृत्ती घरात, इमारतीत, कार्यालयात, कारखान्यात सर्वच ठिकाणी दिसते. यंत्रे, अवजारे, उपकरणे, वाहने यांचे उत्पादन करतानाही या चालढकल करण्याच्या वृत्तीमुळे आपण त्यांच्या उत्तमतेशी तडजोड करतो, यामुळे निर्यात केलेल्या अशा दुय्यम दर्जाच्या मालामुळे परदेशातही देशाचे नाव खराब होते व निर्यातही कमी होते. नवीन रस्ते थोड्याच दिवसांत खड्डेमय होणे, इमारती कोसळणे, आगी लागणे, या सर्व गोष्टी भ्रष्टाचार व देखभालीचा अभाव यामुळे होतात.
 
विदेशी पर्यटक
‘अतिथी देवो भव’ असे आपण म्हणत असलो, तरी पाहुण्यांशी विशेषतः परदेशी पाहुण्यांशी आपली वर्तणूक कशी असते? त्या परदेशी प्रवाशांचे आपल्याबद्दल, आपल्या देशाबद्दल काय मत होईल, याचा आपण विचार करतो का? आपल्या शब्दकोशात ‘प्लीज’, ‘सॉरी’, ‘एक्सक्यूज मी’ हे शब्द नसल्याने आपले वागणे, मोठ्या आवाजात बोलणे, हे परदेशी माणसाला उर्मटपणाचे वाटते. सर्वांना आदराने, सन्मानाने वागवणे हे आपण कधी शिकणार? पर्यटन स्थळावरचे गाईड त्यांना योग्य माहिती देतात का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.
 
८. प्रदूषण
कितीही कायदे केले, जनप्रबोधन केले तरी आपण प्रदूषण करून आपले आरोग्य बिघडवत आहोत, याची जाण आपल्याला केव्हा येणार? प्रार्थनास्थळावर, मिरवणुकीत, समारंभ-सभेत ध्वनिवर्धक, मोटारींचे हॉर्न्स उगीचच वाजवून, मोठ्या आवाजाचे फटाके वाजवून आपण ध्वनिप्रदूषण करतो. या ध्वनिप्रदूषणाचा विद्यार्थी, आजारी व वृद्धांना त्रास होतोच; पण आपल्या श्रवणशक्तीवरही परिणाम होतो.
 
 
 
वरील दुर्गुण दोषांखेरीज ढोंगीपणा, कमी कष्टात, फुकटात मिळणाऱ्या संपत्तीची हाव, जाती धर्माचे गलिच्छ राजकारण, हुशारी कार्यक्षमतेऐवजी वशिला-जाती-धर्माधारे मिळणाऱ्या नोकऱ्या व पदोन्नती, कामगार संघटनांची अरेरावी, संप, मोर्चे, बंद, लैंगिक अत्याचार, शिवराळ भाषा, अमली पदार्थांचा व्यापार, लुटारू दलाल, लोकशाहीचा अतिरेक इत्यादी मुळे होणारे नुकसान, उत्पादनाची घट इत्यादी राष्ट्रीय दुर्गुण, विकासाला खीळ घालतात, तसेच या आपल्या वर्तणुकीमुळे परदेशी उद्योगधंदे भारतात गुंतवणूक करण्यास धजत नाहीत. देशाची बदनामी होऊन आपलेही आर्थिक नुकसान होते. हे आपले दोष आता कमी होताना दिसत असले, तरी बालवर्गापासून मुलांना शिस्तीचे, नियम पाळण्याचे, सद्वर्तनाचे धडे दिले तर उत्तम नागरिक घडण्यास मदत होऊन विकासाला गती मिळेल. भारतीय संस्कृती ही जगातली एकमेव ‘सौम्य संपदा’ (सॉफ्ट पॉवर) आहे. या सौम्य संपदेद्वारे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांना चालना दिली जाऊ शकते. आपण भारतीय व भारतातील शिक्षणसंस्थांतून शिकलेले विदेशी विद्यार्थी विकासशील भारताचे दूत होऊ शकतात.
 
 
- ज्ञानचंद्र वाघ
 
 
@@AUTHORINFO_V1@@