भाजप व वनवासींशी कायम नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Kapil Patil_1  


विष्णु सवरा उर्फ सवरा साहेब म्हणजे तत्कालीन ठाणे ग्रामीण भाजपमधील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. अत्यंत साधे राहणीमान, प्रामाणिकपणा, कायम भाजपचा विचार आणि वनवासी बांधवांसाठी तळमळ ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये. सवरा साहेबांना भेटण्यासाठी कधीही भाजपचा कार्यकर्ता वा सामान्य नागरिकांना ‘अपॉईंटमेंट’ घ्यावी लागली नाही. कायम जनतेच्या गराड्यात राहणे हा त्यांच्या दिनचर्येचाच भाग असावा. आदिवासी विकासमंत्रिपद भूषविण्याचा मान सवरा साहेबांना दोन वेळा मिळाला. या काळात त्यांच्या कार्याचा ठसा आदिवासी विकास विभागावर उमटला. आपल्या सुमारे ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा काळा ठिपकाही लागला नाही, असे मंत्री होणे नाही.
१९९० ते २०१९ अशी सुमारे ३० वर्षे आमदारकी कायम ठेवणाऱ्या सवरा साहेबांची कार्यपद्धती अद्वितीय होती. त्यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे भाजपबरोबरच सध्याचा पालघर जिल्हा व भिवंडी तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. सवरा साहेबांची कार्यपद्धती कायम आपल्या लक्षात राहील. वाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व साहेबांनी अनेक वर्षं केले. भिवंडी तालुक्याच्या काही भागाचा तत्कालीन वाडा मतदारसंघात समावेश होता. त्यामुळे त्यांच्याकडे विधानसभेत भिवंडी तालुक्याचेही प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी होती. भिवंडी पंचायत समितीचा सदस्य म्हणून माझी १९९२ मध्ये निवड झाली होती. त्यावेळी माझी त्यांच्याबरोबर पहिली भेट झाली होती. काही मिनिटांच्या भेटीत माझ्याकडून भिवंडी तालुक्याच्या गावांमधील विद्यमान प्रश्न व भविष्यातील आव्हाने आदी माहिती मांडली गेली. त्यानंतर काही दिवसांनंतर मला सवरा साहेबांनी स्वत:हून फोन केला. विधिमंडळाच्या अधिवेशनात भिवंडीच्या ग्रामीण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर विधिमंडळात प्रश्न मांडून राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर माझा त्यांच्याबरोबर संवाद सुरू झाला. आमदार व एक पंचायत समिती सदस्य असे अंतर न ठेवता, ते नेहमी आपुलकीने विचारपूस करीत. त्यानंतर जनतेच्या समस्यांविषयी चर्चा करीत असत. पंचायत समितीला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबतही मी त्यांना माहिती दिली होती. पंचायत समितीबरोबरच ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त अधिकार मिळावेत, हा त्यांचा दृष्टिकोन होता. सरकारीबाबूंकडून अनेक वेळा परिस्थितीपेक्षा विसंगत माहिती देऊन दिशाभूल केली जाते. मात्र, कार्यकर्ते व नागरिकांच्या माध्यमातून सखोल माहिती स्वत:कडे ठेवण्याची त्यांची हातोटी होती. त्यांचा हा गुण मला विलक्षण भावला.
 
माझी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी २००५ मध्ये निवड झाली. त्यावेळी माझ्याकडे शिक्षण व अर्थ समितीचे सभापतीपद होते. या काळात सवरा साहेबांकडून आलेल्या पत्रांमधून त्यांची वनवासी व ग्रामीण भागातील शिक्षणाविषयी आस्था प्रकट होत होती. शहरी व निमशहरी भागातील शाळांप्रमाणेच माझ्या वनवासी भागातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचा कटाक्ष होता. राज्य विधीमंडळात शिक्षण विभागाच्या चर्चेत माहिती झालेले अनेक उपक्रम त्यांनी पत्राद्वारे ठाणे जिल्हा परिषदेला कळविले होते. शैक्षणिक क्षेत्रात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर त्यांचा कटाक्ष होता. आदरणीय माधवराव काणे यांच्या तलासरी येथील आश्रमशाळेत सवरा साहेबांचे शिक्षण झाले होते. एका भेटीवेळी मला त्यांनी तेथील अभ्यास व शिस्तीची माहिती दिली. शिक्षणामुळे वनवासींची निश्चितच प्रगती होईल, हे त्यांचे ठाम मत होते. तलासरी येथील आश्रमशाळांप्रमाणेच वनवासींसाठी आश्रमशाळा झाल्यास प्रगती निश्चित होईल, या जाणिवेतून आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्येही सुधारणा करण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते.
 
