व्यक्तिमत्त्व विकास घडविणारा जादूगर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021   
Total Views |
corona and doctors_1 




कोरोनाकाळातील ही घटना. या काळात डॉक्टर्स, नर्सेस कमालीच्या तणावात होते. एकतर अनेक दिवसांपासून घरापासून दूर. त्यात जग ज्यांच्यापासून अंतर राखून होते, त्या कोरोनाबाधितांवर थेट उपचार करायचं दडपण. अक्षरश: जीवावर उदार होऊन हे सारे वैद्यकीय क्षेत्रातील ‘कोरोना योद्धे’ ही लढाई लढत होते. पण, शेवटी तीदेखील माणसंच. त्यांना कुठेतरी या दिवसांत दिलासा मिळावा म्हणून महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जोगेश्वरीच्या ‘बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालया’त त्या जादूगाराला निमंत्रित केले. त्या जादूगाराने अशी काही जादू केली की, तिथलं सगळं वातावरणच बदललं. तणावग्रस्त चेहर्‍यांवर हसू फुललं. “आम्ही गेले काही महिने हसणंच विसरून गेलो होतो. पण, ‘मिस्टर बी’च्या जादूने मन खर्‍या अर्थाने ‘पॉझिटिव्ह’ झालं.”


मुख्य परिचारिका यांनी व्यक्त केलेलं हे मत, त्या जादूगारासाठी माजी राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते स्वीकारलेल्या पारितोषिकाइतकंच मनःस्पर्शी होतं. निव्वळ हे ‘कोरोना योद्धे’च नव्हे, तर गेल्या ३०-३५ वर्षांत या जादूगाराने अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी, हजारो विद्यार्थी, जगातील तब्बल ४० देशांमधील हजारो नागरिकांच्या चेहर्‍यावर हसू फुलवलंय. त्यांना आनंद दिला आहे. हा जादूगार ‘मिस्टर बी’ म्हणजे ‘दवे अ‍ॅकॅडमी’चे संचालक भूपेश दवे होय.


हे दवे तीन पिढ्यांपासून खर्‍या अर्थाने मुंबईकर. दादर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मधोमध असणार्‍या १०० वर्षांहून अधिक जुन्या मंदिराचे पौरोहित्य करणारे. आजोबा विष्णूराव आणि वडील वामनराव यांनी या पौरोहित्याची परंपरा जोपासली. वामनराव आणि कनक या दाम्पत्यांना एकूण चार अपत्ये. तीन मुले अन् एक मुलगी. भूपेश हा त्यातला एक. त्यांचं सारं बालपण याच परिसरात गेलं. ‘जयकर इंग्लिश हायस्कूल’मध्ये प्राथमिक, तर ‘छबिलदास’ मधून माध्यमिकपर्यंत शिक्षण झाले. मधली काही वर्षे अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये व्यतीत करावी लागल्याने तिथेसुद्धा काही शिक्षण झालं. दरम्यान, भूपेश अकरावी इयत्तेत नापास झाले. घरच्यांनी सरळ सांगितले. “एकतर नोकरी कर किंवा कोणता तरी व्यवसाय कर. बस्स झालं ते शिक्षण!”

भूपेशने नोकरीसाठी शोधाशोध केली. एका कार्यालयात ऑफिस असिस्टंटची त्याला नोकरी मिळाली. ऑफिस असिस्टंट कसली, ती तर शिपायाची नोकरी होती. कारण भूपेशला पडेल ती कामं करावी लागायची. अगदी झाडू मारण्यापासून. मात्र, त्याने अशा कामाची लाज कधी बाळगली नाही. काम म्हणजेच देवपूजा, अशा विचारांचा तो होता. पुजार्‍याचा मुलगा शिपायाचं काम करतो, जग काय म्हणेल, अशा विचारांना त्याने कधीच थारा दिला नाही. त्यांच्या या स्वतंत्र विचारसरणीमुळेच ते पुढे यशस्वी जादूगार, प्रेरक वक्ता आणि उद्योजक बनले.



‘आयएएस’ अधिकार्‍यांना समाजात खूप मोठा मान-सन्मान मिळतो. त्यांना गलेलठ्ठ पगार असतो, असं त्याने मित्राकडून ऐकलं. आपण ‘आयएएस’ व्हायचं, भूपेश यांनी मनाशी निश्चित केलं. पण, त्यासाठी पदवी असणे आवश्यक असते, हे उमगल्यावर त्यांनी दादरच्याच ‘कीर्ती महाविद्यालया’त प्रवेश घेतला. राज्यशास्त्र विषयात कला शाखेची पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘आयएएस’ परीक्षेची तयारी केली. अगदी झपाटून गेले होते ते. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. अगदी मुलाखतीपर्यंत पोहोचले. मात्र, दुर्दैवाने ते यशस्वी झाले नाहीत. निकषानुसार त्यांच्यासाठी हा शेवटचा प्रयत्न होता. नंतर त्यांनी ‘एमपीएससी’ची परीक्षादेखील दिली. एव्हाना त्यांच्या ध्यानी आले की, आपण ‘किंग’ बनू शकलो नाही, तरी ‘किंगमेकर’ बनू शकतो. त्यांनी ‘एमपीएससी’चे धडे देणारे वर्ग सुरू केले. त्यासाठी अस्तित्वात आली ‘दवे अ‍ॅकॅडमी’.



