समाजमन जाणणारा नेता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

Jagganath Patil_1 &n
 
 
विष्णुजी २०१४ची विधानसभा निवडणूक विक्रमगडमधून लढले व जिंकले. सहावेळा निवडणूक जिंकणे अजिबात सोपे नाही. पण, प्रचंड दांडगा जनसंपर्क, वैयक्तिक संबंध आणि लोकांची केलेली कामे म्हणूनच ते निवडून आले. सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे पहिल्या यादीतच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. खऱ्या अर्थाने गरीब, वनवासी आणि इतर समाजाचेही अनेक प्रश्न सोडविले होते.
आणीबाणी उठल्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला. देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अनेक राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातही निवडणुकांचे बिगुल वाजले. त्यावेळी चार पक्ष जरी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन झाला असला, तरी जागांचे वाटप घटकपक्षांच्या ताकदीनुसार झाले होते. ठाणे जिल्ह्यात त्यावेळच्या जनसंघाच्या वाटणीत ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि वाडा अशा पाच विधानसभा आल्या होत्या. जनसंघ जनता पक्षात विलीन होण्यापूर्वीपासून वसंतराव भागवत हे संघटनेचे प्रमुख म्हणून काम पाहत होते.
विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी वसंतराव भागवत कल्याणला आले होते. बैठक भगवानराव जोशी यांच्या घरी झाली. ५०-६० प्रमुख कार्यकर्ते होते. वरील पाचही विधानसभांसाठी त्यांनी नावे निश्चित केली होती. ठाणे-गजाननराव कोळी, कल्याण-रामभाऊ कापसे, उल्हासनगर-सीतलदास हरचंदानी, अंबरनाथ-जगन्नाथ पाटील आणि वाडा-सोमनाथ वाणी ही नावे घोषित केली. सर्वांना निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे मार्गदर्शन केले व बैठक संपली.
 
निवडणूक झाली. आम्ही पाचही जणं निवडून आलो. पण, महाराष्ट्रात काही सत्ता आली नाही. सत्ता आली ती दुभंगलेल्या काँग्रेसची. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे झाले. राज्यकारभार सुरू झाला. शरदराव पवारांनी बंड केला. वसंतदादांचे सरकार अल्पमतात आले आणि शरदराव पवार मुख्यमंत्री झाले. त्यावेळेपासून पक्षफुटीची बीजे महाराष्ट्रात रूजली ती आतापर्यंत!
 
 
 
