सर्वस्पर्शी विकासकार्यी कटिबद्ध झालेली कारकिर्द

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Laxman Topale_1 &nbs
 
 
 
सन १९९० पासून २००९ पर्यंत दोन दशके वाडा विधानसभा मतदारसंघाचे, २००९ पासून भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे, तर २०१४ पासून २०१९ पर्यंत विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व ज्यांनी केले, ते महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, विष्णुजी सवरा यांचे वयाच्या ७१व्या वर्षी बुधवार, दि. ९ डिसेंबर, २०२० रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या राजकीय जीवनाचा, कारकिर्दीचा मागोवा घेत असताना अनेक आठवणींचा, भाव भावनांचा चल चित्रपट माझ्या मनश्चक्षूपुढे तरळू लागला.
 
 
सन १९६६ ते १९७७ या कालावधीत भिवंडी येथील बी. एन. एन कॉलेजमध्ये मी शिकत असताना माझं ज्ञानाचं, अनुभवाचं क्षितिज जसं विस्तारलं, तशी अनेक विचारप्रणालींची ओळख मला त्या काळात झाली. संस्था, संघटनांचा परिचय झाला. त्या काळात मी कॉलेज हॉस्टेलमध्ये राहत होतो. हॉस्टेल विद्यार्थ्यांकडून एक-एक नवलाईच्या वार्ता कानी यायच्या - कल्याणचे नगराध्यक्ष महामना कै. माधवराव काणे, आपलं शहरी सुखसमृद्धीचं जीवन दूर सारून, ठाणे जिल्ह्याच्या उत्तर टोकाला असलेल्या तलासरी जवळ एका बाजूला टेकडीच्या पायथ्याशी कुटी बांधून राहिलेत, तर दुसरे ऋषितुल्य महामना कै. दामुअण्णा टोकेकरही मनोरच्या आंभाण गावात आश्रमाची स्थापना करून हिंदू धर्म, संस्कृती संवर्धनासाठी वानप्रस्थ जीवन व्यतीत करीत आहेत. आपल्या हृदयी असलेल्या आदिम वनवासी बांधवांच्या कळकळीने ते दोघे वनवासी बांधवांची अनघड पोरं पोटाशी धरून त्यांना धुऊन-पुसून त्यांच्यावर सुसंस्कारांची पेरणी करीत राहिले. अशा दुर्गम, दुर्लभ डोंगर-दर्‍यांत त्यांना वादळ, वारे अन् ऊन-पावसाशी, चोरा-चिलटांशी, विंचू-काटमांशी सामना करावा लागला, तसाच फुत्कार टाकीत आलेल्या खर्‍या अन् मानव रूपातल्या सापांशीही लढा द्यावा लागतोच, अशा वार्ता कानावर येत राहिल्या. त्यांच्या सुसंस्कारांत वाढलेली मुले पुढील शिक्षणासाठी कॉलेजची पायरी चढू लागली. त्यांच्या निवासाची सोय हनुमान टेकडीवरच्या विहिंप संचालित वसतिगृहात केली इ. इ. प्रत्यक्षात मात्र, या महामनांच्या दर्शनाचं भाग्य अन् त्यांनी घडविलेल्या या भाग्यवान विद्यार्थ्यांच्या गाठीभेटीचा योग येत नव्हता.
त्यांनी घडविलेली, पैलू पाडलेली रत्ने म्हणजे विष्णुजी सवरा आणि चिंतामणजी वनगा. सवरा-वनगा यांना जोडगोळी म्हणायचं की, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हणायचं? असा संभ्रम इतरांना पडावा इतकी एकात्मता, समरसता त्यांच्यात माझ्यासारख्या तिर्‍हाईतांना वाटत असे. एक नाव घेतलं की, दुसरं आठवणारच इतकी तादाम्यता या नावात होती, अगदी राम-लक्ष्मणासारखीच! मला तर दोघांचा हेवा वाटत असे. कारण, या दोघांनाही प्रदीर्घकाळ माधवराव काणे अन् दामुअण्णा टोकेकर यांचा सहवास लाभला. त्यांनी दिलेल्या शिकवणीचं, सुसंस्काराचं अमृतपान करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. मला तसं काहीच लाभलं नाही!
