‘वनवासी कल्याणा’चा वसा घेतलेला हिरा : विष्णु सवरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Ram Naik_1  H x
 
 
 
आजही बऱ्यापैकी दुर्गम असलेल्या वाडा तालुक्यात वनवासी कुटुंबात जन्माला आलेले विष्णु सवरा आपले भाग्य घडवायला वनवासी कल्याण आश्रमाच्या तलासरी येथील शाळेत दाखल झाले. तिथे शिक्षण आणि संघ संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडलेल्या विष्णु सवरांनी स्वतःचे भाग्य घडविलेच; पण खऱ्या अर्थाने ते संपूर्ण महाराष्ट्रातील वनवासींचे आणि वाडा-पालघर विभागाचे भाग्यविधाता झाले.
 
महाराष्ट्रात कल्याणच्या माधवराव काणे यांनी ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे बीज रोवले. आज राज्यभर धडाक्याने वनवासी बांधवांसाठी कार्यरत ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे इवलेसे रोपटे काणे यांनी लावले. त्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली या रोपट्याला आलेली दोन गोड फळे भारतीय जनता पक्षाचे वैभव ठरली. पहिले चिंतामण वनगा, तर दुसरे विष्णु सवरा. सवरा तर आपल्या संपूर्ण जडणघडणीचे श्रेय काणे यांनाच देत. आजही बऱ्यापैकी दुर्गम असलेल्या वाडा तालुक्यात वनवासी कुटुंबात जन्माला आलेले विष्णु सवरा आपले भाग्य घडवायला वनवासी कल्याण आश्रमाच्या तलासरी येथील शाळेत दाखल झाले. तिथे शिक्षण आणि संघ संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडलेल्या विष्णु सवरांनी स्वतःचे भाग्य घडविलेच; पण खऱ्या अर्थाने ते संपूर्ण महाराष्ट्रातील वनवासींचे आणि वाडा-पालघर विभागाचे भाग्यविधाता झाले.
 
बी.कॉम झाल्यानंतर अर्थार्जन अपरिहार्यच होतं. अंगभूत गुणांमुळे त्यांना आधी सरकारी आणि नंतर तर स्टेट बँकेत नोकरी मिळाली. कष्टाळू, हुशार आणि सतत काही ना काही करण्याची आस असलेले सवरा स्टेट बँकेत स्थिरावले असते, तर कुटुंबाचा नक्कीच मोठा आर्थिक उत्कर्ष झाला असता. पण, केवळ आपल्या वनवासी बांधवांचेच नव्हे, तर समाजाचे आपण देणे लागतो, या ‘वनवासी कल्याण आश्रमशाळे’त काणेंनी केलेल्या संस्कारांनी सवरांना स्वस्थ बसू दिले नाही. विचारसरणी भिन्न असली तरी त्या वेळच्या ठाणे जिल्ह्यात वनवासींसाठी काम करणाऱ्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक, गोदावरीताई परुळेकर, भाऊसाहेब वर्तक, ताराबाई वर्तक यांचे कामही त्यांनी जवळून पाहिले होते. आपणही काही करावे ही ऊर्मी असलेल्या तरुण सवरांना अटलजींच्या नेतृत्वाने आकर्षित केले आणि देशसेवेसाठी राजकारणाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
 
