माझे दादा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Nisha Sawara_1  
 
 
“सोन्या, रागावलीस का माझ्यावर?” फोनवर पलीकडून आवाज आला आणि माझ्या डोळ्यातून गंगा, यमुना, गोदावरी वाहू लागल्या. मी सकाळी चिडून निघून आले म्हणून दादांनी ऑफिसमधली गर्दी आटोपून कामाच्या रगाड्यातून आठवणीने फोन केला होता. इतक्या हळव्या मनाचे माझे दादा, त्यांचा आवाज यापुढे ऐकू येणार नाही. असं का झालं? असं व्हायला नको होतं. तुम्ही का गेलात? वडील हे मुलीच्या आयुष्यातले पहिले ‘सुपर हिरो’ असतात आणि मुलगी कितीही मोठी झाली तरी ती त्यांच्यासाठी राजकन्याच असते. मग मी तरी याला अपवाद कशी बरं असेन?
राजकारणाच्या ४०-४२ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांचा सहवास कुटुंबीयांपेक्षा कार्यकर्त्यांनाच जास्त लाभला. सतत कामाचा ध्यास, गुरु माधवराव काणे यांनी दिलेला आदेश आणि त्यांनी आखून दिलेल्या मार्गिकेवर वाटचाल करताना स्वतःची तत्त्वं सांभाळून स्वकियांसोबतच विरोधकांचीही मने जिंकत, वनवासी समाजाच्या विकासासोबतच संघटनवाढीसाठी अहोरात्र मेहनत घेणारा हा लोकनेता कायम कामाच्या आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यातच रमला. जेव्हा सक्तीची विश्रांती आणि निवृत्ती घेण्याची वेळ आली तेव्हा “गुरुवर्य माधवरावांनी दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली असं मला वाटतं,” असं समाधानानं त्यांनी बोलून दाखवलं आणि म्हणूनच की काय त्यानंतर फार वेळ ते या जगात थांबले नाहीत.
 
 
 
संसाराचा गाडा दोन चाकावर चालतो, असं म्हणतात. आमच्या कुटुंबात दोन्ही चाकं अगदी भक्कम. दादा संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित असल्यासारखं जगले, पण म्हणून त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, असं नाही आणि आमच्या आईनेही आम्हा मुलांच्या संगोपनाची, संस्कारांची, शिक्षणाची आणि याचबरोबर सुरुवातीच्या काळात आर्थिक जबाबदारीही सांभाळत दादांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्द घडवण्यात मोलाची साथ दिली. दादा म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता, प्रचंड अनुभव, अतिशय संयम आणि चिकाटी आणि ठरवलेली गोष्ट साध्य करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी, त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि कमालीचा नम्रपणा, असे सर्व गुण एकाच व्यक्तीच्या ठायी असलेलं चालतं-बोलतं विद्यापीठ. त्यांच्याविषयी लिहायला घेतल्यानंतर माझ्या आयुष्यातले अनेक प्रसंग डोळ्यासमोर तरळून गेले. मला काय लिहू आणि काय नको, असं झालं. फोनवर फक्त ‘हॅलो’ म्हटलं तरी तब्येत बरी आहे की नाही, हे त्यांना कळायचं. “काय गं बरं वाटत नाही का? येतेस का घरी” असं म्हणायचे. खूप लहान असतानाचा प्रसंग. मला गालतरेला जायचे होते. मी म्हटलं, “गाडी द्या ना.” तर चिडून म्हणाले, “कशाला गाडी लागते? बसने किंवा मिनीडोअरने जा. गाडी मिळणार नाही.” तो प्रसंग मोठं होईपर्यंत कायमचा डोक्यात घर करुन राहिला आहे. म्हणूनच आता आतापर्यंत बराच प्रवास हा एसटी महामंडळाच्या लाल डब्याने करताना कुठेही आमदाराची किंवा मंत्र्याची मुलं असल्याचा लवलेश मनाला शिवला नाही. असे एक ना अनेक प्रसंग आहेत. त्यांनी स्वतः इतक्या वर्षांत अनेक पदे भूषवली. पण, त्या पदांचा मोठेपणा त्यांनी कधीही मिरवला नाही आणि कधी आमच्याही डोक्यात जाऊ दिला नाही.
 
