अस्तित्वाची धडपड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |
MIM _1  H x W:
 
 
 
असदुद्दीन ओवेसींनी निवडणुकीत उतरण्याचे जाहीर केले नि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची पाचावर धारण बसली आणि त्या आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी धडपडू लागल्या. एमआयएमला भाजपची ‘बी टीम’ ठरवण्यापासून ते भाजपने ओवेसींना विकत घेतले म्हणण्यापर्यंतचे त्यांचे आरोप ममतांची हीच वैफल्यग्रस्तता दाखवतात.
 
 
आगामी दोन-तीन महिन्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून ‘दाढी कुरवाळू’ राजकारणानेही आपले रंग दाखवायला सुरुवात केल्याचे दिसते. अर्थात, त्याची सुरुवात ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन’ अर्थात ‘एमआयएम’चे अध्यक्ष व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीच केली होती. गेल्या वर्षी पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल भागात पाच जागा जिंकल्याने स्फुरण चढलेल्या ओवेसींच्या एमआयएमची नजर आता पश्चिम बंगालवर आहे.
 
 
त्याच मालिकेंतर्गत त्यांनी आपला पक्ष पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करत मुस्लिमांच्या हक्क-अधिकारांसाठी लढत देईल, अशी घोषणा केली होती. त्यांच्या याआधीच्या राजकीय इतिहासाने व आताच्या निर्णयानेच एमआयएम पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या किमान १०० जागांवर तरी उमेदवार देईल, हे निश्चित झाले. मात्र, असदुद्दीन ओवेसींनी निवडणुकीत उतरण्याचे जाहीर केले आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची पाचावर धारण बसली आणि त्या आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी धडपडू लागल्या.
 
 
ओवेसी बंगाली राजकारणात आल्याने आपली हक्काची मुस्लीम मतपेढी ते पळवून नेतील आणि आपल्याला पराभवाचा दणका बसेल, या भयाने ममतांनी एमआयएमचा विरोध सुरु केला. असदुद्दीन ओवेसींना भाजपची ‘बी टीम’ ठरवणार्‍या ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. हैदराबादच्या गल्लीतल्या पक्षाच्या माध्यमातून मुस्लीम तरुणांमध्ये फूट पाडण्यासाठी भाजप कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
 
 
त्यानंतर ओवेसीही त्यांच्यावर बरसले व “मला पैशांनी विकत घेणारा कोणी जन्माला आला नाही,” असे प्रत्युत्तर दिले. तिथून पुढे ममता बॅनर्जी आणि असदुद्दीन ओवेसींमध्ये बराच काळ वाक्युद्ध सुरु राहिले. पण, आपण ओवेसींना फार दिवस घेरु शकत नाही, याची जाणीव ममतांना झाली नि त्यांनी ओवेसींविरोधात ‘इमाम असोसिएशन’ला जागे केले.
 
 
मागील किमान दहा वर्षांपासून पश्चिम बंगालच्या सत्तेवर ठाण मांडलेल्या ममता बॅनर्जी यांनी सातत्याने मुस्लीम लांगुलचालनाचेच राजकारण केले. राज्यातील जनतेच्या विकासाचा मुद्दा तर दूरच, सर्वसामान्य बंगाली नागरिक आणि प्रामुख्याने हिंदूंना दैनंदिन जीवनातही सावत्रपणाची वागणूक दिली. हिंदूंच्या सण-समारंभ-उत्सवांमध्ये आडकाठी आणणे, वसंत पंचमी, सरस्वती पूजा, रामनवमी, दुर्गापूजेला विरोध करणे, ‘जय श्रीराम’चा नारा ऐकला की आकांडतांडव करणे आणि मुस्लिमांना जवळ करणे, मोहरमसह मुस्लिमांचे सण धुमधडाक्यात साजरे होऊ देणे, बांगलादेशी घुसखोर व रोहिंग्या मुस्लिमांसाठी पायघड्या अंथरणे, ‘सीएए’-‘एनआरसी’चा विरोध करणे, असले प्रकार ममता बॅनर्जी यांनी सातत्याने केले.
 
 
त्यातूनच त्यांची एकगठ्ठा मुस्लीम मतपेढी तयार झाली आणि ‘इमाम असोसिएशन’सारख्या इस्लामी धार्मिक संघटनांनीही आपले मसिहा ठरवत ममतांच्याच कळपात जाणे पसंत केले. परिणामी, गेल्या कित्येक वर्षांपासून ममता बॅनर्जींच्या सत्तापाठिंब्याने मनसोक्त धर्मस्वातंत्र्य उपभोगणार्‍या ‘इमाम असोसिएशन’ने आता खाल्ल्या मिठाला जागत ‘जातीयवादी शक्ती’ म्हणत ओवेसींचा विरोध सुरु केला.
 