१९८० मध्ये जनता पक्षातून बाहेर पडलेल्या आम्ही जनसंघीयांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. ‘आओ फिर से दिया जलाएँ’ अशी अटलजींनी हाक दिली होती. पुन्हा एकदा शून्यातून विश्व साकारायला आम्ही सज्ज झालो. एका अर्थाने त्या अडचणींच्या काळात ताकदीचे कार्यकर्ते, नेते ही आमची नितांत गरज होती. अशा काळात पक्षाचे पूर्ण वेळ काम करायला सवरा सज्ज झाले. पुन्हा एकदा पराभवाची शक्यता असली तरी निवडणूक लढवायची, पण पक्ष सर्वदूर पोहोचवायचा वसा आम्ही हाती घेतला आणि घेतला वसा पाळण्यासाठी निवडणूक लढविण्याकरिता विष्णु सवरांनी सहजच स्टेट बँकेच्या नोकरीवर पाणी सोडले. १९८० व १९८५ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या जन्मभूमीतून वाडा येथून सवरांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीतील पराजयामुळे खचून न जाता सवरांनी पक्ष वाढविण्याचे आणि समाजसेवेचे आपले व्रत सुरूच ठेवले. ‘अपयश ही यशाची पायरी असते’ या उक्तीनुसार नंतर मात्र ते सतत विजयाचे सोपान चढतच राहिले. काही धनाढ्य, बलाढ्य राजकारणी आपल्या ताकदीमुळे वारंवार एकच विधानसभा जिंकण्याची उदाहरणे आहेत. अक्षरशः ते आपल्या मतदारसंघाचे राजेच होतात. किरकोळ शरीरयष्टीच्या, मागासलेल्या समाजातून आलेल्या मध्यमवर्गीय सवरांनीही ही किमया साधली. सलग सहा वेळा ते विधानसभा निवडणुका जिंकले. मतदारसंघ बदलले; वाड्याऐवजी भिवंडी झाला, विक्रमगड झाला, तरी सवरा जिंकतच गेले.
 
तेथील वनवासी जनतेचे ते होतेच, पण अन्य मतदारांनाही सज्जन, सुस्वभावी सवरा चटकन आपलेसे वाटत. तीव्र स्मरणशक्तीमुळे एकदा परिचय झालेली व्यक्ती नावानिशी त्यांच्या स्मरणात राही. ते पुढील वेळेस आपणहून विचारपूस करीत. हा प्रामाणिकपणा, आपलेपणा सर्वांना भावे. त्यांच्या या गुणाचा मलाही माझ्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी लाभ होई. त्यावेळच्या ‘उत्तर मुंबई’तील वसईतील काही भाग सवरांच्या विधानसभेचा होता. सवरांमुळे तिथल्या प्रचाराची आणि मतांचीही मला चिंता नसे. मी तेथील खासदार असतानाच मतदारसंघातील पालघरचे महत्त्व वाढू लागले होते. तो वेगळा जिल्हा होणे गरजेचे होते. आम्ही ती मागणी लावूनही धरली होती. पुढे ते झालेही.
 
नव्याने झालेल्या या जिल्ह्याची चांगली प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यातही सवरा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. नव्या जिल्ह्यात पहिल्या महाराष्ट्र दिनी सवरांच्या दांडग्या इच्छाशक्तीची सर्वांना प्रचिती आली. थेट रुग्णालयातून येऊन त्यांनी ध्वजारोहण केले. एवढंच नव्हे, तर नंतर मानवंदना, परेडसाठी दीड-दोन तास उभेही राहिले. पालघर जिल्ह्याचे स्वप्न साकारल्याने जणू त्यांच्यात ताकद आली. पालघर वेगळा जिल्हा व्हावा, यासाठी सवरांनी सतत धडाकेबाज प्रयत्न केले. त्यानंतर या नव्या जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडेच जबाबदारी सोपवून जणू सवरांच्या कामाची पावतीच दिली गेली. सवरांनीही या नेमणुकीला न्याय दिला. जोडीला आदिवासी विकासमंत्रिपदाची जबाबदारी होतीच. त्यांच्या या कारकिर्दीत अल्पावधीत पालघर जिल्ह्याचा आणि क्षेत्रातील वनवासी बांधवांचा लक्षणीय विकास झाला. भावनिक गुंतवणूक असल्याने तळमळीने सवरांनी या नव्या जिल्ह्याची जोपासना केली. त्यामुळेच अत्यंत आजारी असतानाही महाराष्ट्र दिनी सवरा निश्चयाने ध्वजारोहण समारंभात सामील झाले असणार!
 
