विष्णु सवरांच्या कर्तृत्वाचा दीपस्तंभ अविरत तेवेल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Kedarnath Mhatre _1 
 
 
 
 
आपल्या चिल्या-पिल्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना पाठीशी घेऊन मोलमजुरी करण्यासाठी दरवर्षी दूरवर परगावी जाणे, ज्याला वनवासी ‘जगाय चाल्लू’ असे म्हणतात. अशा पूर्वाश्रमीच्या ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम जंगली भागांतील तालुक्यांपैकी वाडा तालुक्यातील गालतरे या वनवासी पाड्यावर दि. १ जून, १९५० रोजी सवरा दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. हिंदुत्वाच्या संस्काराचा पगडा असलेल्या, सवरा कुटुंबीयांनी बालकाचे नाव ‘विष्णु’ असे ठेवले. याच विष्णुने पुढे अखंड दारिद्य्राच्या गाळांत रुतलेल्या, खितपत पडलेल्या वनवासी समाजाचा उद्धार केला व आपले ‘विष्णु’ हे नाव सार्थ केले!
सावळा वर्ण, मध्यम उंची, सडपातळ बांधा व डोळ्यांत आत्मविश्वासाचे तेज, पांढरा सदरा-लेहंगा असा पेहराव. असे व्यक्तित्त्व असलेल्या विष्णु सवरांचे पहिली ते चौथी इयत्तेपर्यंतचे शिक्षण जन्मगावी गालतरे येथे, इयत्ता पाचवी गोर्‍हे गावी, तर सहावी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालय येथे आदिवासी सेवासंस्थेच्या वसतिगृहात राहून झाले. अभ्यासात चुणूक दाखविणार्‍या आपल्या मुलास त्यांच्या पित्याने मोलमजुरी, कर्ज काढून शिक्षणासाठी हातभार लावला. कॉलेज शिक्षणासाठी बी. एन. एन. कॉलेज, भिवंडी येथे धाडले. या कॉलेजातच तलासरी येथून शिकण्यास आलेल्या चिंतामण वनगा यांच्यासारखा विद्यार्थीमित्र त्यांना लाभला. सन १९७३ साली त्यांनी बी. कॉम. पदवी मिळविली.
 
 
भिवंडी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते माधवराव काणे यांच्या ते संपर्कात आले व त्यांनी त्यांना राष्ट्राभिमानाचे बाळकडू पाजले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर तलासरी येथे दुग्ध प्रकल्पात नोकरी करून संघाच्या वनवासी केंद्राचे कामही ते पाहत असत. पुढे त्यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. नोकरीत स्थिर झाल्यावर जव्हार रहिवासी जयश्री यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसारात स्थिर झालेल्या विष्णु सवरांना गुरू माधवराव काणे यांनी सक्रिय राजकारण करण्यासाठी नोकरी सोडण्याचा आदेश दिला. घरच्यांनी व सासरच्यांनीही त्यांना नोकरी सोडू नये म्हणून आग्रह केला. द्विधा मनःस्थितीत असलेल्या सवरांना गुरू माधवराव काणे म्हणाले की, “विष्णु, तू नोकरी करून तुझा स्वतःचा संसार सुखाचा करशील; पण तुझ्या समाजातील दीन- दुबळ्यांचा संसार कोण सावरणार? त्यांना मदतीचा हात कोण देणार? तुला सार्‍या समाजाचा संसार करायचा आहे.” गुरूंची आज्ञा सवरांनी शिरसावंद्य मानली व नोकरी सोडली!
 
 
सन १९८० साली त्यांनी वाडा विधानसभा निवडणूक लढवली व ते पराभूत झाले! पराभवामुळे डगमगून न जाता, १९८५ साली पूर्ण तयारीनिशी त्यांनी पुन्हा वाडा विधानसभा जिद्दीने लढवली. मात्र, त्यांची थोड्या मतांनी हार झाली! दोनदा निवडणूक हरल्यावर त्यांना काही काळ वैफल्याने ग्रासले होते. अशा स्थितीतही स्वतःला सावरून संघाच्या भिशीतून वाढलेल्या या कार्यकर्त्याने पुन्हा जोमात तयारी केली व १९९० साली निवडणूक जिंकून वाडा विधानसभेची जागा काबीज केली! आमदारपद प्राप्त होताच त्यांनी कामाचा सपाटा लावून सलग सहा वेळा आमदारकीची निवडणूक जिंकण्याचा महापराक्रम केला. जनतेशी सतत संपर्क, लग्नसमारंभास जाणे, अंत्ययात्रेस जाऊन मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे, छोट्या-मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहणे व विकासकामांचा सपाटा म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली व जनतेत ‘कार्यसम्राट’ म्हणून विष्णु सवरा अल्पावधीत प्रसिद्ध झाले.
 
 
आपल्या वक्तृत्वाने ते सर्वांनाच आकर्षित करीत. भाषणांत आपल्या शारीरिक ठेवणीचे वर्णन करताना ते गमतीने म्हणत, “माझ्याकडे बघा, केवढा सडपातळ मी. कोणाला वाटेल, हवा आली तर उडून जाईल. पण, मी लेचापेचा नाही, सर्वांना पुरून उरेन. आमची भारतीय जनता पार्टी फक्त शेठजी-भटजींची पार्टी नाही, तर सर्वसमावेशक आहे.” विधानसभेत व लोकसभेत वनवासी लोकप्रतिनिधींची संख्या भाजपमध्ये मोठी असल्याचे ते आकडेवारी देऊन सांगत. त्यांनी केलेल्या कामाची उद्घाटने कधी कधी विरोधी पक्षाचे लोक करीत, त्यास ते कधी विरोध करीत नसत. ते म्हणत, “जनतेस मी केलेली कामे माहीत आहेत. जनता मूर्ख नाही. जनतेला फसवणारे स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत.”
 