माझ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आमच्या संवादात वाढ झाली होती. विधिमंडळ समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक जिल्हा परिषदांचा कारभार पाहिला होता. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रगतीसाठी अनेक सूचना केल्या होत्या. त्यावेळी ठाणे जिल्हा परिषद राज्यात सलग दोन वर्षे प्रथम क्रमांकावर होती. त्यात सवरा साहेबांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितच वाटा होता. भाजपतर्फे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २०१४ मध्ये मी लढविली. त्यावेळी ते भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत एकत्र राहून विविध गावांमध्ये प्रचार करता आला. त्यांची प्रचाराची पद्धत अनोखी होती. विविध पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची त्यांना माहिती होती. प्रत्येक कार्यकर्त्याची बलस्थाने व उणिवा त्यांना मुखोद्गत होत्या. भाजपच्या प्रमुख व युवा कार्यकर्त्यांना ते नावाने ओळखत होते. प्रत्येक भेटीत परिस्थितीची माहिती घेऊन ते आराखडे निश्चित करत. त्यानंतर ते अंदाज पक्षाच्या बैठकीत मांडत होते. त्यांची प्रचाराची पद्धत मला निश्चितच भावली. माझ्या विजयानंतर मला सदिच्छा देतानाच, त्यांनी आपल्याला भिवंडी लोकसभा मतदारसंघात ‘शत प्रतिशत भाजप’ करायचा आहे, असा निर्धारही केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे सोपविली होती. त्यानंतर आम्ही सातत्याने दोन्ही जिल्ह्यांच्या विविध भागांत दौरे करून भाजप आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेपेक्षा भाजपला जादा जागा मिळाल्या. त्यांच्याच कारकिर्दीत पालघर जिल्हा परिषदेत पहिले अध्यक्षपद भाजपला मिळाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा तलासरीतील अभेद्य गडही भेदला गेला. पालघर जिल्ह्यातील गावागावांमध्ये भाजप पोहोचविण्यात सवरा साहेबांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. सवरा साहेबांच्या निधनाने पालघर जिल्ह्यातील भाजपचा एक ‘मोहोरा’ हरपला. त्याचबरोबर लाखो वनवासींचा जीवाभावाचा व हक्काचा लोकप्रतिनिधी गमावला. विष्णु सवरा साहेबांना विनम्र श्रद्धांजली...!
 
 
ठाणे जिल्हा विभाजनाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान
 
 
भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्याबरोबरच विष्णु सवरा यांचेही ठाणे जिल्हा विभाजनाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. वर्षानुवर्षे दारिद्य्रात असलेल्या जव्हार, मोखाडा आणि तलासरी भागासाठी जिल्हा विभाजन गरजेचे असल्याचे त्यांचे ठाम मत होते. जव्हार तालुक्यातील वावर-वांगणी येथील बालमृत्यूकांड घडल्यानंतर, तेथील वनवासींची व्यथा त्यांनी विधिमंडळात मांडली होती. वनवासींच्या हालअपेष्टा व भूकबळींचे वर्णन ऐकून राज्यभरातील संवेदनशील नागरिक हळहळले होते. भाजपचा कार्यकर्ता, आमदार ते मंत्रिपदापर्यंत आपल्या कारकिर्दीत सवरा साहेबांनी सातत्याने विभाजनाचा प्रश्न मांडला. ते तालुका विभाजनासाठीही प्रयत्नशील होते. त्यातून १९९९ मध्ये विक्रमगड हा नवा तालुका निर्माण करण्यात आला, तर २००८ मध्ये ठाणे जिल्हा विभाजन प्रत्यक्षात आल्यावर सवरा साहेबांचा लढा यशस्वी ठरला. नव्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविण्याची संधी त्यांना २०१४ मध्ये मिळाली. त्यांनी आपल्या साडेचार वर्षांच्या पालकमंत्रिपदाच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लावले होते. माझ्या लोकसभा मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याचा काही भाग आहे. त्यामुळे अनेक वेळा सरकारी बैठकांमध्ये सवरा साहेबांची पालघर जिल्ह्याविषयी कळकळ पाहावयास मिळाली. या काळात पालकमंत्री म्हणून एक संयमी, अभ्यासू आणि तळमळीचे नेतृत्व पालघरवासीयांनी अनुभवले.
 
- कपिल पाटील

(लेखक भिवंडी लोकसभा मतदारसंघांचे
खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@