अनेक आमदार, खासदार मतदारसंघात लोकप्रिय असतात. लोकांची कामेही करतात. पण, सभागृहात मात्र त्यांची कामगिरी बेताची असते. सवरा याहीबाबतीत अव्वल होते. मुळातच त्यांना वनवासींच्या आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाण होती. विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु असताना येणाऱ्या अडथळ्यांची जाणीव होती. या सर्व समस्या धसास लावण्यासाठी ते सातत्याने विधानसभेतील विविध आयुधांचा अर्थात कपात सूचना, लक्षवेधी, तारांकित प्रश्न वगैरेंचा उपयोग करीत. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे म्हणजे वनवासी जनजीवनाचा आरसाच असत. अर्थसंकल्पातून भागात विकासकामे करवून घेण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे होते. अभ्यासू आमदार अशी त्यांची विधानसभेत प्रतिमा होती.
 
वाडा येथील विद्युत उपकेंद्र असो वा राज्य परिवहन मंडळाचे आगार असो, विक्रमगडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरु करणे असो वा गावोगावचे पूल, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे असोत, सवरांनी ३० वर्षांमध्ये आपल्या क्षेत्रात केलेल्या कामांची यादी मारुतीच्या शेपटाएवढी लांबलचक आहे. व्यक्तिशः मला ‘शबरी आदिवासी विकास महामंडळ’ स्थापनेतील त्यांचे योगदान आणि ठिकठिकाणच्या आश्रमशाळांत कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय करवून घेणे फार मोलाचे वाटते. या दोन्ही निर्णयांचा दूरगामी उपयोग आहे. वनवासींशी असलेल्या नाळेच्या नात्याचे ऋण सवरांनी अक्षरशः सव्याज फेडले. सवरांना घडविणाऱ्या वनवासी आश्रम शाळेचेही पांग फेडले. २५० आदिवासी आश्रमशाळा त्यांनी बांधल्या. सर्वच आदिवासी शाळांचे अनुदान वाढवून घेतले. तेथील विद्यार्थ्यांना गरम जेवण मिळावे अशा व्यवस्था करविल्या. केंद्र शासनाच्या योजनाही या शाळांपर्यंत आणल्या. थेट लाभाची, विकासाची कामे करीत असतानाच वनवासींच्या मूळ कलागुणांचीही जोपासना झाली पाहिजे; त्यांची वैशिष्ट्ये कायम राहिली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी वैविध्यपूर्ण प्रयोग ते करीत. मनोर जवळ उभारलेला ‘वारली हाट’ आजही त्यांच्या दूरदृष्टीची आणि कल्पकतेची साक्ष देत आहे.
 
आपल्या विभागाचा विकास करीत असतानाच इतरही अनेक आघाड्या सवरा यांनी समर्थपणे हाताळल्या. विविध सहकारी बँका, शिक्षण संस्था, सामाजिक न्यास यांच्याशी ते संलग्न होते. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. विष्णु सवरा यांनी सर्वात मोठे योगदान अर्थातच भारतीय जनता पक्षाला दिले. तळागाळातीलकार्यकर्ता ते ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष ते केंद्रीय कार्यकारिणी सदस्य या प्रवासात पक्षकार्याबरोबरच हजारो सहकाऱ्यांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जोडले. त्याची प्रचिती त्यांच्या अंत्ययात्रेच्यावेळी आलीच. कोरोनाचा थैमान सुरु असतानाही विष्णु सवरा यांच्या अंत्ययात्रेत देवेंद्र फडणवीसांपासून अक्षरशः शेकडो कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले. भारतीय जनता पक्षातील अनेक शीर्षस्थ नेते मंडळी आलीच, पण मधुकर पिचड, विवेक पंडित, विश्वनाथ पाटील आदी अन्य पक्षांतील दिग्गजांनीही अंत्ययात्रेत हजेरी लावली. विष्णु सवरा यांच्या अजातशत्रुत्वामुळेच हे घडले. असे अजातशत्रू राजकारणी नेहमीच दुर्मीळ असतात. आदिवासी विभागात सातत्याने कार्यरत राहून तिथे भारतीय जनता पक्ष नावारूपाला आणणाऱ्या विष्णु सवरा यांच्या स्मृतीस माझे अभिवादन!
- राम नाईक
(लेखक उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.)
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@