१९७७ मध्ये आणीबाणी उठली. अनेक पक्षांची, नेत्यांची दिलजमाई होऊन त्या काळात ‘जनता पक्ष’ स्थापन झाला. १९७८ मध्ये वाडा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येऊन या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत एकेकाळचे जनसंघाचे अन् नंतरच्या जनता पक्षाचे सोमनाथ वाणी निवडून आले. दिल्लीत सहावी लोकसभा अस्तित्वात आली अन् आपापसातील मतभेद अन् दुहीमुळे अल्पकाळ म्हणजे दि. २३ मार्च, १९७७ ते १४ जानेवारी, १९८० पर्यंत जेमतेम टिकून बरखास्त झाली. जे देशात, तेच महाराष्ट्रातही घडले! १९८० मध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. विष्णुजी सवरा यांनी १९८० पासून भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून आपली ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची नोकरी सोडून कामाला सुरुवात केली. त्या काळात सा. पथिक तसेच दि. २३-२४ मे, १९८२ या दोन दिवसात संपन्न झालेल्या वणी (जि. यवतमाळ) येथील आदिवासी साहित्य संमेलनाच्या निमित्तामुळे वसंतराव उपाख्य अप्पासाहेब पटवर्धन आणि सुनंदाताई यांच्या भेटीचा सुयोग येत राहिला. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी, जीवनछायेत माझे या ना त्या निमित्ताने जाणे होऊ लागले. या जीवनछायेतच माझी विष्णुजी सवरा यांची भेट झाली होती. त्यांनी सोन्याची अंडी देणारी स्टेट बँकेतली नोकरी सोडली अन् ते राजकारणात आले. त्यावेळी त्यांच्या या बेहिशोबीपणाचं मला नवल वाटलं होतं! त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणायचे, "मला राजकारण आवडत नव्हतं, तरी मी राजकारणात आलो!" खरंच राजनीती ही वारांगणेप्रमाणे अनेक सोंगे घेणारी असते. अशा राजकारणात विष्णुजी सवरा यांनी का पडावे? त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ते म्हणायचे, "समाजाची सेवा करण्यासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम आहे." ‘राजकारण कर’ अशी गुरू आज्ञा झाली आणि विष्णुजींनी ती शिरसावंद्य मानली आणि ते राजकारणात आले! १९८० पासून ते राजकारणात पडले. म्हणजे अक्षरशः १९८० मध्ये आणि १९८५ मध्ये झालेल्या वाडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे राहून ते पडले! "काय ‘पडेल’ उमेदवार? कसं काय बरं आहे ना?" म्हणून मी जीवनछायेत त्यांची ‘फिरकी’ घेतली होती. आज ते आठवलं की, मलाच शरमल्यासारखं होतं. पण, अशाही तब्बल दहा वर्षांच्या अपयशी काळात, अपयश हीच संधी मानून त्यांनी आपला मतदारसंघ अगदी पिंजून काढला. लोकसंपर्क वाढवला. ‘दिसं जातील, दिसं येतील’ या न्यायाने काळावर नजर ठेवून त्यांनी धीरोदात्तपणे वाटचाल केली. या काळात खचून न जाता, भविष्याचा वेध घेत, विशेष म्हणजे, सकारात्मक दृष्टी ठेवून आपल्या क्षमतेचा पुरेपूर कस लावून आपले कर्तव्य ते पार पाडीत होते.