 
विष्णु सवरांच्या पत्नी जयश्री वहिनींनी शिक्षकाची नोकरी करून संसारास हातभार लावला. सवरांना तीन मुले आहेत. असे म्हणतात, ‘डॉक्टरांची मुले जंताने मरतात, शिंप्याची मुले फाटके कपडे घालतात!’ पण, जगाचा संसार करणार्‍या सवरांनी आपल्या मुलांची आबाळ होऊ दिली नाही. त्यांचा मुलगा हेमंत डॉक्टर आहे. छोटा मुलगा विमान चालविण्याचे शिक्षण घेत आहे. मुलगी निशा पदवीधर आहे. सवरांचे काका कै. पांडू सवरा हे फार पूर्वी वसई तालुक्यात कामणदुर्ग डोंगराच्या पायथ्याशी स्थायिक झाले आहेत. ते व त्यांचे कुटुंबीय घरंदाज वनवासी कुटुंब म्हणून सुपरिचित आहेत.
 
 
पूर्वी वसईत शिरसाड येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक झाली होती. साहजिकच वसईच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्याच्या सेवेसाठी नेमणूक झाली. डॉ. उमेश पै यांनी मी पक्षकार्यकर्ता नसतानाही वसईस संघशाखेत जात असल्याने मला त्या कार्यकर्त्यांसोबत सहभागी होण्याची संधी दिली. तेथेच प्रमुख नेत्यांना भेटण्यासाठी आलेल्या विष्णु सवरांची माझी ओळख झाली. त्यानंतर मी भाजपचा सक्रिय सभासद झालो. वसई तालुक्यात अनेक विकासकामांसाठी, पक्षबांधणीच्या कामासाठी, आंदोलनासाठी विष्णु सवरा येत असत, आम्हाला मार्गदर्शन करीत असत. आम्ही कामण नदीवर श्रमदानाने बांधलेल्या वनराई बंधार्‍यांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी येऊन सवरा व खासदार वनगा यांनी त्यांचे कौतुक केले होते व भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले होते.
 
 
राजकारण आज वेगळ्या वळणावर आहे. धनदांडगे, राजकीय वारसा लाभलेल्यांचीच मुले आज सगळीकडे राजकारणात महत्त्वाच्या पदावर दिसतात. मात्र, विष्णु सवरा व अ‍ॅड. चिंतामण वनगा यांना कुठलाच राजकीय वारसा नसताना प्रतिकूल परिस्थितीत झगडत, आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्ष वाढविला. ते पक्षाचा चेहरा बनले. दुर्गम वनवासी भागांत विकासाची गंगा आणली! बलराम व श्रीकृष्ण या जोडीप्रमाणे या भागात त्यांनी झोकून कार्य केले. खासदार वनगांच्या निधनानंतर ही जोडी फुटली व सर्व जबाबदारी सवरांवर येऊन पडली. विष्णु सवरांचे खासदार होण्याचे स्वप्न होते, ते अपुरेच राहिले! नियतीचा खेळ!
 
 
दुसर्‍यांदा आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर विष्णु सवरांनी विकासकामांचा धुमधडाकाच लावला. त्यामुळे अगोदरच वाढलेला भाजपचा प्रभाव जोमाने वाढू लागला. हतबल विरोधकांनी मग त्यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्याची मालिकाच सुरू केली. त्यांच्या घरावर मोर्चे काढण्यापर्यंत विरोधकांची मजल गेली. ते कमी की काय, म्हणून त्यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या गेल्या! सवरांना स्वतः पुढे येऊन अफवांचे खंडन करावे लागले होते. सवरा डगमगले नाहीत. सर्वांना पुरून उरले, तळपत राहिले.
 
 
सच्चा संघ स्वयंसेवक, पारदर्शी प्रामाणिकता, एक शुद्ध व्यक्तित्व, व्रतस्थ जनसेवक, सात्त्विक संवेदनाशील राजकारणी, सदाचाराचा प्राजक्त, कुशल संघटक, अशा किती तरी उपाधी विष्णू सवरांच्या नावापुढे शोभून दिसतात. वनवासी नेत्यांच्या इतिहासात ज्या मोजक्या थोर वनवासी व्यक्तींची नावे नोंदविली गेली आहेत, त्यात विष्णु सवरा हे नाव ठळकपणे समाविष्ट झाले आहे. विष्णु सवरांच्या मृत्युसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. शरीराने साथ दिली असती, तर अजूनही मोठी-मोठी कामे त्यांच्याकडून झाली असती. त्यांच्या जाण्याने वनवासी विद्यार्थ्यांचे, समाजाचे, भाजपचे फार मोठे नुकसान झाले आहे. भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे अविरत तेवत राहील, मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून कार्यकर्त्यांनी कार्य करीत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कुटुंबीयांना दुःख सावरण्याची शक्ती परमेश्वर प्रदान करो, ही ईश्वराकडे प्रार्थना!
 
 
- केदारनाथ म्हात्रे
@@AUTHORINFO_V1@@