केंद्रामध्ये मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते. पण, सत्तेतील घटकपक्ष एकजीव झाले नव्हते. समाजवादी पक्षांचे नेते मधू लिमये आणि सहकार्‍यांनी जनसंघाच्या नेत्यांवर दुहेरी निष्ठेचा आरोप करून टीका करायला सुरूवात केली. त्याला कंटाळून जनसंघ सत्तेतून बाहेर पडला आणि सरकार पडले.
पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. महाराष्ट्रातील सरकार बरखास्त केले आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आल्या. दरम्यान, दि. ६ एप्रिल, १९८० रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. सोमनाथ वाणी यांनी वाडा विधानसभा लढण्यास नकार दिला आणि विष्णु सवरांचा उदय झाला. सुरूवातीला तलासरीच्या दापचरी दुग्धप्रकल्पात त्यांनी नोकरी केली. नंतर स्टेट बँकेत नोकरी केली. पक्षाच्या शोधकार्यात सवरा सापडले. चांगली नोकरी सोडली आणि वाडा मतदारसंघात निवडणूक लढवली. १९८० व १९८५ या दोन वेळा त्यांचा पराभव झाला. पण, त्यांनी हार मानली नाही व जिद्दीने पक्षकार्य सुरू ठेवले. पुढे १९९०, १९९५, १९९९, २००४ अशा चार निवडणुका वाडा मतदारसंघातून ते जिंकले आणि २००९ची निवडणूक भिवंडी ग्रामीण विधानसभेतून जिंकली. विष्णु सवरांचा जन्म वाडा तालुक्यातील मौजे गालतरे या गावी दि. १ जून, १९५० रोजी गरीब शेतकरी कुटुंबात झाला. घरची गरिबी पाचवीला पूजलेली. आई-वडील घरची शेती कसत असत. अडचण आली तर दुसरीकडे कामधंदा करून कुटुंबाला आधार देत.
विष्णुंचे बालपण गावातच म्हणजे गालतऱ्यात आणि इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षणाचे प्राथमिक धडेही त्यांनी गावातच गिरविले. पुढे पाचवीसाठी गोर्‍हे येथे गेले. सहावी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण मनोर येथील हायस्कुलमध्ये पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी भिवंडी शहर गाठले. पद्मश्री पी. डी. जाधव यांच्या हरिजन गिरीजन समाज उन्नती मंडळाचे बी. एन. एन. कॉलेज येथे प्रवेश घेतला. सुरूवातीला त्यांच्या ‘विद्याश्रम हॉस्टेल’मध्ये राहिले. पण, पुढे मात्र विश्व हिंदू आश्रमाच्या वसतिगृहात राहिले. त्या ठिकाणी माधवराव काणे यांचे येणे-जाणे होते. त्यांच्या संबंधांतून, संपर्कातून विष्णु सवरा प्रभावित झाले. राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटली आणि त्यांनी सार्वजनिक कार्याची सुरूवात केली. माधवरावांच्या प्रयत्नांतून अनेक वनवासी विद्यार्थी शिक्षणासाठी भिवंडीत आले. त्यातच माजी खासदार चिंतामण वनगाही होते. माधवरावांचा परिसस्पर्श झालेले शेकडो नव्हे, तर हजारो तरूण आज नोकरी-धंद्यात, संसारात रममाण आणि समाजकार्यात सामील आहेत.
विष्णुजींचा आणि माझा संबंध १९८० पासून आला. वाडा मतदारसंघात पडघा परिसरातील २५-३० खेडी येत होती. त्यावेळी पडघ्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते मदनभाई पातकर हे जनसंघातून कार्य करीत होते. त्यांच्याबरोबर त्या गावात मते मागण्यासाठी मीही फिरत होतो. त्यावेळी नानकर गावातील पांडुरंग पाटील, वांद्रे गावचे महादू पाटील बजागे आणि अनेक कार्यकर्त्यांनी १९९० ते २००९ अशा पाच निवडणुका जिंकून येण्यासाठी आम्ही सर्वांनीच खूप खूप काम केले आणि विष्णु सवरा निवडूनही आले.
घरच्या गरिबीचे चटके कसे असतात, हा अनुभव काही नवीन नव्हता. १९७०च्या दुष्काळात रोजगार हमीच्या कामावर सात रूपये चौकडी असे काम केले. चौकडी म्हणजे १० फूट लांब, १० फूट रूंद आणि एक फूट खोल असे मोजमाप. अशी कष्टाची कामे घरासाठी व शिक्षणासाठी केली, याची जाणीव आमदार आणि मंत्री झाल्यावरही विष्णु सवरा यांनी कायम ठेवली व संपूर्ण समाजासाठी ते काम करीत राहिले.
पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे काम करण्यासाठी मी (अध्यक्ष) आणि अरविंद पेंडसे (सचिव) असा अख्खा जिल्हा पिंजून काढला. त्यावेळी चिंतामण वनगा, विष्णु सवरा, विश्वनाथ पाटील, खुपरीचे मधुकर दादा, शंकरराव भोये असे शेकडो कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने काम करीत होते. दोन-तीन दिवसांचा प्रवास असायचा. सरकारी विश्रामगृहात स्वस्ताईत मुक्काम करायचा, नाश्ता करून प्रवास सुरू करायचा. दुपारचे-रात्रीचे जेवण म्हणजे अर्धा तांदळाचा भात आणि पीठ लावलेली डाळीची आमटी आनंदात खायची आणि झोपायचे. कधीतरी कोणीतरी कार्यकर्ता चांगले जेवण देई.