 
२०१० मध्ये दादांच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी विनोद तावडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. त्यांनी त्या प्रसंगी दादांचे जवळचे सहकारी व मित्र बाबाजी काठोळे यांच्याशी झालेला संवाद सांगितला. तावडे साहेबांनी सरांना सांगितले की, “सवरा साहेब 60 वर्षांचे वाटतच नाहीत आणि त्यांचा कामाचा उरक व रोजचा प्रवास बघता तर अजिबातच वाटत नाहीत. काय हो सर आपण बाहेर वाघ, पण घरात काही चालत नाही. सवरा साहेब इतके साधे, सतत हसतमुख, कधी कुठल्या कार्यकर्त्यांवर किंवा माणसावर चिडलेलं त्यांना बघितलं नाही आणि ऐकलं नाही, यांच्या घरात कसं आहे हो?” “घरात सवरा साहेब एकदम टेरर” - इति बाबाजी सर.
 
 
आणि याचाच परिणाम की काय, आम्ही तीनही मुलं उत्तम शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करत आहोत. दादांची काम करण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत बघत त्यांच्या सहवासात घडत मोठे झालो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु केली. आणखी खूप काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहवासात करायचं होतं. दादांना सतत खंत असायची की, आपण घरात, मुलांना वेळ देऊ शकत नाही. परंतु, असे असले तरी त्यांचं आमच्यावर बारीक लक्ष असायचं. अशीच माझ्या दहावीच्या वर्षाची आठवण. शाळेत असताना अभ्यासाकडे फारसं लक्ष दिलं नाही मी. कोणी विचारत नव्हतं. त्यामुळे फार वाटायचंही नाही. बेताचे गुण मिळायचे. डोकं बरं होतं, पण मनापासून कधी लक्ष दिलं नाही. पण, प्रगतिपुस्तकावर दादांची सही घेण्याची वेळ आली की खूप भीती वाटायची. आई सही करायची नाही. कारण, मुलांची शालेय प्रगती साहेबांना माहिती असावी, अशी तिची इच्छा. दहावीचं वर्ष ‘टर्निंग पॉईंट’ असल्यामुळे (म्हणजे असं सगळे म्हणायचे) ‘व्हेकेशन क्लासेस’, जादा क्लास, नेहमीचे क्लास असं जरा विशेष लक्ष अभ्यासाकडे देत होतो. रात्री अभ्यासाची सवय असल्यामुळे जागून अभ्यास करायचे. दादा रात्री उशिरा यायचे. खोलीत लाईट चालू दिसला की खोलीमध्ये डोकावायचे. रात्री जाग आली तरी रूममध्ये येऊन बघायचे. मी अभ्यास करताना दिसले की, माझ्यासाठी स्वतः चहा बनवायचे आणि मला आणून द्यायचे. “लवकर झोप. फार जागरण करू नको. सकाळी लवकर उठायचं आहे ना, त्रास होईल,” असंही समजावयाचे.
 
 
 
त्यांनी उठसूठ कौतुक करून डोक्यावर नाही घेतलं कधी, पण आम्ही हाती घेतलेल्या कामाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत राहिले. आम्ही त्यांच्या डोळ्यात आमच्याविषयीचं कौतुक बघत होतो. आम्ही काय करतोय, याकडे त्यांचं लक्ष असायचं. एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तरी न ओरडता ते शांतपणे समजवायचे, पटवून द्यायचे. त्यामुळे आम्हालाही एखादी गोष्ट करताना ‘हे दादांना आवडेल का, या गोष्टीवर दादा काय प्रतिक्रिया देतील,’ असा विचार करायची सवय लागली. बरं वाटत नसलं की, डोक दाबून दे. खोकला झाला की, मध-हळद घे, उपाशी झोपू नका. थोडं दूध प्या, अशा लहान लहान गोष्टींवरून त्यांनी आपली काळजी आणि प्रेम व्यक्त केलं. इतके हळवे माझे दादा. आयुष्यात असलेली कित्येक व निर्माण केलेली अनेक नाती जपली व त्या प्रत्येक नात्यांना जोडून आलेलं प्रत्येक कर्तव्य निष्ठेने पार पाडत हा वटवृक्ष निश्चयाने आणि खंबीरपणे उभा होता. वादळात सापडलेल्या अनेक जहाजांना दिशा दाखवत हा दीपस्तंभ संयमाने व अविरतपणे आपले कर्तव्य बजावताना कधीही चुकला नाही की थकला नाही. या असामान्य कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तीची, त्याचबरोबर हळव्या, प्रेमळ मनाच्या पित्याची मुलगी असणेही केवळ अहोभाग्य! या ऋणातून उतराई होणे नाही. त्यांना इच्छित असलेले कार्य सदैव आमच्या हातून घडत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. मला खात्री आहे की, आम्ही आमच्या कर्तव्याला चुकू नये यासाठी ते कायम आमच्यावर लक्ष ठेवून असतील व कर्तव्यपूर्तीसाठी लागणारा विवेक राखण्यासाठी आम्हाला सतत मार्गदर्शन करतील.
 
 
- निशा सवरा
 
 
@@AUTHORINFO_V1@@