राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांच्या समन्वय बैठकीत निर्धार
गांधीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची तीन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक ५ ते ७ जानेवारीच्या काळात कर्णावती विद्यापीठ, गांधीनगर येथे संपन्न झाली.बैठकीच्या अंतिम दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या कालखंडात देशभरात विविध संघटनांनी आवश्यकतेनुसार अनेक प्रकारची सेवाकार्ये केली. त्यांची माहिती या बैठकीत देण्यात आली. कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला होता. त्यांच्या शिक्षणाची योजना तयार करण्यात आली.
देशभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वस्ती शाळा तसेच ऑनलाईन माध्यमातून जवळपास दहा हजार ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. हजारो प्राध्यापक या कार्यात अतिरिक्त वेळ देऊन सहभागी झाले. या व्यतिरिक्त हजारो कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या समूहांमध्ये मुलांना शिकविण्याचे कार्य केले. या प्रकारच्या संकटास राष्ट्रीय आव्हान मानून सर्व संघटनांनी समाजाच्या खांद्याला खांदा मिळवून कार्य केले. या वेळी संपूर्ण देशात समाजाने दाखविलेली एकजूट जगभरातील एक अभूतपूर्व असे उदाहरण आहे, हीदेखील आनंदाची बाब आहे.“सध्याच्या काळात देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करावी, कोरोनाकाळाचे संकट पार करून देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जावी, यासाठी आमचे कार्यकर्ते कौशल्य विकासाच्या कार्यास प्रारंभ करतील. श्रीरामजन्मभूमी मंदिरनिर्मितीचा विषय आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर आला आहे. लवकरच एक भव्य मंदिर उभे राहावे, अशी भावना देशात आणि जगात निर्माण झाली आहे. देशभरात मंदिरनिर्मितीसाठी व्यापक संपर्काचे कार्य केले जाईल.
सर्व कार्यकर्ते पाच लाखांहून अधिक गावांमधील दहा कोटींहून अधिक घरांमध्ये श्रीराम मंदिरनिर्मितीसाठी संपर्क करतील, तसेच प्रत्येक कुटुंबातून काही ना काही मदत प्राप्त होईल, अशी आशा आहे,” तसेचयंसह सरकार्यवाह म्हणाले की, “नव्या शैक्षणिक धोरणाचे सर्वांनी स्वागत केले आहे.” त्यातील अनेक चांगल्या बाबींचे क्रियान्वयन योग्य प्रकारे व्हावे, यादृष्टीने सर्व कार्यकर्ते ठिकठिकाणी प्रयत्नशील राहतील याचीही चर्चा बैठकीत झाली. या व्यतिरिक्त विविध विषयांवर या बैठकीत विचार करण्यात आला. जलसंरक्षण, वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्ती या दृष्टीने पर्यावरण गतिविधीचे कार्य वाढविण्याचा विचार झाला. कुटुंब प्रबोधन अंतर्गत सुसंस्कृत कुटुंबांच्या निर्माणाबाबत तसेच समरस समाजासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्राथमिकतेने कार्य करावे, भेदभाव दूर करण्यासाठी वेगाने कार्य व्हावे, भेदभावरहित समाज निर्माण व्हावा, यासाठी चिंतन करण्यात आले. एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. कृष्णगोपाल यांनी शेतकरी आंदोलनाचा तोडगा परस्पर चर्चेतूनच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.