मुरबाड, शहापूर, वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी, पालघर आणि डहाणू या वनवासी तालुक्यांमध्ये आज भारतीय जनता पक्ष उभा आहे, याचे श्रेय अरविंद पेंडसे, चिंतामण वनगा, विष्णु सवरा व विश्वनाथ पाटील यांना जाते. मी त्यांच्याबरोबर काम केले, पण त्यांच्याइतके नाही. विश्वनाथ पाटलांनी ‘कुणबी सेना’ स्थापन केली आणि भाजपशी घटस्फोट घेतला. पण, त्यावेळची मैत्री आजही कायम आहे. तसेच श्रीयुत संजय केळकर यांनीही पक्षसंघटना वाढीचे चांगले काम जिल्ह्यात केले आहे. १९९०च्या विधानसभेत मी आणि विष्णुजी आमदार झालो. मी पूर्वीपासून पायजमा कुर्ता घालायचो. विष्णुजी पॅन्ट-बुशशर्ट. त्यामुळे विधानसभेत प्रवेश करताना रोज त्यांना अडवायचे. ओळखपत्र पाहिल्यावर प्रवेश मिळायचा. कारण, एकतर कपडे असे आणि देहयष्टी किरकोळ. आमदार म्हणून वाटतच नाही. शेवटी मी त्यांना सांगितले की, “तुम्ही पायजमा कुर्ता घाला. पेहराव बदला.” आणि विधानसभेच्या प्रवेशाचा विषय संपला.
१९९०, १९९५ व १९९९ अशा तीन विधानसभांत सलग १५ वर्षे आम्ही दोघे जण जीवाभावाचे मित्र, सहकारी म्हणून काम केले. तारांकित-अतारांकित प्रश्न असे विचारले जायचे, त्यात आमच्या दोघांचीही नावे असायची. कपात सूचना, विधानसभेत होणारी भाषणे, जिल्ह्यातील प्रश्न, अडचणी यावर एकत्र बसून मार्ग काढायचा. अधिकार्‍यांच्या भेटीगाठी, आंदोलने असे सर्वत्र एकत्र काम करायचे. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची गोडी, आपुलकी, प्रेम होते, ते आता नाही हे खेदाने व स्पष्टपणे सांगावे लागते.
खरंतर १५ वर्षे आमची मैत्री विधानभवनात प्रसिद्ध होती. एकदा विधानभवनाच्या लॉबीमध्ये बसलो होतो, तेव्हा आताचे खासदार गिरीश बापट तेव्हा आमदार होते. आम्हा दोघांना बघून, “ही बघा गुरू-शिष्याची जोडी आली. या महाराज बसा, काय म्हणता, शिष्य काय म्हणतो. मंडळी हे जगन्नाथ महाराज आहेत आणि विष्णु त्यांचा परमशिष्य आहे. रोज संध्याकाळी या दोघांचा सत्संग चालतो. मी एकदा सत्संगाला गेलो होतो. पण, एक अट असते, भगवी लुंगी, भगवी कफनी व डोक्याला भगवा रूमाल असेल, तरच प्रवेश मिळतो.” सगळेजण आश्चर्याने बघायला लागले. कारण, बापट सर्व माहिती गांभीर्याने सांगत होते. त्यावेळी सीताराम भोईर हे आमदार होते. ते आवर्जून विनंती करत होते की, “मी सर्व अटी मान्य करतो, भगवे कपडे घालून येतो, पण सत्संगामध्ये भजन-कीर्तनामध्ये प्रवेश द्या.” सर्वात शेवटी बापटांनी खरी गोष्ट सांगितली, तेव्हा सर्वजण पोट धरून हसायला लागले. विष्णुजी २०१४ची विधानसभा निवडणूक विक्रमगडमधून लढले व जिंकले. सहावेळा निवडणूक जिंकणे अजिबात सोपे नाही. पण, प्रचंड दांडगा जनसंपर्क, वैयक्तिक संबंध आणि लोकांची केलेली कामे म्हणूनच ते निवडून आले. सर्वात ज्येष्ठ असल्यामुळे पहिल्या यादीतच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. खऱ्या अर्थाने गरीब, वनवासी आणि इतर समाजाचेही अनेक प्रश्न सोडविले होते.
वनवासी समाजात सर्वात उपेक्षित आणि मागास असा कातकरी समाज, शिक्षणात अत्यल्प भाग, मुली तर शिक्षणापासून कोसो दूर. ठाणे जिल्ह्यातील ‘एबीएम’ समाज संस्थेने शहापूर तालुक्यात चांग्याचा पाडा येथे कातकरी मुलींची शाळा सुरू केली. पण, त्यांना अनुदान मिळत नव्हते. मंत्री म्हणून विष्णु सवरांनी वरील शाळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महत्त्व पटवून दिले आणि शाळेला सप्टेंबर २०१९ रोजी अनुदान मंजूर केले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सीताराम गायकवाड यांनी त्यांचे आभार मानले. तेव्हा ते म्हणाले की, “हे मी केले नाही, तर फडणवीस साहेबांनी काम केले, पण श्रेय घेतले नाही हा मनाचा मोठेपणा!” असे हे माझे आणि आमचे मित्र अनंतात विलीन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली...
- जगन्नाथ पाटील
(लेखक भाजपचे ज्येष्ठ नेते
आणि माजी मंत्री आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@