 
मात्र, ओवेसींना लाथाडताना ‘इमाम असोसिएशन’ने ममता बॅनर्जींनी भाजपचे नाव घेऊन वापरलेली भाषाच वापरली, हे लक्षात घेण्याजोगे. यावरुनच ममता बॅनर्जी आणि ‘इमाम असोसिएशन’मधील साटेलोटे समजते, तसेच ममतांच्याच इशार्‍यावर ‘इमाम असोसिएशन’ ओवेसींच्या विरोधासाठी पुढे आल्याचे व ममता बॅनर्जीही ओवेसींवर थेट हल्ला करण्याऐवजी ‘इमाम असोसिएशन’चा आधार घेत असल्याचे दिसते.
 
‘इमाम असोसिएशन’ने असदुद्दीन ओवेसींवर हल्लाबोल करत म्हटले की, “ओवेसी धर्माच्या आधारावर जनतेत फूट पाडत आहेत. ते बंगाली मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करत नाही, यामुळे त्यांचा विरोध केला जाईल. हा अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण करुन भाजपला फायदा पोहोचवण्याचा प्रकार असून आम्ही गरज भासल्यास नवीन संघटना बांधून निवडणूक लढवू, पण एमआयएमच्या योजनेला मूठमाती देऊ,” अशी धमकीही दिली. इथेच ममता बॅनर्जी ओवेसींच्या बंगालप्रवेशाने किती धास्तावल्या याचा दाखला मिळतो. तसेच ‘इमाम असोसिएशन’ने थेट निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यामागे तृणमूलचा हात असल्याचेही स्पष्ट होते.
 
कारण, निवडणुकीच्या आधी लगोलग एखादी संघटना उभी करुन निवडणूक लढवणे सोपे नसते, त्यामागे काही पूर्वसंचित, पाठबळ असावे लागते. इथे ओवेसींना शह देण्यासाठी ‘इमाम असोसिएशन’कडे ते बळ ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसशिवाय अन्य कोणाचे कसे असू शकेल? दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांनी फुरफुरा शरीफ दर्ग्याचे मौलाना अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वात आपण निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते.
 
त्यामुळे ममतांना तृणमूलची आतापर्यंत जोपासलेली एकगठ्ठा मुस्लीम मते विभागतील व त्याचा फायदा भाजपला होईल, असे वाटले. त्याचवेळी फुरफुरा शरीफचे पीरजादा त्वाहा सिद्दीकी यांनीही ओवेसींना अप्रत्यक्षरीत्या भाजपचे एजंट ठरवले व ओवेसींच्या सफेद पोषाखाच्या आत भगवे कपडे असल्याचा आरोप करत आम्ही बंगालमध्ये सांप्रदायिक ताकदींना पाय रोवण्याची संधी देणार नाही, असे म्हटले.
 
एकूणच असदुद्दीन ओवेसींच्या बंगाली मैदानात येण्याच्या घोषणेने ममता बॅनर्जी चांगल्याच चवताळल्याचे दिसते, म्हणूनच त्यांच्या समर्थकांनी आपले सांप्रदायिक कारनामे विसरले नि ओवेसींना जातीयवादी व भाजपवाला ठरवत लक्ष्य केले. कारण, पक्षातील आतापर्यंतचे सहकारीच एकेक करुन सोडून जात असताना एकाकी पडलेल्या ममता बॅनर्जींना निवडणुकीची चिंताही सतावत असणार व त्यामुळेच त्यांनी ‘इमाम असोसिएशन’, पीरजादा त्वाहा सिद्दीकी वगैरे लोकांना ओवेसींसह भाजपविरोधात कामाला लावले असेल. तसेच भाजपशी दोन हात करु शकत नाही, याची झालेली जाणीव आणि ओवेसींमुळे मुस्लीम मतेही दुरावली जातील, या भयाने त्यांना ग्रासले असावे.
 
कदाचित आगामी निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचा राजकीय अवकाश कमालीचा आकसेल, हेही त्यांना कळून चुकले असेल. या पार्श्वभूमीवर भाजपशी ओवेसींचा संबंध जोडून मुस्लिमांची व हिंदूंचीही मते आपल्यालाच मिळावीत म्हणून ममता बॅनर्जी धडपड करत असल्याचे दिसते. पण, विझता दिवा जीवाच्या आकांताने कितीही फडफडला तरी त्याला मालवण्यापासून रोखता येत नाही, हे त्यांनी समजून घ्यावे.





@@AUTHORINFO_V1@@