सगळं नीट चाललं असं वाटत असताना त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. काहीतरी वेगळं करायची मनाने उसळी घेतली. तसे भूपेश महाविद्यालयीन दिवसापासून जादूचे छोटे-मोठे प्रयोग करायचे. तसंच गुजराती-मराठी-हिंदी-इंग्रजी या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. कोणत्याही व्यक्तीला ते आपल्या वाणीने प्रभावित करायचे. या दोन्ही गुणांचा संयोग साधत, यामध्येच आपली कारकिर्द घडवायचे, त्यांनी निश्चित केले. १९८३ साली दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत आधी महाराष्ट्राचं नंतर पश्चिम विभागाचं त्यांनी प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत त्यांनी अशी काही जादू केली की, तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते भूपेश यांना पारितोषिक मिळाले. आपल्या या कलेचा वापर व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी ते करू लागले. विशेषत: विद्यार्थी दशेतील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते प्रेरणा देऊ लागले. महाराष्ट्रातील विविध आघाडीच्या माध्यम समूहाद्वारे त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्याने दिली. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यशाळा घेतल्या. अँकर, पॅनासॉनिक, अंबुजा सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना, अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले. स्मरणशक्ती या विषयामध्ये त्यांचा हातखंडा आहे. या विषयावर त्यांनी ६० हजारांपेक्षा अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. कॉर्पोरेट जगतात भूपेश दवे ‘मिस्टर बी’ या नावाने ओळखले जातात. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या खासगी पार्ट्यांसाठी वा विवाह समारंभासाठी ‘मिस्टर बी’ यांना मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करतात. मानसिकता दर्जेदार व्हावी, याकरिता ते ‘सिक्स्थ सेन्स’ नावाने प्रयोग करतात.



जादू हे शास्त्र आहे. ती काही अंधश्रद्धा नव्हे, हे शास्त्र कोणालाही शिकता यावं यासाठी त्यांनी दादरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या वहिल्या ‘मॅजिक अ‍ॅकॅडमी’ची स्थापना केली. किंबहुना, अशाप्रकारे जादूचे शास्त्रोक्त धडे देणारी ती भारतातील बहुधा पहिली अकादमी असावी. कर्करोगाने पीडित असणारी व्यक्ती त्या क्लिष्ट आणि यातनादायी उपचार पद्धतीमुळे मेटाकुटीस आलेली असते. या रुग्णांच्या मनाला उभारी मिळावी म्हणून भूपेश दवे विविध इस्पितळांमध्ये या रुग्णांसाठी मोफत जादूचे प्रयोग करतात. “या रुग्णांच्या चेहर्‍यावरील हसू खरंतर माझ्या मनाला उभारी देतं, ताजंतवानं करतं,” असे दवे म्हणतात.
आपल्या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ते ३५ हून अधिक लोकांना रोजगार देतात. कोरोनाकाळामध्ये सर्वत्र ‘टाळेबंदी’ होती. या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राचा सखोल अभ्यास केला. तसे पाहता गूढ विज्ञानाविषयी त्यांना पूर्वीपासूनच आकर्षण होते. त्याचे अध्ययनही ते करत होते. भविष्यात ज्योतिषशास्त्राचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करता यावा, यासाठी ‘ज्योतिषशास्त्र संशोधन केंद्र’ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. आपल्या या व्यावसायिक जडणघडणीस अनेकांचे हातभार लागल्याचे ते नम्रपणे सांगतात. मात्र, पत्नी अस्मिता दवे, मुंबईचे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य आणि जिवलग मित्र रमेश मेश्राम यांच्याशिवाय हा प्रवास शक्य झाला नसता, असं प्रांजळपणे नमूद करतात.



आज आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले आहे. जुन्या शास्त्रांची विज्ञानासोबत सांगड घालून त्यातून एक नवीन शास्त्र निर्माण करण्याची, अभ्यासण्याची सध्या जगभर सुरुवात झालेली आहे. या नवीन शास्त्राचा मानवी जीवनास लाभ कसा होईल, याकडेच शास्त्रज्ञांचा कल आहे. त्यातून अनेक नवीन शोध समोर येत आहेत. भूपेश दवे याच मांदियाळीत भारताचं प्रतिनिधित्व करतात, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



@@AUTHORINFO_V1@@