ठोकरे खाईये, पत्थर भी उठाते चलिए
आनेवालों के लिए, राह बनाते चलिए
अपना जो फर्ज हैं, वो फर्ज निभाते चलिए
गम हो जिसका भी, उसे अपना बनाते चलिए
या नौशादजींच्या उक्तीप्रमाणे वाटचाल करीत होते. या काळात कोणा विचारवंताने म्हटल्याप्रमाणे, "Go to the masses, live with them, learn from them and then. Act for them." यानुसार त्यांची तेव्हा जीवनशैली होती. १९९० पासून विष्णुजी सवरा यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांची विजयाची घोडदौड निवडणुकीत सुरू झाली ती सन २०१४ पर्यंत. पण, विजयश्रीने प्रसन्न होऊन त्यांना लागोपाठ अनेक वेळा माळ घातली, तरी ते उतले नाहीत, मातले नाहीत, घेतला वसा टाकला नाही. या वृत्तीनेच वागले. ‘मला पहा अन् मला फुलं वाहा’ या प्रकारच्या व्यक्तिपूजेच्या वृत्तीपासूनही ते कटाक्षाने दूरच राहिले. आपल्या मतदारसंघाचा अभ्यास करून शेतकरी कर्जमुक्ती लढा, दुष्काळ, वनवासी बालकांचे कुपोषण, अतिवृष्टीसारखे संकट, बेरोजगारी, कोतवालांचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ठाणे जिल्हा विभाजन इ. विविध प्रश्नांना विधानसभेत त्यांनी वाचा फोडली. जनतेचे प्रश्न वेशीला टांगले, समस्या सोडवल्या, युतीच्या काळात त्यांना मंत्रिपदाची सहा महिन्यांची आणि पुढे २०१४ मध्ये आदिवासी विकासमंत्री अन् नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. या संधीचा त्यांनी जनसेवेसाठी आणि विकासासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला व आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. तरुणांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडास्पर्धांसारख्या उपक्रमांना त्यांनी चालना दिली. आपल्या मतदारसंघात त्यांनी चौफेर कामे केली. वाडा येथे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी डेपोची निर्मिती आपल्या मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे (आयटीआय) सुरू केले. दि. २७ जून, १९९९ हा दिवस विक्रमगड गावाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण, विष्णु सवरा यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने विक्रमगड तालुक्याची निर्मिती करून, या गावाची शान वाढविली आहे, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करायला हवे.
मतदारांकडे पाठ फिरविलेल्या कृतघ्न विजयी उमेदवाराच्या बाबतीत ‘निवडणुकीपुरते आश्वासन’ आणि ‘निवडून आला अन् मतदारांना विसरला’ अशा उपरोधिक म्हणी प्रचारात आल्या आहेत. पण, या म्हणी विष्णुजी सवरा यांनी खोट्या ठरविल्या, हे त्यांच्या कारकिर्दीत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या ‘वचनपूर्ती’ अहवालांचा अभ्यास केल्यावर दिसून येते.आपल्या मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखांशी एकरूप होऊनच त्यांनी जनतेच्या समस्या सोडविल्या. त्यांचे प्रश्न वेशीवर टांगून वाचा फोडली. जनतेच्या सर्वांगीण विकासाठी ते धडपडले. प्रत्यक्ष कार्यवाही करून विकासकामे साकार केली. अशी असंख्य कामे पूर्ण करून जाडजूड कार्य अहवाल त्यांनी सादर केले. तरीही ते मनाने संतुष्ट नव्हते. आपला कामाचा विस्तार झाला पाहिजे, कामाचे जाळे विणले गेले पाहिजे, असे त्यांना वाटत असे अन् त्यासाठी ते अहर्निश धडपडत असत.
आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न, बेरोजगारी, उपासमार इ. स्वातंत्र्यानंतर आजही जसे होते तसेच आहेत, याची खंत वाटते. वर्षातील आठ महिने लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. मतदारसंघातील गरीब माणसं रोजगाराला बाहेर गावी जात नाहीत, तर त्यांच्याच शब्दांत सांगायचे, तर ‘ते जगायला जात असतात,’ हे कटू सत्य आहे. वीट धंदा, भात कापणी, खंड्या म्हणून मासेमारी बोटीवर जीव धोक्यात घालून जात राहतात, तिथेही अन्याय, अत्याचार होतात अन् ते निमूटपणे अगतिक होऊन सहन केले जातात. गावच्या गावे या आठ महिन्यांत ओस पडत असतात. त्यात भरीस भर म्हणजे, या गरीब-दीनदुबळ्या जनतेच्या लाचारीचा, अज्ञानाचा फायदा अराष्ट्रीय प्रवृत्तीच्या यंत्रणा उठवीत असतात. प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर होते, अशी खंत ते वेळोवेळी व्यक्त करीत. "केलं त्यापेक्षा पुष्कळ कार्य बाकी आहे, अजून पुष्कळ पल्ला गाठायचा राहिला आहे," असे ते म्हणत. असे आपल्या मतदारसंघातील जनतेविषयी आपुलकी, प्रेम, कळकळ वाटत असलेले लोकप्रतिनिधी, माजी मंत्री विष्णुजी सवरा आता आपल्या नाहीत. त्या अजातशत्रू लोकप्रतिनिधीला ही भावपूर्ण श्रद्धांजली.
- लक्ष्मण टोपले
(लेखक वनवासी कल्याण आश्रमाच्या महाराष्ट्र
व कोकण प्रांताचे माजी अध्यक्ष आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@